‘लाख’मोलाची बाळासाहेब ठाकरे स्मृती एकांकिका स्पर्धा

Mumbai
Ekankika spardha

अवघ्या महाराष्ट्रावर गारुड करणारे नेते म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रसिद्ध असले तरी मुळात ते अव्वल दर्जाचे व्यंगचित्रकार आणि हाडाचे कलावंत होते. त्यामुळेच उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सलग दुसर्‍या वर्षी राज्यस्तरीय ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती एकांकिका स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान’, ‘ठाणे आर्ट गिल्ड’, ‘जनसेवा प्रतिष्ठान’ आणि ‘शिवसेना चित्रपट सेना’ यांच्या वतीने ११ ते २० जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेस एक लाख रुपयांचे पारितोषिक आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ११, १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी गडकरी रंगायतनच्या तालिम हॉल येथे होणार असून अंतिम फेरी २० जानेवारी रोजी गडकरी रंगायतनच्या मुख्य सभागृहात होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेस रु. १,००,०००/- आणि स्मृतिचिन्ह,द्वितीय क्रमांकास रु. ७५,०००/- आणि स्मृतिचिन्ह आणि तृतीय क्रमांकास रु. ५१,०००/- आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

लक्षवेधी एकांकिकेसाठी रु. ११०००/- आणि स्मृतिचिन्ह, सर्वोकृष्ट अभिनेता व अभिनेत्रीसाठी प्रथम रु. ११०००/-, द्वितीय रु. ५,०००/- सर्वोकृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लेखक यांना रु. ११०००/- व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच, सर्वोकृष्ट प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा अशा सर्वच विभागांसाठी प्रत्येकी रु. ५,०००/- व स्मृतिचिन्ह अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज गडकरी रंगायतन येथे सकाळी ८.३० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०१९ असून अधिक माहितीसाठी +९१९०२९३६१५७३/९३२३७८१८६३ या नंबरवर संपर्क करावा.