मोठ्या नावांमुळे ठकलेले, फसलेले प्रेक्षक

इंग्रजांच्या प्रशस्त शामियान्यातलं कतरिनाचं नाचगाणं. त्यातला रोमान्स, हाणामारी, तीरंदाजी, तोफांचे हल्ले असा सगळा व्यावसायीक चित्रपटासाठीचा मालमसाला ठग्स मध्ये पुरेपूर आहे. मात्र इतक्या मोठ्या कथानकाच्या परिघाला बांधून ठेवणारी कथा, पटकथा नाही. त्यामुळे मोठ्या घरचे पोकळ वासे, असा अनुभव ठग्स ऑफ हिंदोस्तान पाहिल्यावर येतो.

Mumbai
Thugs of Hindostan trailer launch LIVE updates
Thugs of Hindostan

यशराज फिल्म्स, आदित्य चोप्रा, अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना अशी मोठी नावं ऐकून आणि ३०० कोटींचं मोठ्ठं बजेट असलेला ठग्स ऑफ हिंदोस्तान मूळ पटकथेकडे दुर्लक्ष झाल्यानं साफ फसलेला आहे. मल्टीस्टारकास्टच्या प्रयत्नात संवाद, कथा आणि पटकथेकडे साफ दुर्लक्ष झाल्याने चित्रपट बाळबोध झाला आहेच. पण ट्रेलर पाहून ज्या अपेक्षेने प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपट पाहायला जाईल त्यांचा अपेक्षाभंग होणार आहे.लहानपणी आपण चांदोबातल्या कथा वाचलेल्या असतात. हॉलिवूडपटातल्या पायरेट्स ऑफ द कॅरेबियन आपल्याला माहित असतो. समुद्री चाच्यांचे कथानक असलेल्या हॉलिवूडपटांच्या प्रेमात पडलेल्यांचाही ठग्स..कडून भ्रमनिरस होतो. एका जहाजातून दुसर्‍या जहाजावर उंच आडव्यातिडव्या लांब उड्या घेत जाणारी अवजड बोजड कपड्यातली हातात तलवारी घेतलेली माणसं. समुद्रातल्या कुठल्याश्या बेटावरून इंग्रजांविरोधात केला जाणारा चाचेसदृश्य क्रांतीकारकांचा लढा. इंग्रजांवर हल्ला झाल्यावर जहाजावर विनाकारण घिरट्या घालणारं गरूड, दुर्लक्षित अशा सागरी किल्ल्यावर असलेला क्रांतीकारकांचा तळ. दिवे, मशाली, पेटवलेले जंगलातले रस्ते, अंधारल्या डोंगर गुहा, इंग्रजांच्या प्रशस्त शामियान्यातलं कतरिनाचं नाचगाणं. त्यातला रोमान्स, हाणामारी, तीरंदाजी, तोफांचे हल्ले असा सगळा व्यावसायीक चित्रपटासाठीचा मालमसाला ठग्स मध्ये पुरेपूर आहे. मात्र इतक्या मोठ्या कथानकाच्या परिघाला बांधून ठेवणारी कथा, पटकथा नाही. त्यामुळे मोठ्या घरचे पोकळ वासे, असा अनुभव ठग्स ऑफ हिंदोस्तान पाहिल्यावर येतो.

मनोजकुमारनं १९८१ मध्ये क्रांती नावाचा मल्टीस्टारर सिनेमा बनवला होता. त्यात सांगा नावाचा ज्येष्ठ क्रांतीकारक दिलीप कुमार होते. तर मनोज कुमार नेहमीप्रमाणे भारत कुमार या तरुण क्रांतीकारकाच्या भूमिकेत होता. इंग्रजांविरोधात जहाजावर लढलेला हा हिंदी पडद्यावरचा पहिला लढा होता. आता काळ बदललाय, पटकथा, संवाद, गाण्यांचं महत्व त्यातुलनेत आता तितकसं राहिलेलं नाही. ठग्स पाहिल्यावर लक्षात येतं. जवळपास तशाच कथानकाला अत्याधुनिक ग्राफीक्सच्या माध्यमाची जोड देऊन ठग्स… बनवण्यात आला आहे. चित्रपटाचा आलेख आणि व्याप्ती लक्षात घेता आणि अभिनेत्यांची निवड पाहाता आमिर, अमिताभला अक्षरशः वाया घालवलं आहे. संवाद लेखकाने दमदार डायलॉगबाजीचा केलेला प्रयत्न पटकथेवर काम न झाल्याने तोकडा पडतो. अमिताभच्या तुलनेत आमिर खानला पडद्यावर जास्त वाव आहे. त्याने साकारलेला फिरंगी मनोरंजक झालाय, मात्र अमिताभच्या संवादफेकीच्या शैलीचा पुरेसा वापर झालेला नाही. अमिताभची काम करण्याची उर्जा या वयातही कायम असल्याचं चित्रपटात जाणवतं.

