‘या’ चित्रपटांची आठवण करून देतोय सुशांत-श्रद्धाचा ‘छिछोरे’!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी छिछोरे या चित्रपटाचा ट्रेलर यंदाच्या फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने लाँच करण्यात आला आहे.

Mumbai
chchichore film
छिछोरे फिल्म

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी छिछोरे या चित्रपटाचा ट्रेलर यंदाच्या फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने लाँच करण्यात आला आहे. कॉलेजमधील अविस्मरणीय दिवस ते कॉलेजनंतरचं वास्तववादी आयुष्य यांच्यातील फरक या ट्रेलरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यामुळे काही प्रमाणात स्टुडंट ऑफ दि इअर तसेच जो जिता वही सिकंदर चित्रपटांमधील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा याची पुनरावृत्ती छिछोरे चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच कॉलेजमधील मित्रांची यारी बऱ्याच वर्षांनंतर देखील कायम टिकून राहते, याचेही दर्शन अनेक हिंदी सिनेमांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यामुळे छिछोरे चित्रपट ठराविक बॉलीवूड सिनेमांचे मिश्रण वाटत असून मजेशीर पद्धतीने सादर करण्यात आले आहे.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटणारे मित्र हे एक व्यक्ती म्हणूनही आपल्याला कायमच घडवत असतात. अशाच काही अतरंगी आणि हवाहव्याशा मित्रांचं सुरेख नातं ‘छिछोरे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसिन यांच्या भूमिका असणाऱ्या छिछोरे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा डोकावण्याची संधी मिळणार आहे. तर, मैत्रीचं हे नातं म्हणजे फक्त धमाल, मजा मस्तीतच एकत्र असणं नव्हे, तर उतारवयातही एकमेकांचा आधार होत एकत्रपणाची भावना तशीच कायम असणं, हा संदेश या ट्रेलरच्या माध्यमातून मिळत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शीत होत आहे.