नशिबवान…नशिबाचा बदलणारा खेळ

एखाद्या व्यक्तीचं नशीब कधी उजाडेल काही सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचा नशिबावर विश्वास असतोच असं नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट अशी घडते की तुम्हाला नशिबावर विश्वास ठेवावा लागतो. ‘भगवान देता है तो छप्पर फाडके देता है’ असंच काहीसं झालंय चित्रपटाचा नायक बबन बरोबर...

Mumbai
nashibwaan

बबन म्हणजेच भालचंद्र (भाऊ) कदम महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत असतो. कमी पगाराची नोकरी, चाळीतलं छोटं घर, घरासाठी घेतलेलं कर्ज, कर्जाचे हप्ते घेण्यासाठी सतत येणारा पतपेढीचा माणूस या रोजच्या रडगाण्याला बबन कंटाळलेला असतो. पण एकदिवशी असं काही होतं आणि बबनचं नशिबचं पालटतं.

एक दिवस बबन दोन दुकानांमधली बोळ साफ करायला जातो. साफ करताना तो त्याचा झाडू बाजूच्या भिंतीवर आपटतो आणि काय आश्चर्य बबनचं नशीबच फळफळतं. हातातला झाडू भिंतीवर ठोकल्यानंतर विटेचा एक तुकडा खाली पडतो. त्यानंतर सहज बबन आत डोकावतो…तर समोर त्याचं आयुष्य बदलून टाकणारं घबाडच त्याची वाट बघत असतं. पहिल्यांदाच आपल्या नशिबाचं दार उडल्यामुळे बबनही त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवतो आणि बबनच्या भरभराटीला सुरुवात होते. पण हे नशीब फार काळ बबनची सोबत करत नाही. शेवटी नशीबच ते कधीतरी पालटणारच. आपल्याला नशिबानं मिळालेलं बबनला सांभाळता येत नाही; पण तरीही बबन नशिबवान ठरतोच.

नेमकं नशीब कोणत्या रूपाने बबनकडे येतं? बबनचं नशीब कसं पालटतं? बबनच्या आयुष्यात येणारे चढउतारामुळे बबनच्या आयुष्यात कसे बदल होतात या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला नशीबवान चित्रपट बघावा लागेल.

nashibwaan

चित्रपटात बबनच्या बायकोच्या भूमिकेत असणार्‍या मिताली जगतापने उत्तम भूमिका निभावली आहे. तर बबनच्या कामावर त्यांच्या सोबत असणार्‍या नेहा जोशीनेही भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. या तिघांची उत्तम केमिस्ट्री चित्रपटात जमून आली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात इतर कलाकारांच्या भूमिकाही चांगल्या वठल्या आहेत. मूळ लोकेशन्सवर चित्रपट शूट केल्यामुळे चित्रपटात आणखी मनाला भिडतो. मात्र सफाई कामगारांच्या जीवनावर आधारीत असलेल्या या चित्रपटात म्हणावी तशी त्यांची जीवनशैली दाखवण्यात लेखक, दिग्दर्शक कमी पडला आहे. संपूर्ण चित्रपटात बबन केवळ ती एकच गल्लीची सतत साफसफाई करताना दाखवला आहे. हे पटत नाही. त्याचप्रमाणे बबनच्या कामावर असणारे त्याचे इतर मित्र केवळ बबनबरोबर सतत दारू पिताना दाखवले आहेत. एकदाही सफाईसाठी त्यांच्या हातात झाडू दिसत नाही. त्याचप्रमाणे बबन पेट्रोल पंपवर तीन हजारासाठी पैशाने भरलेली बॅग सगळ्यांसमोर उघडतो. असे चित्रपटातील अनेक प्रसंग पटत नाहीत.

चित्रपटातील केवळ ‘उनाड पाखरांची झेप’ हे गाणं वगळता इतर कोणतीच गाणी ओठावर रेंगाळत नाही. ‘उनाड पाखरांची झेप’हे गाणं जमून आलं आहे. त्याचप्रमाणे पार्श्वसंगीतही तितकंसं प्रसंगांना साजेसं नाही. अनेक प्रसंगांमध्ये खास करून ज्याठिकाणी बबनचं नशीब पालटतं त्या ठिकाणी दिलेलं पार्श्वसंगीत एखाद्या क्राईम दृश्याला शोभेल असंच आहे, त्यामुळे हे पार्श्वसंगीत कानाला खटकतं.

हा सिनेमा प्रसिद्ध हिंदी साहित्यिक उद्य प्रकाश यांच्या ‘दिल्ली की दिवार’ या कथेवर आधारीत आहे. या कथेचा गाभा चित्रपटात येत असला तरी बबनच्या प्रगती ते अधोगतीचा काळ रेखाटताना चित्रपट कमी पडतो. बाकी चित्रपटात नेहमीप्रमाणेच भाऊ कदम यांनी गंमत आणली आहे. त्यामुळे तुम्ही भाऊ कदम यांचे फॅन असाल तर नक्कीच हा चित्रपट बघणं तुमच्यासाठी ‘नशीबवान’ ठरेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here