सैनिकांसाठी छत्रपती शासन चित्रपटाचा खास प्रयोग

Mumbai
Chatrapati Shasan Marathi Movie
छत्रपती शासन

बेळगाव मधील मराठा लाईट इंफँट्रीच्या शार्कत हॉल मध्ये नुकताच छत्रपती शासन सिनेमाचा प्रिमियर शो जवानांसाठी दाखविण्यात आला. प्रबोधन फिल्म्स व सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित छत्रपती शासन हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. याप्रसंगी कर्नल पी. एल. जयराम, सुभेदार मेजर के.हरेकर, चंद्रकांत टिकुर्ले आणि छत्रपती शासन सिनेमाच्या निर्मात्या प्रियांका कागले तसेच रेजिमेंट मधील जवळपास ३०० ते ३५० जवान उपस्थित होते. जवानांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सिनेमाचा खास खेळ जवानांनी देखील मनापासून अनुभवला.

छत्रपती महाराजांची खरी ताकद म्हणजे त्यांचे मावळे. स्वराज्यासाठी प्राण तळहातावर घेऊन जगणारे महाराजांचे मावळे आणि आताचे आपले जवान यांच्या कार्याला नुसतीच ही कलाकृती अर्पण केली नसून सिनेमाच्या मिळकतीतील १० टक्के भाग जवानांच्या हितार्थ देण्यात येणार आहे. यावेळी कर्नल पी. एल. जयराम म्हणाले, चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्तीसोबत सिनेमाचा प्रीमियर करण्याच्या परंपरेला बगल देत आर्मी जवानांसोबत या सिनेमाचा प्रीमियर करण्यात आला ही खरंच वेगळी संकल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेमक्या विचारांबद्दल अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्याचा सगळ्यांनी सखोल विचार केला तर समाजात नक्की चांगल्याप्रकारे बदल होईल. आमच्या जवानांना देखील हुरूप देणारा हा सिनेमा आहे.

१५ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या छत्रपती शासन सिनेमाला आमच्या शुभेच्छा. या प्रसंगी छत्रपती शासन सिनेमाच्या टीम मधील श्रेयस गायकवाड, रवी सोनावणे, गणेश बिच्छेवार, प्रथमेश मांढरे, गौरव सुभेदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here