‘इसारलंय’,म्हणारा पांडू ‘लॉकडाऊन’मध्ये काय करतो वाचा

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वॉरंटाईनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी प्रल्हाद सोबत साधलेला हा खास संवाद.

Mumbai
prahlad kudtarkar
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर

“इसारलंय”, “त्या माका काय माहित?”, हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे डायलॉग्स लोकप्रिय झाले आहेत त्या ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वॉरंटाईनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी प्रल्हाद सोबत साधलेला हा खास संवाद

कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे आणि त्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, तू तुझ्या प्रेक्षक चाहत्यांना काय आवाहन करशील?

कोरोना या विषाणूने अख्ख्या जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. पण आपण या लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया. कारण जग आता जरी थांबलं असलं तरी ते लॉकडाऊन नंतर पाळणार आहे आणि अधिक वेगाने पळणार आहे. लॉक डाऊन म्हणजे नजरकैद नसून सरकारने आपली घेतलेली काळजी आहे.

या लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ तू कसा घालवतोय?

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या फावल्या वेळात आपण अनेक गोष्टी करू शकतो. मी खूप वाचन करतोय, अनेक नवीन पुस्तकं वाचतोय. जे माझ्या मनात येईल ते मी कागदावर उतारावतोय. मालिका लिहीत असताना अनेकदा सिनेमे, वेबसिरीज पाहायच्या राहून जातात, ते मी आता बघतोय आणि अर्थातच घरातल्या काही कामांमध्ये हातभार लावतोय. नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय.

लोक लॉकडाऊन असताना देखील अनेक ठिकाणी गर्दी करतात आहेत, त्यांना तू काय सांगशील?

लोक भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करत आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि सरकारने आपल्यावर नियम लादले नाही आहेत पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळूया. घरात राहूया

सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरत आहेत, त्याबद्दल तू सर्वांना काय सांगशील?

whatsapp किंवा फेसबुकवर अनेक मेसेजेसच्या रूपात बऱ्याच अफवा पसरतात, त्या अफवांकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करूया. आपले माननीय मुख्यमंत्री आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. लाईव्ह येऊन अगदी घरातील कुटुंबियांप्रमाणे आपल्याशी गप्पा मारत आहेत, आपल्याला सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करूया.

तू गाव गाता गाजली या मालिकेतील कलाकारांसोबत जनजागृतीसाठी एक व्हिडिओ देखील केला आहेस, त्याबद्दल थोडक्यात सांगशील.

अशा कठीण काळात जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांसाठी मालवणी भाषेत एक व्हिडीओ बनवला ज्यात आम्ही त्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील जनता हा लॉकडाऊन नक्की यशस्वी करेल याची मला खात्री आहे.