घरमनोरंजनमुलांना निखळ आनंद देणारा जागृती

मुलांना निखळ आनंद देणारा जागृती

Subscribe

बालदिनाच्या दिवशी, १४ नोव्हेंबरला, ‘आपलं महानगर’साठी साप्ताहिक सदराचा मजकूर लिहायचे ठरवले आणि आपोआप आठवला फिल्मीस्तानचा ‘जागृती’ हा चित्रपट. ज्या काळात मुलांसाठी खास चित्रपटांची निर्मिती क्वचितच होत असे, अशा काळात फिल्मीस्तानने हे धाडस केले होते. असा हा खूप जुना आणि तरी अजूनही दोन तास बावीस मिनिटे खिळवून ठेवणारा. मनोरंजन बोस यांनी लिहिलेला आणि सत्येन बोस यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट खरोखरच मुलांसाठी असलेला चित्रपट आहे. म्हणजे तेच आपले प्रेक्षक आहेत, हे नक्की करून तयार केलेला आहे. उगाच कोणत्याही प्रकारची, म्हणजे प्रेमप्रकरणाची वगैरे जोड त्याला देण्यात आलेली नाही.

त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रसभंग न होता, मुलांना त्याचा निखळ आनंद लुटता येतो. चित्रपटाची कथा तशी साधी आणि नेहमीची वाटावी अशी आहे. म्हणजे श्रीमंताघरचा अजय हा वडील नसल्याने काकांकडे वाढला आहे; पण तो दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्यामुळे त्याला सुधारण्यासाठी काका त्याला एका खास वसतीगृहात ठेवतात. ते चालवलेले असते अभि भट्टाचार्यने. तोच वसतीगृहाचा सुपरिटेंडेंट असतो आणि त्याला रूढ शिक्षणपद्धत मान्य नसते आणि तो स्वतःच तयार केलेल्या अगदी नव्या प्रणालीचा अवलंब करत असतो. याचा कदाचित फायदा होईल, या आशेने काका अजयला तेथे ठेवतो.

- Advertisement -

पण अजय काही बदलत नाही. त्याचे उद्योग चालूच राहतात आणि त्यामुळे तो आणि एकदा तर त्याच्याबरोबर पर्यवेक्षकही संकटात सापडतात. एकदा त्याला शक्ती भेटतो. त्या दोघांचे चांगले जमते. शक्तीलाही अजयप्रमाणे वडील नाहीत, आई (प्रणोती घोष) हेच त्याचे सर्वस्व आहे. हा अजयच्या अगदी उलट प्रकृतीचा आहे. शांत आणि आज्ञाधारक. तो विकलांगही आहे. त्यामुळे त्याला कुबड्यांचा वापर करूनच चालावे लागते. तो त्याच्या परीने अजयला बदलण्याचा-सुधारायचा प्रयत्न करतो. पण हट्टी स्वभावाचा अजय त्याला दाद देत नाही. दर वेळी त्याचा हट्टी स्वभाव शक्तीच्या प्रयत्नांच्या आड येतो. शेवटी अशी वेळ येते की अजय वसतीगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो.

ते शक्ती पाहतो आणि त्याला अडवण्यासाठी जाऊ लागतो. आपल्या कुबड्यांच्या सहाय्याने तो जमेल तितक्या वेगाने जात तो एकीकडे अजयला थांबायला सांगत असतो; पण अजयला त्याचा आवाज ऐकूच येत नाही. शेवटी अजय जवळ पोहोचण्याच्या नादात शक्तीला रहदारीचे भानही राहत नाही आणि एका वाहनाच्या धडकेने पडतो आणि गतप्राण होतो. अपघाताच्या आवाजाने अजय मागे फिरतो आणि मृत शक्तीकडे पाहतो आणि हे जे काही झाले त्याला आपणच जबाबदार आहोत हे त्याला उमगते. त्या क्षणापासून तो पूर्णपणे बदलतो. त्याला उपरती होते. तो अभ्यासात आणि खेळांत लक्ष घालतो आणि दोन्हीकडे चमकतो. तो आता आदर्श विद्यार्थी बनतो. सर्वांनाच बरे वाटते. त्यातच त्यांचा आनंद द्विगुणित होतो. कारण पयर्र्वेक्षकांच्या शिक्षणपद्धतीचे महत्त्व कळल्याने शिक्षण मंडळ त्या पद्धतीला मान्यता देते.

- Advertisement -

या चित्रपटात शिक्षकांना घाबरवण्यासाठी अजय आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या युक्त्या मुलांना खूश करतात. सर्व मुले त्या वयाचीच असल्याने कुठेही काही वावगे वाटत नाही. मुलांची भारत दर्शन सहल आणि त्यांना विविध स्थळांची महती सांगणारे, ‘आओ बच्चों तुम्हे दिखाए, झाँकी हिंदुस्तानकी’ हे गाणे तर आजही अनेकदा कानावर येते आणि लोक त्याची रेडिओ फर्माईश कार्यक्रमांतून आवर्जून मागणी करतात. तसेच दूरदर्शनवरील छायागीतमध्येही आजही ते अनेकदा दाखवले जाते. कवी प्रदीप यांचे हे गीत त्यांनी स्वतःच म्हटले आहे. संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी याबरोबरच चाली दिलेली इतर सर्व गाणीही अतिशय सुंदर आणि पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटायला लावणारी आहेत. आशा भोसले यांच्या आवाजातील, ‘दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ आणि महमद रफी यांचे ‘हम लाए हैं तूफानसे कश्ती निकालके, इस देशको रखना, मेरे बच्चों संभालक’े ही गाणी आणि त्याबरोबरच आशा भोसले यांचे दोनदा येणारे ‘चलो चले माँ, सपनों के गावमें…’ हे गाणे एकदा सुखद तर एकदा (शक्तीच्या निधनानंतर) दुःखद सुरावटीत बांधलेले आहे. त्याची गोडी तर अवीट म्हणावी अशीच आहे.

अभी भट्टाचार्य यांचा वेगळ्या मार्गाने जाणारा वसतीगृहाचा सुपरिटेंडेंट खराखुरा वाटावा असा आहे आणि मुख्य भूमिकांतील राजकुमार गुप्ता (अजय) आणि रतन कुमार (शक्ती) हे मनात घर करतात. त्यातही रतन कुमारची भूमिका संस्मरणीय झाली आहे. बाकी विद्यार्थी मंडळी तर खरोखरच कुठल्यातरी वसतीगृहातून आणल्यासारखी भासतात आणि चित्रपटात जिवंतपणा निर्माण करतात. हॉस्टेलवरच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पळवण्यासाठी केलेले प्रसंग चांगलीच दाद मिळवतात तर शक्तीमुळे प्रेक्षक गंभीर होत आणि करुण रसातील चलो चले माँ… च्या वेळी तर अनेकांना अश्रू अनावर होत. ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं’ हे गाणे सुरू झाल्यानंतर प्रेक्षक त्यात कधी सामील होत ते कळतही नसे. अर्थातच या चित्रपटाला चांगले यश मिळाले हे वेगळे सांगायला नकोच. याला सर्वोत्तम हिंदी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. तर फिल्म फेअरनेही याची निवड सर्वोत्तम चित्रपट म्हणून केली होती.

एक गमतीदार घटना मुद्दाम नोंदायला हवी. याच चित्रपटाची नक्कल असलेला ‘बेदरी’ नावाचा चित्रपट पाकिस्तानात १९५६ साली प्रदर्शित झाला. संवादांमध्ये काही शब्द अर्थातच बदलण्यात आले होते तरी बाकी कथा अगदी जशीच्या तशीच ठेवण्यात आली होती. ‘जागृती’मध्ये शक्तीचे काम करणारा रतन कुमार म्हणजे सईद नाझीर अली हा त्याच्या कुटुंबाबरोबर दरम्यानच्या काळात पाकिस्तानात गेला होता आणि त्यानेच ‘बेदरी’मध्ये शक्तीचेच काम केले होते. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच प्रेक्षकांनी हे तर चौर्यकर्म आहे. हे ओळखले आणि हलकल्लोळ केला. पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने तातडीने त्याची दखल घेऊन त्या चित्रपटावर बंदी घातली होती.

आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -