भाग्यश्रीच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

Mumbai
Bhagyashree at Carve Your Life

चित्रपटात काम करायचे म्हणजे त्यात करिअर करायलाच पाहिजे असे नाही. भाग्यश्री पटवर्धन मालिकेत काम करु लागली ती या हेतुनेच. अमोल पालेकरनी तीला आपल्या मालिकेत संधी दिली. त्याचा परिणाम असा झाला की ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटासाठी राजश्री प्रॉडक्शनकडून तीला बोलावणे आले. यातसुद्धा तीने केवळ अनुभव म्हणून चित्रपटात काम केले. पहिल्या पदार्पणातच यश हे सगळ्याच अभिनेत्रींच्या बाबतीत घडत नाही. ते नेमके भाग्यश्रीच्या बाबतीत घडले. खरतर लोकप्रियतेचा आनंद घेत असताना तीला पुढे अनेक चित्रपट स्वीकारता आले असते. पण संसाराचे काय हा एकच ध्यास तीने घेतला आणि तीने चित्रपटात काम करणे थांबवले. पहिलं संसाराला आणि नंतर करिअरला प्राधान्य देणारी ही अभिनेत्री याही कारणाने अनेकांची फेव्हरेट अभिनेत्री झाली. ‘कार्व्ह युवर लाईफ’ हे डॉ. प्रेम जग्यासी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते झाले.

पुस्तकाचा विषय, त्यात मांडलेले विचार आणि जगण्यासाठी दिलेली प्रेरणा या सार्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित व्हावे हेसुद्धा ठरवले जाते. ‘कार्व्ह युवर लाईफ’ या पुस्तकात लोकांना ‘स्व’त्वाची जाणीव करुन दिलेली आहे. जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिनेत्री भाग्यश्री हिने आपल्या वैयक्तीक आणि चित्रपट कारकीर्दीत याच विचारांना प्राधान्य दिलेले आहे. तिच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणे हे लेखकाला स्वत:ला आनंदाचे वाटलेले आहे. स्वत:च्या अटींनुसार आयुष्य जगल्याने स्वत:बरोबर कुटुंबाचेही भले झाले असल्याचे भाग्यश्रीने आपले मत व्यक्त केलेले आहे.