घरमनोरंजनन उलगडणार्‍या कथानकाचा ‘बदला’

न उलगडणार्‍या कथानकाचा ‘बदला’

Subscribe

बदला मधल्या प्रत्येक घडणार्‍या प्रसंगाला आधीच्या घटनेचे कारण आहे. या कारणांची फ्लॅशबॅक आणि वर्तमानातल्या घटनांची साखळी कुठेच तुटत नाही. कॅमेर्‍याचे कोन, पार्श्वसंगीत तथ्याचा शोध घेत राहातात, चित्रपटाची उत्कंठा टोकाला नेणारं हे तथ्य कथानकाच्या जवळच असतं, पण त्याच्या नावावर जे हाती येतं, तो बनाव असू शकतो, इतका अविश्वास कथानकातल्या प्रसंगातून समोर येतो. इथं कथानक उलगडत जात नाही किंवा त्याचा अंदाजही बांधता येत नाही, कथानकातील या फसवणुकीसाठी प्रेक्षक मनाने तयार नसतो.

घडणार्‍या घडामोडी परिस्थिती वास्तव असते. अनेकदा घटना रोखणं आपल्या हातात नसतं. त्यामुळे हाती राहातात त्या केवळ शक्यता, या शक्यतांवरून आपण परिस्थितीचा अंदाज लावत असतो आणि या आपण लावलेल्या अंदाजांनाच तथ्य समजत असतो. पण परिस्थिती, घटना कधीही बदलू शकतात. त्याला काही अंशी नियती समजले जाते. अशी परिस्थितीत जरी बदलली तरी जे खरं आहे, ते बदलत नाही. मग जे तथ्यं असलं तरी त्रासदायक ठरू शकतं त्यावेळी ते नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. या नाकारण्यातून वस्तुस्थितीच नाकारली जाते. मग जे खरं नसतं ते कल्पनेचा आधार घेऊन रचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून झालेली चूक किंवा गुन्हा असतो तो खोटा ठरवण्यासाठी वस्तुस्थिती बदलण्याचाच खटाटोप सुरू होतो. काही वर्षापूर्वी आलेल्या दृश्यम नावाच्या चित्रपटाची कथा अशाच दृश्य स्वरुपातल्या बनावावर आधारीत होती. सुजॉय घोष दिग्दर्शित बदला सुद्धा याच मार्गाने जातो. सक्षम कथा, पटकथा, संवाद, प्रसंगातून तथ्यं आणि बनाव यातल्या धूसर सीमारेषेवर बदलाचे कथानक रेंगाळत राहते. हे रेंगाळने कंटाळवाणे ठरत नाही, हे चित्रपटाचे यश आहे.

नैना सेठी (तापसी पन्नू) ही यशस्वी व्यावसायिक आहे. त्यामुळे व्यवहार, निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि घडणार्‍या शक्यतांची चाहूल घेण्यात ती कमालीची वाकबगार आहे. हा तिचा अती आत्मविश्वास अहंकारात बदलणार्‍या मूर्खापणाच्याही ती तेवढ्याच जवळही आहे. या दोन्हीतला संवादातील संघर्ष म्हणजे बदला चित्रपटाचे कथानक. कळत नकळत तिच्याकडून एक मोठी चूक किंवा गुन्हा होतो. आता हा गुन्हा लपवण्यासाठी तिच्याकडून केले जाणारे प्रयत्न आणि गुन्ह्यातील सत्य उघड करण्याच्या प्रयत्नात असलेला वकिल बादल गुप्ता (अमिताभ) यांच्यातल्या संवादाला खिळवून ठेवणारी पटकथा मांडण्यात सुजॉय घोषचे कौशल्य आहे. चित्रपटात गाणी नाहीत, त्यामुळे कथानकातले दुवे आणि त्यांच्यातलं सूत्र विस्कळीत होत नाही. बदला मधला प्रत्येक घडणार्‍या प्रसंगाला आधीच्या घटनेचे कारण आहे. या कारणांची फ्लॅशबॅक आणि वर्तमानातल्या घटनांची साखळी कुठेच तुटत नाही.

