UP Hathras: नवाजुद्दिनलाही बसलेत जातीयतेचे चटके; गावात अद्याप मानाचे स्थान नाही

नवाजुद्दिन सिद्दिकी

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीला आज कोण नाही ओळखत. समांतर सिनेमे, व्यावसायिक चित्रपट ते वेब सिरीज गाजवलेला हा कलाकार तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका छोटाश्या गावातून आलेल्या नवाजुद्दिनने मेहनतीने आज सिनेसृष्टीत मानाचे स्थान निर्माण केले आहे. मात्र त्याच्या गावात अद्याप त्याला ते स्थान मिळालेले नाही. कारण जात आडवी आली? हो, नवाजुद्दिनसारख्या कलाकाराला देखील जातीयतेचे चटके बसलेले आहेत. अजूनही त्याच्या गावात त्याला नातेवाईंकामध्ये मिसळू दिले जात नाही, असा धक्कादायक अनुभव नवाजुद्दिनने एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना सांगितला.

हाथरस येथील दलित पीडितेवर बलात्कारानंतर पुन्हा एकदा जातीय अत्याचाराचा मुद्दा समोर आला आहे. त्यावर एनडीटीव्हीशी बोलताना नवाजुद्दिन म्हणाला की, आपल्या समाजात जाती व्यवस्थेची मुळं अतिशय खोलवर रुजलेली आहेत. ही जातीची जोखडं आता उखडून फेकायला हवीत. यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. “माझी आजी ही निम्न जातीतील होती. त्यामुळे माझ्या कुटुंबावर गावातल्या नातेवाईकांनी बहिष्कार टाकलेला आहे. अद्यापही आमचा स्वीकार केलेला नाही.”, असे सांगताना नवाजुद्दिन म्हणतो की, हाथरस सारख्या घटना दुःखद आणि मन हेलावणाऱ्या आहेत. समाजातील चांगल्या लोकांनी याविरोधात आता आवाज उचलायला हवा.

आपला अनुभव कथन करताना नवाजुद्दिन पुढे म्हणतो की, “माझी आजी निम्न जातीतील होती, तर आमचे कुटुंब शेख नावाचे होते. या कारणामुळेच गावातील लोक आजही आमचा दुस्वास करतात. भलेही शहरात जाती-पातीला फार महत्त्व दिले जात नाही, तरिही ग्रामीण भारतात जाती व्यवस्था अजूनही बळकट आहे. गावात अजुनही छोट्या जाती, मोठ्या जाती असा भेदभाव पाळला जातो.” गावातील लोकांना फरक नाही पडत की तुम्ही बॉलिवूड स्टार आहात की श्रीमंत आहात. त्यांना फक्त जातीशी मतलब असतो.