माधुरी – आमिरचं ‘दिल’ पुन्हा धडकणार

'दिल हा चित्रपट माझा खूपच आवडता चित्रपट असल्यामुळे त्याचा रिमेक करण्याचं माझं स्वप्न आहे', असं दिग्दर्शक इंद्रा कुमार म्हणाले आहेत.

Mumbai

बॉलीवूडमध्ये सध्या चित्रपटांच्या रिमेकचं तसंच चित्रपटांच्या सिक्वेल पार्ट्सचं पीक आलं आहे. ‘दबंग ३’, ‘हाऊसफुल्ल ४’, ‘वेलकम ३’, ‘बागी ३’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ असे अनेक चित्रपट येऊ घातले आहे. दुसरीकडे जुन्या हिंदी चित्रपटांच्या नवीन ‘रिमेक’विषयी बोलायचं झाल्यास ‘डॉन’, ‘जंजीर’, ‘अग्निपथ’ ही उत्तम उदाहरणं आहेत. याच धर्तीवर आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचं रिमेक बनणार असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. हा चित्रपट आहे १९९० साली आलेला माधुरी दीक्षित आणि आमिर खान यांचा ‘दिल’. या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची आणि विशेषत: तरूण वर्गाची मनं जिंकली होती. ‘दिल’ मधील माधुरी आणि आमिरच्या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरुन पंसती दिली होती. त्यामुळे ‘दिल’च्या रिमेकसाठीही प्रेक्षक तितकेच उत्सुक असतील यात काही शंका नाही.

dil movie remake
1990 साली आलेला ‘दिल’ चित्रपट

मूळ ‘दिल’ चित्रपटातील गाण्यांनाही त्यावेळी भरपूर पसंती मिळाली होती. आजही चित्रपटातील गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. दरम्यान, दिग्दर्शक इंद्र कुमार हे ‘दिल’चा रिमेक बनवणार असल्याचं समजतंय. याविषयी मध्यंतरी एका मुलाखतीत बोलताना इंद्र कुमार म्हणाले होते की, ‘मी खूप दिवसांपासून दिलच्या सिक्वलचा विचार करत असून याची स्क्रीप्टदेखील तयार केली आहे. दिल हा चित्रपट माझा खूपच आवडता चित्रपट असल्यामुळे त्याचा रिमेक करण्याचं माझं स्वप्न आहे. लवकरच मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.’ नव्या ‘दिल’मध्ये पुन्हा माधुरी आणि आमिरच दिसणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना, ‘नव्या चित्रपटात मी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे’, असा खुलासा इंद्र कुमार यांनी केला.

दरम्यान, आता आमिर आणि माधुरीच्या जागी कोणती नवी जोडी पाहायला मिळणार? चित्रपटाचं शूटिंगला नेमकी कधी सुरुवात होणार? या चित्रपटामध्ये काय नवीन असणार? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here