Drugs Case: अर्जुन रामपाल NCB कार्यालयात दाखल, कसून होणार चौकशी!

अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ

अभिनेता अर्जुन रामपाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. NCB लवकरच अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी करणार असून अर्जुन एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे. तर अर्जुन रामपाल यांची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

खास मित्राला एनसीबीकडून अटक

एनसीबीने आज सकाळी अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे. पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं NDPS कायद्याअंतर्गत येतात. या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.