खिलाडी कुमारच्या बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोख्या भूमिकेत

येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहेत. अक्षय कुमारने या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

असा आहे ट्रेलर

नुकताच प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. तर तुम्ही जेथे कुठे आहात तेथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण लक्ष्मी तुमच्या भेटीला येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून तो गर्लफ्रेंड कियारा अडवाणीच्या कुटुंबीयांना भेटायला आलेला असतो. पण तेथे आल्यानंतर एक ट्रान्सजेंडर भूत अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवतो. त्यानंतर अक्षयचे वागणे बोलणे पूर्णपणे बदलले असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अक्षयला या वेगळ्या भूमिकेत पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

‘गुडन्यूज’नंतर अक्षय आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नृत्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. पोस्टरवरून जरी हा चित्रपट गंभीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये चित्रपटाची विनोदी झलक पाहायला मिळाली आहे.