‘दंगल गर्ल’ जायरानेही केला डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध

अभिनेत्री अपर्णा सेन नंतर बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीमनेही प. बंगालमधील डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध केला आहे.

New Delhi
Zaira Wasim
अभिनेत्री जायरा वसीम

पश्चिम बंगाल येथील सेठ सुखलाल कर्णी मेमोरियल (एसएसकेएम) रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्येही कनिष्ठ डॉक्टर संपावर असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांमधील वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. याबाबत अभिनेत्री अपर्णा सेननंतर ‘दंगल गर्ल’ जायरा वसीमनेसुद्धा सोशल मिडीयाद्वारे डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध केला आहे.

डॉक्टरांच्या समर्थनार्थ जायराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये जायराने माध्यमांना प्रश्न करत सद्यस्थिती आपल्या राष्ट्रासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.

जायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांविरोधात सुरु असलेली हिंसा दुर्दैवी आणि त्रासदायक आहे. हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. माध्यमे अशा घटना का कव्हर करत नाही? पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्लांनंतर ३०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. ही स्थिती आपल्या देशासाठी योग्य नाही’, असे परखड मत जायराने आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.