‘अनन्या’ आता रुपेरी पडद्यावर, चित्रीकरणाला सुरूवात!

Mumbai

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’ अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन ‘अनन्या’ आता रुपेरी पडद्यावर येत आहे. अनन्या हे रूईया महाविद्यालयाची एकांकिका होती. यावेळी या एकांकिकेला अनेक बक्षीसेही मिळाली. त्यानंतर या एकांकिकेचे नंतर नाटकात रूपांतर झाले. एकांकिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भुमिकेत होती तर नाटकात ऋतूजा बागवे मुख्य भुमिकेत होती. आता या नाटकाचे रूपांतर चित्रपटात होत आहेत. चित्रपटात अभिनेत्री ऋता दुर्गूळे मुख्य भुमिकेत आहे. प्रताप फड हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

ड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मेघना जाधव आणि सतीश जांभे हे सहनिर्माते आहेत.स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. “अनन्या” या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या रूपात ही कथा येत आहे. एक आशयसंपन्न आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ऋतासह या चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत असे बाकी सर्व तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या वर्षीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या चित्रपटातून मांडलं जाणार असल्यानं हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.