घरमनोरंजननेत्रहीन डॉ. दिव्यांनी गायलं 'डोळ्यांमदी तुझा चांदवा'!

नेत्रहीन डॉ. दिव्यांनी गायलं ‘डोळ्यांमदी तुझा चांदवा’!

Subscribe

आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून गरूडझेप घेतलेली अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यातच आता डॉ. दिव्या बिजूर या तरुणीच्या नावाची भर पडली आहे. नेत्रहीन असलेल्या ३३ वर्षांच्या डॉ. दिव्या यांनी ‘विकून टाक’ या चित्रपटासाठी एक प्रेमगीत गायले आहे. या गाण्याचे बोल आहेत, ‘डोळ्यांमंदी तुझा चांदवा’! उत्तुंग ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे. योगायोगांची ही साखळी इथेच थांबत नाही. फिजिओथेरपीच्या डॉक्टर असलेल्या दिव्या यांचे वडील नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आणखी एक योगायोग म्हणजे त्यांनी ज्या चित्रपटासाठी पहिलंवहिलं गाणं गायलं आहे, तो चित्रपट अवयव दान या एका गंभीर विषयावर अत्यंत खेळकरपणे भाष्य करतो.

‘मी जन्मापासूनच दृष्टिहीन आहे. ऑप्टिक नर्व्ह कंडिशनमुळे मला दिसू शकत नाही. अवयव दान हे किती महत्त्वाचं आहे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला चांगल्या पद्धतीने कळू शकेल? ‘विकून टाक’ हा चित्रपट नेमक्या याच विषयावर खूप तरल भाष्य करतो. त्यामुळे या चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळणं ही खूप मस्त गोष्ट होती,’ डॉ. दिव्या सांगतात. डॉ. दिव्या यांच्या घरातील सर्वच जण डॉक्टर आहेत. त्यांचे वडील रवींद्र बिजूर नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आई डॉ. सुजल बिजूर या अनेस्थेसिस्ट आणि मोठी बहीण प्रसुतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आहेत.

- Advertisement -

‘मी बघू शकत नाही. पण तरीही मन:चक्षुंनी मला कळू शकतं की, विकून टाक या चित्रपटाद्वारे जो संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तो संदेश नक्कीच मोठ्या प्रमाणावर पसरेल,’ दिव्या म्हणतात.
दिव्या यांना पहिल्यांदा गाताना ऐकलं, तेव्हाच मला जाणवलं होतं की, आपल्या चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांचा आवाज एकदम योग्य आहे. लोकांना हे गाणं आवडलं, तर आम्ही जो संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत, तो अधिक परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. आम्ही त्यांना गाणं गाण्याची विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला. या चित्रपटाच्या बाबतीत घडलेली ही खूप सुंदर गोष्ट आहे, असं चित्रपटाचे निर्माते उत्तुंग ठाकूर म्हणाले.
डोळ्यांमदी तुझा चांदवा, हे प्रणयगीत आहे. अगदी कोणाच्याही मनात एक गोड शिरशिरी उमटवेल, अशी चाल अमितराज यांनी दिली आहे. ‘माझ्या दादाचं लगीन’ या गाण्याप्रमाणेच हे गाणंही लोकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास उत्तुंग यांनी व्यक्त केला. अवयव दान या विषयाला अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने भिडणारा आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर चित्रित झालेला ‘विकून टाक’ हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -