घरमनोरंजनरमाबाईंचे विचार आणि जिद्द मनात खोलवर रुजतेय- शिवानी रांगोळे

रमाबाईंचे विचार आणि जिद्द मनात खोलवर रुजतेय- शिवानी रांगोळे

Subscribe

 ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारते आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला या आधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड मेहनतही घेतेय. या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पाही गाठलाय. त्याचनिमित्ताने शिवानीशी केलेली ही खास बातचित.

या अनुभवाविषयी काय सांगशिल? कश्या प्रतिक्रिया मिळत आहेत?

आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करतेय. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. यासोबतच दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होतेय. या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा प्रचंड दडपण होतं. मी याआधी अश्या प्रकारची भूमिका केली नव्हती. पण संपूर्ण टीमने धीर दिला आणि मला नवं बळ मिळालं. पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर हळूहळू दडपण कमी होत गेलं. बघता बघता या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे. रमाबाईंसारख्या इतक्या मोठ्या व्यक्तिची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

- Advertisement -

रमाबाई या भूमिकेने तुला काय दिलं?

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. अश्या या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं तर एक अभिनेत्री म्हणून या भूमिकेने मला श्रीमंत केलं आहे. अतिशय कणखर आणि संयमी अश्या रमाबाई होत्या. स्वत:ची परिस्थीती अत्यंत हालाखिची असतानाही त्यांनी इतरांना मदत केली. शिक्षणासाठी आंबेडकर परदेशी असताना कोणतीही तक्रार न करता संसाराचा सक्षमरित्या भार पेलला. ही सोपी गोष्ट नाही. रमाबाईंचं कणखर व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द माझ्या मनात खोलवर रुजतेय.

- Advertisement -

भूमिकेसाठी कुणाचं मार्गदर्शन मिळालं?

याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. माझी आई शिक्षिका होती. माझ्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली आणि संपूर्णपणे मला वेळ देण्याचं ठरवलं. अभिनय क्षेत्रात येण्यासाठीही तिचा खंबीर पाठिंबा होता. मी पुण्यात वाढलेय पण शूटिंगसाठी मुंबईला असते. आईच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालंय. भूमिका साकरताना मी आईचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवते.

या मालिकेत ग्रामीण भाषेचा वापर केला आहे ती कशी आत्मसात केलीस?

ही भाषा आत्मसात करणं फार अवघड गेलं नाही. कारण नातलग, आप्तेष्ट यांच्या सहवासामुळे लहानपणापासूनच ही भाषा त्याचा लहेजा माझ्या कानावर पडत असे. त्यामुळे ही भाषा माझ्यासाठी नवी नव्हती. मालिकेच्या निमित्ताने रोजच या भाषेत संवाद साधतेय त्यामुळे त्यात सहजता आलीय. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या यापुढील प्रवासात डॉ. बाबासाहेबांचा विदेश प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -