काजोलचा चित्रपट आला; अजय देवगनने मागितली माफी!

काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटाचा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या क्रेडिट नोटमध्ये गीतकार स्वानंद किरकिरे यांचे नाव नव्हते. त्यामुळे लेखक वरुन ग्रोवर यांनी याविषयी ट्विट करत ही एक लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे. यावर अजय देवगन यांनी माफी मागितली आहे.

Mumbai
ajay devgn
अभिनेता अजय देवगन

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा नवा चित्रपट ‘हेलिकॉप्टर ईला’चा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला. मात्र रविवारी रात्री या ट्रेलरमुळे अजय देवगनला माफी मागावी लागली. या चित्रपटाच्या क्रेडिट नोटमध्ये मोठी चूक झाली आहे. यामध्ये अभिनेता-अभिनेत्री पासून गायकांपर्यंत सर्वांची नावे होती, परंतु गीतकार स्वानंद किरकिरे यांचे नावच नव्हते. ही बाब  ‘सेक्रेड गेम्स’चे लेखक वरुन ग्रोवर यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत ट्वीट करुन ही एक लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले. यावर अजय देवगनने माफी मागितली आहे.

वरुन ग्रोवर काय म्हणाले ट्विटमध्ये?

लेखक वरुन ग्रोवर काजोलच्या ‘हेलिकॉप्टर ईला’ या चित्रपटावर ट्विट करताना म्हणाले की, नवीन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गीतकाराव्यतिरिक्त तुम्ही सगळ्या लोकांची नावे वाचू शकता. यावरून आपण समजू शकतो की, ‘चित्रपट निर्मात्यांसाठी आपण किती महत्त्वाचे आहोत!’ त्याचबरोबर ही एक लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अजय देवगनचा माफीनामा

या ट्विटला अजय देवगनने गांभीर्याने घेतले. त्यांनी लगेच या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, ‘अनावधानाने ही चूक झाली असून स्वानंद यांचे नाव टाकण्यास आम्ही विसरलो आहोत. त्याबद्दल माफी मागतो आणि या चुकीला आम्ही दुरुस्तही करत आहोत’.

स्वानंद किरकिरे यांनी मानले धन्यवाद

अजय देवगनच्या ट्विटनंतर स्वानंद किरकिरे यांनी अजय देवगन यांचे धन्यवाद मानले आहे.