Lockdown – पडद्यामागे काम करणाऱ्यांच्या मदतीला ‘मुळशी पॅटर्न’!

Pune
mulshi pattern
मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे, यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. या लॉकडाऊनमुळे मराठी चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे परिणामी चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या पडद्यामागील कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुण्यातील कामगारांना साडे सात लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

या विषयी बोलताना युवा उद्योजक पुनीत बालन म्हणाले, सध्या सर्वत्र  लाँकडाऊन असल्याने सिनेक्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींचे हाल होत आहेत. या लोकांसाठी मदत करण्याचे आवाहन ‘मुळशी पॅटर्न’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी मला केले, त्याला प्रतिसाद देत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जे  कामगार कार्यरत होते त्यांना २.५० लाख रुपयांची मदत केली. तसेच  मी चित्रपट महामंडळाकडे पाच लाख रुपये देणगीस्वरुपात देत आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना विनंती आहे की त्यांनी  ही रक्कम पुण्यातील सिने – नाट्यक्षेत्र, दूरचित्रवाणी व सांस्कृतिक क्षेत्रातील बँकस्टेज आर्टिस्ट आणि ज्युनियर अँक्टर यांना वितरीत करावी जेणेकरून त्यांना किमान एक महिन्यासाठी किराणामाल, जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील. दरम्यान, भविष्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर आम्ही या सर्व कामगारांना आणखी मदत करणार आहोत असेही पुनीत बालन यांनी सांगीतले.

बॉलिवूडकरही आले मदतीला

अजय देवगण,चित्रपट निर्माता रोहीत शेट्टी यानंदेखील ५१ लाखांचा निधी दिला होता. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कलाकारही कामगारांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तर दुसरीकडे अभिनेता सलमान खानंही FWICE कडे २५ हजार कामगारांचे अकाउंट नंबर मागितले आहेत. याद्वारे थेट त्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमारनंही पंतप्रधान मदत निधीमध्ये २५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. कार्तिक आर्यन,  अनुष्का शर्मा, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे.