केबीसीतल्या ‘त्या’ प्रश्नांवर बिग बींनी मागितली माफी

अखेर ९ नोव्हेंबरला रात्री २ वाजता ट्वीट करत बिग बींनी माफी मागितली.

Mumbai
amitabh bachchan

बिग बी अमिताभ बच्चन यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. कौन बनेगा करोडपती-११’ या टीव्ही शोचे सूत्रसंचालनादरम्यान अमिताभ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला बायकोट करावे आणि वाहिनीने माफी मागावी या मागणीने जोर धरला. त्यानंतर सोनी वाहिनीने ऑफिशअल ट्वीट करत माफी मागितली पण सगळ्यांना प्रतिक्षा होती ती अमिताभ यांच्या माफीची. अखेर बिग बी यांनी ट्वीट करत माफी मागितली आहे.

‘शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’ असं ट्विट करत अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. तर ‘बुधवारी केबीसी भागातीत अज्ञानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ वापरला याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो’ हे ट्वीट करत सोनी टिव्हीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सुरू असताना स्पर्धकाला मुघल बादशाह औरंगजेबाबाबत प्रश्न विचारण्यात आला. मुघल बादशाह औरंगजेब याच्या समकालीन खालीलपैकी कोण होते? असा प्रश्न स्पर्धकासाठी स्क्रीनवर आला. या प्रश्नाचे ४ पर्याय देण्यात आले होते. त्या ४ पर्यायांमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज असे पर्याय देण्यात आले होते. डी या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ यांनी देखील पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरीच उल्लेख केला. विशेष म्हणजे प्रश्नात औरंगजेब याचा सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. या मुळे लोकांमध्ये नाराजी पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी अतिशय नाराज झाले आहेत. याचे तिव्र पडसाद सोशल मीडियावर उमटलेले दिसले.