घरमनोरंजनआमीर करतो मराठी भाषेचा सन्मान

आमीर करतो मराठी भाषेचा सन्मान

Subscribe

महाराष्ट्रात रहायचे म्हणजे मराठी भाषा यायलाच पाहिजे असे बॉलिवूड कलाकारांना फक्त वाटतच नाही तर ते जाहीरपणे तसे बोलूनही दाखवतात आणि मराठी भाषा आपल्याला येत नाही याची खंतही व्यक्त करतात आणि माफीही मागतात. काहींनी तर मराठी भाषा जाणून घेतलेली आहे. आवश्यक तिथे बोलण्याचा प्रयत्नही करतात. अक्षय कुमार, अनिल कपूर, जितेंद्र याबाबतीत आग्रही राहिलेले आहेत. पण या सर्वांत अभिमान वाटावा अशी गोष्ट कोणी केली असेल तर ती परफेक्टशनिस्ट आमीर खान याने. प्रत्येक गोष्टीच्याबाबतीत तो सतर्क असतो.

आपल्याला मराठी भाषा यायला पाहिजे आणि ती जाहीरपणे बोलताही आली पाहिजेच. या एका हेतुने त्याने जयवंत चुनेकर यांच्याकडे मराठी भाषा शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून घेतलेली आहे. एका अर्थाने त्याने चुनेकरांना मराठी भाषेतले आपला गुरु मानले. चुनेकर हे आता हयातीत नाहीत परंतु मराठीच्या ध्यासाने शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनमोल कामगिरी केलेली आहे. अमराठींसाठी मराठीचे अध्यापन त्यांनी केले होते. मराठी शब्दकोष निर्मिती करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे हे कार्य बघून आमीर खान स्वत: भारावलेले होते. माझ्याबरोबर अन्य अमराठी तसेच परदेशी नागरिकालाही मराठी भाषा अवगत होण्याच्यादृष्टीने ‘माय मराठी’ या पुस्तकाची निर्मिती करायला लावली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यासाठी जे अर्थसहाय्य अपेक्षित होते ते आमीर खान याने दिले होते.

- Advertisement -

हे सर्व आठवण्यामागचे कारण म्हणजे 27 फेब्रुवारी ही वि. वा. शिरवाडकरांची जयंती सर्वत्र ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने ‘मराठी अभ्यास केंद्र’ यांनी हेच निमित्त घेऊन मराठी भाषेसाठी कार्य करणार्या दोन व्यक्तींना भाषा पुरस्कार देण्याचे ठरवलेले आहे. त्यात ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ दिवंगत जयवंत चुनेकर यांच्या नावाने नांदेडचे शिवाजी आंबुलगेकर यांना देण्याचे जाहीर झालेले आहे. दुसरा पुरस्कार अभिवक्ता दिवंगत शांताराम दातार यांच्या नावाचा आहे. ‘मराठी भाषा आग्रही’ असे या पुरस्काराचे नाव आहे. बेळगावचे ‘दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ’ यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित झालेले आहे. यंदाच्या वर्षापासून हे पुरस्कार दिले जाणार आहेत. ‘मराठी अभ्यास केंद्र’ ही विविध कृती गटांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणारी संस्था आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे, ती टिकली तर महाराष्ट्र टिकेल या एका हेतुने ज्या अनेक व्यक्तींनी उल्लेखनीय काम केलेले आहे, त्यात दातार, चुनेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. हयातीत असताना केंद्राला प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने या दोन्हीं व्यक्तींनी केलेले काम प्रशंसनीय आहे. सध्या डॉ. दीपक पवार हे या केंद्राचे अध्यक्ष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -