४ जानेवारीला होणार पु. ल. देशपांडेंची भेट!

तमाम मराठी वाचकांचे आवडते लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट रिलीज होणार असून त्याचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला आहे.

Mumbai
P. L. Deshpande Movie
पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

पु.ल. या दोन अक्षरांतच सगळं सामावलं जातं. सगळ्यांचे लाडके पु.ल. देशपांडे यांना भेटायला कोणाला नाही आवडणार. खुद्द पु.लंच्या जीवनावर आधारीत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या आधी त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट आणि नाटकं प्रदर्शित झाली होती. आता या चित्रपटाच्या माध्यमातून पु.ल. वैयक्तिक आयुष्यात कसे होते? हे प्रेक्षकांना कळणार आहे! पु. ल. देशपांडे यांच्या ९९व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अल्पावधीतच या टीजरला युट्यूबवर मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता असल्याचं स्पष्ट झालं आहे.

चित्रपटाच दिग्गज व्यक्तिरेखा दिसणार!

महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटातून भाई आणि सुनीताबाई यांच नातं, पु.लंची मित्रमंडळी अशी अनेक पात्र आपल्यासमोर येणार आहेत. या चित्रपटातून जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना दिसणार आहेत.

‘हे’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

‘हंटर’, ‘वायझेड’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता सागर देशमुख पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर ‘आपलं माणूस’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘अस्तू’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री इरावती हर्षे सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मग तयार राहा! ४ जानेवारी २०१९ ला पु.ल. आपल्या भेटीला येणार आहेत!

हा पाहा टीजर!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here