१०० कोटी झाले…बधाई हो!

बधाई हो! हा आयुषमान खुराणाचा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. संवेदनशील विषय अतिशय योग्य तऱ्हेने हाताळल्यामुळे आणि चांगल्या कथेमुळेच चित्रपटाला यश मिळाल्याचे आयुषमानचे म्हणणे आहे.

Mumbai
badhai ho film
बधाई हो

आयुषमान खुराणाचे चित्रपट म्हणजे केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर चित्रपट चाहत्यांसाठीही खरीखुरी मेजवानी असते. समाजातील गंभीर विषय मात्र त्यावर अतिशय हलकफुलके विनोदी बाजाचे चित्रपट आयुषमान करत आला आहे. त्याला नेहमीच प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता आयुषमानच्या बधाई हो चित्रपटालाही बधाई देण्याची वेळ आली आहे कारण हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने १०० कोटी कमावले असून पुन्हा एकदा आयुषमानच्या चित्रपट निवडीला प्रेक्षकांनी एकप्रकारे दादच दिली आहे.

कथा निवड महत्त्वाची

माझी कथा निवडण्याची पद्धत योग्य असल्याचा विश्वास आता मला मिळाला आहे. मी नेहमीच स्वतः निर्णय घेतले आहेत आणि स्वतःवर विश्वास ठेवूनच कथेची निवड केली. १०० कोटीचा व्यवसाय झाल्यामुळे आता मला कथेच्या बाबतीत अजून चांगला विश्वास मिळाला आहे, असे आयुषमान खुराणाने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. या चित्रपटामध्ये आपल्या आई-वडिलांना मूल होणार हे कळल्यानंतर बावचळलेला मुलगा आणि नंतर त्यांना समजून घेणारा मुलगा हे दोन्ही फरक आयुषमानने अतिशय चांगल्या तर्‍हेने हाताळले आहेत. आपल्या समाजात अजूनही लोकांच्या बोलण्याने जग चालतं अशी परिस्थिती आहे. मात्र त्यावेळी आपल्या माणसांची साथ असेल तर सर्वकाही योग्य होऊ शकतं हेच अतिशय सहजरित्या दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शविली आहे.

संवेदनशील विषय

असा संवेदनशील विषय असूनही त्याच्या हाताळणीमुळेच या चित्रपटाला यश मिळाले आहे. आयुषमान खुराणासह चित्रपटात नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा, गजराज राव आणि सुरेखा सिक्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. १७ व्या दिवशीच १०० कोटी क्लबमध्ये हा चित्रपट सामील झाला असून जंगली पिक्चर्सचा हा १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा दुसरा चित्रपट आहे. याचवर्षी राजी चित्रपटालाही हे यश मिळाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here