‘स्कूटी घेतली की सेल्फी काढतात’, भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी उडवली मराठी कलाकारांची खिल्ली!

avdhoot wagh

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या कमेंटला पाठिंबा दिला आहे तर अनेकांनी त्यांना सुनावले आहे.

वाघ यांनी सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतशी संबंधीत एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. या पोस्टमध्ये कंगना एखादा चित्रपट किंवा जाहीरातींसाठी घेत असलेलं मानधन आणि मराठी अभिनेत्री घेत असलेल्या मानधनाची तुलना केली आहे.

काय आहे अवधूत वाघ यांची पोस्ट

एका यूजरने ट्विटरवर कंगनाचे मानधन आणि मराठी कलाकारांचे मानधन अधोरेखीत केलं होतं. “इथे कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये. पण आज ज्या पद्धतीने मराठी नट्या कंगनावर तुटून पडल्यात आणि तिला तिची लायकी सांगतायत. सर्वांच्या माहितीसाठी. कंगनाची फी-११ कोटी (मुव्हीसाठी)\ १.५ कोटी (अॅडसाठी), मराठी नट्या- २.५ ते ५ लाख (मुव्हीसाठी)\ ७.५ ते १०,००० रुपये पर डे सीरियलसाठी” असे ट्विटमध्ये म्हटले होते.

यावर कमेंट करताना अवधूत वाघ म्हणतात, ‘स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात’ असे म्हटले आहे. त्यांच्या या कमेंटमुळे त्यांना सोशल मीडियावर काहींनी ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अवधूत वाघ यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ही ही अतिशय निंदनीय बाब आहे असे म्हटले आहे. ‘मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत! अतिशय निंदनीय बाब आहे! मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्र द्रोही होणार ??? मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबईवर अभिमान व प्रेम व्यक्त केले.. हे भाजप ला का झोम्बले ?’ असे त्यांनी म्हटले आहे.