‘कोर्ट’च्या चैतन्य ताम्हाणेचे यश; ‘द डिसायपल’ला आंतरराष्ट्रीय बेस्ट स्क्रिनप्ले अवॉर्ड

Chaitanya Tamhane film The Disciple
चैतन्य ताम्हाणे

कोर्ट या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा मराठमोळा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चैतन्यने दिग्दर्शित केलेल्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड मिळाला आहे. या चित्रपटाला मिळालेला हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याआधी FIPRESCI कडून आंतरराष्ट्रीय क्रिटिक्स पुरस्काराने या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे व्हेनिस चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धा विभागात २० वर्षांनंतर पोहोचणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

या अवॉर्डनंतर चैतन्यने सांगितले की, “हा चित्रपट लिहिणे माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक अनुभव होता. व्हेनिसमध्ये मिळालेला हा बहुमान भविष्यात मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल. हा पुरस्कार मी त्या सर्व संगीतकार, संशोधक, लेखक आणि इतिहास तज्ज्ञांना समर्पित करतोय ज्यांनी भारतीय संगीत जगभरात नेण्यासाठी मला प्रोत्साहित केले.” यापुर्वी २०१४ मध्ये चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट चित्रपटाची याच महोत्सवातील हॉरिझन विभागात निवड झाली होती.

कोरोना काळात पहिल्यांदाच व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २ ते १२ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडला. ४ सप्टेंबर रोजी ‘द डिसायपल’चे स्क्रिनिंग पार पडले होते. शनिवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर म्हणाले की, “व्हेनिसमध्ये बेस्ट स्क्रिन प्ले अवॉर्ड प्राप्त करणे ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. मी चैतन्यचा आभारी आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय.”

मीरा नायर यांच्यानंतर युरोपीय चित्रपट महोत्सवात मुख्य श्रेणीत पुरस्कार मिळवणारा चैतन्य ताम्हाणे हा सर्वात कमी वयाचा पहिला दिग्दर्शक, लेखक बनला आहे. द डिसायपलमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शास्त्रीय संगीतकाराचे जग दाखविण्यात आले आहे. चित्रपटात शास्त्रीय गायक आदित्य मोडकने मुख्य भूमिका साकारली आहे.