‘चला, वाचू या’ नामवंत कलाकारांचे ऑनलाईन अभिवाचन

mumbai

व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन रविवार २८ जून रोजी साजरा होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत होणारा हा कार्यक्रम यावेळी लॉकडाऊनमुळे सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन होणार आहे. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, यतीन कार्येकर, डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री नेहा जोशी आणि स्पृहा जोशी निमंत्रित अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट या यू ट्यूब चॅनेलवरुन या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

जून २०१५ पासून सुरु झालेला ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम मुंबईतील पहिला उपक्रम असून त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचे ५०वे पुष्पनुकतेच अभिनेते व कवी किशोर कदम आणि ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या विशेष अभिवाचनाने साजरे झाले. मतकरी यांनी या सुवर्णमहोत्सवी अभिवाचन पुष्पामध्ये त्यांच्या नव्या कोर्‍या नाटकाचे अभिवाचन केले होते. दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात अभिनेते आनंद इंगळे, संजय कुलकर्णी, आकाश भडसावळे, लेखिका प्रतिमा पंकज आदी कलावंत सहभागी झाले होते.

गेल्या पाच वर्षांत या अनोख्या अभिवाचन उपक्रमात ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, संगीतकार सलील कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, कुमार सोहोनी,विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, प्रमोद पवार, प्रतीक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, प्रमोद पवार, अनंत भावे, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, चिन्मयी सुमीत, गीतकार समीर सामंत, संगीतकार त्यागराज खाडीलकर, साहित्यिक डॉ. महेश केळुसकर, राज्याच्या माजी भाषा संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया विनोद, आदिती सारंगधर, मानसी जोशी, प्रसिध्द निवेदिका उत्तरा मोने आदींसह अनेक नामवंत व नवोदित कलावंतही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमातील सहभागी निमंत्रित अभिवाचक कोणत्याही मानधनाविना सहभागी होतात, हे या चळवळीचे विशेष आहे. आजपर्यंत सुमारे दोनशे कलावंत आणि पंचवीसहून अधिक संघांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. मुंबईपाठोपाठ रश्मिता शहापूरकर यांच्या आशियाना करंडकच्या सहकार्याने पुण्यामध्येही ‘चला, वाचू या’ उपक्रम सुरु झाला आणि त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जितेंद्र जोशी, गजेंद्र अहिरे, मीना प्रभू, अजय पूरकर, दिगपाल लांजेकर पुण्यातील उपक्रमात सहभागी झाले आहेत.

साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here