- Advertisement -

कॅमेर्‍याचे कोन, पार्श्वसंगीत तथ्याचा शोध घेत राहातात, चित्रपटाची उत्कंठा टोकाला नेणारं हे तथ्य कथानकाच्या जवळच असतं, पण त्याच्या नावावर जे हाती येतं, तो बनाव असू शकतो, इतका अविश्वास कथानकातल्या प्रसंगातून समोर येतो. इथं कथाकन उलगडत जात नाही किंवा त्याचा अंदाजही बांधता येत नाही, कथानकातील या वास्तविक फसवणुकीसाठी प्रेक्षक तयार नसतो, त्यामुळेच चित्रपट खिळवून ठेवतो. चित्रपटाचा पडदा संध्याकाळ आणि रात्रीच्या घटनांनी व्यापलेला आहे. अर्धेअधिक कथानक एका बंद खोलीत तापसी आणि अमिताभच्या चर्चेतच घडते. संवादांचा हा परिणाम ऐंशीच्या दशकात आलेल्या बासू चटर्जींच्या ‘एक रुका हुवा फैसला’ची आठवण करून देतो. दिग्दर्शक सुजॉय घोषवर या चित्रपटाचा किंबहुना एक रुका हुवा…ज्या ट्वेल अँग्री मेन वर आधारीत असल्याचे सांगितले जाते. त्याचा मोठा परिणाम असल्याचे जाणवते. चित्रपटातील हॉटेलच्या एका ओझरत्या दृष्यात ट्वेल अँग्री..चे पोस्टर पडद्यावर दिसते, यावरून बांधलेला अंदाज बदलाचे कथानक जसे जसे पुढे सरकते तसा स्पष्ट होत जातो.

चित्रपटाची सलग अशी कथा नसल्याने शक्यतांवर अवलंबून राहण्याशिवाय प्रेक्षकांकडे पर्याय नसतो. संपूर्ण कथानकच शक्य अशक्यतेच्या सीमारेषेवर असल्याने इथे त्याची नोंद करणे, चित्रपट पहायला थिएटरमध्ये जाणार्‍या प्रेक्षकांचा हिरमोड करणारे ठरू शकते. ही उत्कंठा पडद्यावर कायम ठेवण्याचं श्रेय अमिताभ आणि तापसी या दोघांचंही आहे. या दोघांच्या अभिनयाची संयत जुगलबंदी पहायची असेल तर बदला पहायला हवा. चित्रपटात या दोघांच्या संवादातून उलगडत जाणारे महाभारतातील संदर्भ तथ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातून निर्माण होणार्‍या पडद्यावर रचल्या गेलेल्या चक्रव्यूहात प्रेक्षकही अडकत जातो. तर्क आणि शक्यतांच्या कसोट्यांवर या तथ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रेक्षकांकडूनही नकळत केला जातो. त्यासाठी दिग्दर्शक सुजॉयचे कौतूक करायला हवे.

- Advertisement -

अहंकार, असंवेदनशीलता, स्वार्थलोलुपता, व्यवहारवाद, आसक्ती, असे बरेच जगण्याचे घटक इथल्या व्यक्तीरेखांच्या मानवी स्वभावातून समोर येत जातात. चित्रपटातील व्यक्तीरेखा परिस्थितीने ग्रे शेडमध्ये आणून बसवल्या आहेत. त्यामुळे केवळ कथा आणि पटकथेवरच ‘बदला’ची संपूर्ण मदार असते. चित्रपटात अमृता सिंगने साकारलेली ‘आई’ परिणामकारक झाली आहे. ‘बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता’ कुरूक्षेत्रावर युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या या शिकवणीचा आधार चित्रपटाला आहे. जाणीवपूर्वक केला गेलेला गुन्हा आणि नकळत घडलेली चूक यातील फरक मानवी जाणीवेतून टिपण्याचा प्रयत्न ‘बदला’ तून पडद्यावर येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -