BMC ची कार्यालयाला नोटीसीनंतर कंगणाला आणखी एक दणका!

kanganaranaut
कंगना रणावत

गेले काही दिवस चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणावत आज अखेर मुंबईत येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगनावर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. त्यानंतर  मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. मात्र यानंतरही कंगना मागचे विघ्न काही कमी झालेलं नाही.

कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. पीसी श्रीराम यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

“एका चित्रपटात कंगना रणावतची मुख्य भूमिका असल्यामुळे तो चित्रपट करण्यास मी नकार दिला आहे. हा चित्रपट करत असताना मला मनातल्या मनात फार अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे माझं मत मी निर्मात्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीदेखील माझ्या मताचा आदर केला आहे.जेव्हा एखादी गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हाच असं काहीसं घडतं”, असं पीसी श्रीराम म्हणाले.

आता पीसी श्रीराम यांनी कंगनाच्या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाहीये. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यात अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान आता कंगना मुंबईकडे यायला निघाली आहे. त्याआधी तिने ट्विट केलं आहे, ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे. आपल्याला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.