इंग्रजांना भारताच्या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये आपली सत्ता कायम करायची आहे. तिथल्या राजे, सुभेदारांना मंडलिक करून ब्रिटीशांना इथल्या मुलूखांवर अंमल ठेवायचा आहे. खुदाबक्ष आझाद (अमिताभ)ला हे मंजूर नाही. त्यामुळे तो फातिमा शेख (जफीरा) आणि क्रांतीकारांची टोळी उभारून सशस्त्र लढा उभारतो. यातून इंग्रजांच्या जहाजांवर हल्ले केले जातात. या जहाजांतून मजूर म्हणून गरीब भारतीयांची तस्करी होत आहे. तलवारबाजीत निष्णात असलेल्या आझादला जेरबंद करणं इंग्रजांना शक्य नसतं. त्यासाठी सशस्त्र लढाईपेक्षा धोक्याचा विश्वासघाताचा हत्यारासारखा वापर करण्याची व्यूहरचना इंग्रज कमांडर जॉन क्लाईव्हने केलेली आहे. आता विश्वासघाताचा मेरूमणी असलेला फिरंगी (आमिर खान) हा ठकास महाठक इंग्रजांना सामील होतो. तिथून विश्वासघात-प्रतिघाताची लढाई सुरू होते. हे घात करणारे सगळेच ठग्स आहेत. ही सगळी मंडळी पावलोपावली नातातल्या माणसांना, मित्रांनाही ठकवणारे आहेत. आता यातल्या ठकांच्या महाठक डावपेचांचा पट म्हणजे ठग्स ऑफ हिंदोस्तानचा पडदा.

मोठाले रंगीबेरंगी सेट्स, रंगीत प्रकाशातल्या कॅमेर्‍यांचे वेळोवेळी बदणारे कोन असले तरी बाळबोध ग्राफिक्समुळे रसभंग होतो. पटकथाच विस्कळीत असल्याने आमिर, अमिताभ असतानाही संवादांची जुगलबंदी रंगत नाही. चित्रपटातील प्रसंगातला समन्वय बर्‍याच ठिकाणी हरवलेला आहे. त्यामुळे पडद्यावर घडणार्‍या प्रसंगाचे संदर्भ अनेक ठिकाणी लागत नाहीत. ठगांचंच कथानक असल्याने सस्पेन्सला मोठा वाव होता. पण त्यातील उत्सुकता कायम राखण्याचा दिग्दर्शक विजय आचार्यने केलेला प्रयत्न कमालीचा तोकडा पडतो. त्यामुळे कथेतल्या पुढच्या प्रसंगांचा पुरता अंदाज येतो. कथानक आजच्या काळातलं नाही. त्यातच ते वास्तववादीही नाही. परिणामी प्रेक्षकांला चित्रपटाशी समरस होणं जड जातं. काल्पनीक प्रसंग, ग्राफिक्स, अवाढव्या सेट्स आणि मोठ्या स्टारकास्टमध्ये अडकून पडल्याने दिग्दर्शकाचं पटकथेकडे साफ दुर्लक्ष झालं आहे.

मसाला चित्रपटांच्या प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन म्हणून ठग्स…पहायला हरकत नाही. सुरैया नावाची नर्तिका असलेल्या कतरिनाचं छान छान दिसणं, डोळ्यांचे कातिल हावभाव, चालणं, तिचं मैफिलीतलं नाचगाणं, अजय अतुलचं धमाल संगीत चित्रपटात भरपूर आहे. फातिमा शेखने साकारलेली जफीरा लक्षात राहते. आमिर खानचा फिरंगी धमाल आणतो तर अमिताभच्या आवाज आणि क्षमतेचा पूर्ण वापर झाला नसल्याने ठग्स…मिळमिळीत होतो. जेवढा विचार त्याच्या ग्राफिक्स, साऊंडइफेक्ट्स आणि मोठ्या बजेटवर चित्रपटात केला गेलाय त्याच्या निम्मा तरी कथा, पटकथा आणि संवादावर केला गेला असता तरी ठग्स सुसह्य झाला असता. आमिर, अमिताभ, यशराजचं नाव पाहून ठग्स…ला जाणारे प्रेक्षक या मोठ्या नावांकडून असलेल्या अपेक्षांच्या बाबतीत ठकवले जाण्याचीच शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here