…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सुपरस्टारातील माणसाची गोष्ट

...आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाविषयी कुतूहलपूर्ण चर्चा मराठी चित्रपटसृष्टीत केली जात होती. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या लूकवर घेतलेली मेहनत प्रेक्षकांपर्यंत त्याच्या टीझर, ट्रेलरमधून पोहचली होती. डॉ. काशीनाथ घाणेकर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील एक मोठं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यावर आधारीत कथानक असलेला चित्रपटही त्यामुळेच औत्सुक्यपूर्ण होता. ही उत्सुकता कायम ठेवण्याचं काम ...आणि काशिनाथ घाणेकर या चित्रपटाने केलं आहे.

Mumbai
...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट

एक नट घडायला आणि बिघडायला त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कशी कारणीभूत ठरते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. काशीनाथ घाणेकर. या चरित्रपटातून डॉ.घाणेकरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या रेखाटले आहेत. चित्रपट जरी सबकुछ सुबोध भावे असला तरी चित्रपटाचे श्रेय लेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांना जातं.

रंगभूमीवरचा पहिला आणि अखेरचा सुपरस्टार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकापासून खर्‍या अर्थाने काशिनाथ पर्व सुरू झालं. नाटकात डॉ. काशिनाथ यांनी साकारलेला संभाजी प्रेक्षकांना भावला. त्यानंतर ‘अश्रुंची झाली फुले’ नाटकात डॉ.काशिनाथ यांनी साकारलेले ‘लाल्या’ हे पात्र प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. लाल्याच्या तोंडी असणारी वाक्य प्रेक्षकांची अगदी तोंडपाठ होती. प्रत्येक प्रयोगागणिक काशिनाथला नाटकात मिळणारी दाद, टाळ्या, शिट्यांमुळे काशिनाथ यांच आयुष्य बदलत जातं. रंगभुमीवरचा सुपरस्टार झाल्यानंतर काशिनाथ मराठी चित्रपटसृष्टीकडे वळतात. मात्र रंगभूमी श्वास मानणार्‍या काशिनाथ यांचा जीव चित्रपटात रमत नाही.

काशिनाथ यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबर त्यांच वैयक्तिक आयुष्यही चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. यामुळे काही अंशी जरी घाणेकरांबद्दल मनात राग निर्माण झाला तरी ते अखेरचे सुपस्टार होते हे आपल्याला मान्य करावच लागेल. पेशाने डेंटीस्ट असतानाही रंगभूमीच्या सेवेसाठी सदैव तयार असणारा, मराठीतला सुपरस्टार जरी झाला असला तरी वडिलांच्या एका कौतुकाच्या थापेसाठी तो कायमच धडपडत राहतो. याचबरोबर काशिनाथ पर्व सुरू असतानाच डॉ. लागू यांच्या वास्तववादी अभिनयानेही तो प्रेरित होतो. घाणेकरांच्या नाटकाला होणारी गर्दी आता डॉ. लागूंच्या नाटकाकडे वळते. मात्र त्यानंतरही आपणच रंगभूमीवरचा एकमेव सुपस्टार आहोत, हे दाखवण्याची धडपड काशीनाथ यांची सुरू होते. लागूंच नाटक पाडण्यासाठी काशीनाथ यांनी केलेले प्रयत्न, चित्रपटातील हे सीन उत्तम जमून आले आहेत.

भव्य सेट उभारूनही जूना काळ प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात सिनेमा थोडा कमी पडला आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपट थोडा ताणला आहे. मात्र मध्यंतरानंतर तुम्ही चित्रपटाशी पुरेसे समरस होता. चित्रपटात काशिनाथ यांच्या नाटकाचे अनेक प्रसंग रंगवण्यात आले आहेत. हे सगळेच प्रसंग आपल्याला जून्या नाटकांची आठवण करून देतात. चित्रपटात डॉ.काशिनाथ यांच्या सच्च्या चाहत्याचे प्रसंगही लक्षात राहतात. यातील संवादही चित्रपटाची जमेची बाजू आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आणि गुरू ठाकूर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहीले आहेत. या संवादाची जादू प्रेक्षकांवर पाडण्यात हे दोघही यशस्वी झाले आहेत.

चित्रपटाला वेगळी अशी कथा नसली तर डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या आयुष्यात येणार्‍या व्यक्ती, एका सुपस्टारचं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत उत्तम पद्धतीने कसं पोहचतं. या सगळ्यामागे दिसते ती कलाकारांनी आपल्या भुमिकांवर घेतलेली मेहनत. डॉ. काशीनाथ घाणेकर या मुख्य पात्रात घार्‍या डोळ्यांचा सुबोध भावे एकदम परफेक्ट बसला आहे. काशीनाथ यांची स्टेजवर एन्ट्री घेण्याची स्टाईल, अभिनयाची शैली आत्ताच्या पिढीलाही भुरळ घालणारी आहे. ‘एकदम कडक’, ‘उसमे क्या है’ या वाक्यांची फेक एकदम कडक जमून आली आहे.

त्याचप्रमाणे अभिनेता सुमित राघवन याने साकारलेले डॉ. लागू चित्रपट संपल्यानंतरही तुमच्या डोळ्यासमोर अगदी जसेच्यातसे उभे राहतात. कदाचित हीच त्या भुमिकेची ताकद आहे. प्रभाकर पणशीकर, सुलोचना दिदी, भालजी पेंढारकर या भुमिका अनुक्रमे प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी साकारल्या आहेत. या सगळ्याच व्यक्तीरेखा उत्तम रेखाटल्या गेल्या आहेत. नंदीता पाटकर हीने देखील इरावती घाणेकर या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. मात्र चित्रपटात फार वाव या व्यक्तिरेखांना मिळाला नाही.

चित्रपटात नवीन गाणी नसली तरी जुन्या गाण्यांना नवीन साज चढवण्यात आला आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहाल या गाण्यात संध्याच्या भुमिकेत अमृता खानविलकर दिसते. तर गोमू संगतीनं माझ्या तू येशील का? या गाण्यात आशा काळे यांच्या जागी प्राजक्ता माळी दिसते. पण या दोघीही केवळ एका गाण्यापुरत्या चित्रपटात दिसतात.

एकंदरीतच पूर्ण मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. अडीच तासांच्या चित्रपटात संपूर्णवेळ सुबोध भावे काशीनाथच्या भुमिकेत तुम्हाला पडद्यावर दिसतो. सुबोध भावे याला काशीनाथच्या भुमिकेत बघणं ही त्याच्या चाहत्यांसाठी ट्रीटच ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here