घरमनोरंजननटले मी तुमच्यासाठी

नटले मी तुमच्यासाठी

Subscribe

भारत हा एकमेव असा देश आहे की ज्यामध्ये लोककलेचे विविध प्रकार पहायला मिळतात. जगाने विज्ञानाला स्वीकारलेले आहे. असं असतानासुद्धा आजही परंपरेने आलेली लोककला काही व्यक्तींकडून, समाजाकडून जपली जात आहे. लावणी हा त्यातलाच एक प्रकार, जिचा प्रचार आणि प्रसार जगभर झालेला आहे. इतिहास काळापासून सुरू असलेली ही लोककला काही समाजांनी स्वीकारली, आपल्या पद्धतीने ती जपली. ती लोकांना ज्ञात व्हावी या दृष्टीने ‘काली बिल्ली प्रॉडक्शन’ने ‘संगीत बारी’ या नावाने त्याचे कार्यक्रम करणे सुरू केलेले आहे. एनसीपीएनेही 25 जानेवारीला टाटा थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या निमित्ताने ‘नटले मी तुमच्यासाठी’ अशी काहीशी दिलखेचक अदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळले.

आयोजक सांगतात म्हणून पूर्वी मराठी वाद्यवृंदात एखाद दुसरी लावणी सादर केली जात होती. तमाशा हा स्वतंत्र कार्यक्रम आहे जो परंपरेने आलेले फडाचे मालकच सादर करत होते. त्यात लावणी हमखास पहायला मिळत होती. शहराच्या बाहेर तंबू ठोकून हे कार्यक्रम सादर केले जात होते. मुंबईत मात्र ही परंपरेने आलेली लावणी पहायची झाली तर ठरावीक असेच थिएटर उपलब्ध होते. तिथे सुशिक्षित, बुद्धीजीवी प्रेक्षक जाईलच याची खात्री नव्हती. मग मराठी वाद्यवृंदात या लावणीचा आनंद प्रेक्षकांना घ्यावा लागत होता.

अमेरिकेतील महिलांचा ‘सुंदरा मनामधे भरली’ हा कार्यक्रम मुंबईत दाखल झाला आणि लावणीतही भरपूर मनोरंजन करणार्‍या गोष्टी दडलेल्या आहेत याचा सुगावा लागला आणि महाराष्ट्रातल्या आयोजकांना लावणीवर स्वतंत्र कार्यक्रम असायला हवे याची जाणीव झाली. या कार्यक्रमांना इतका प्रतिसाद मिळाला की, पुरुषवर्गसुद्धा स्त्रीच्या वेषात लावणी सादर करू लागले. लावणी सादर करणार्‍या पुरुषांचीच संख्या जवळजवळ 30-40 आहे. यावरून परंपरेने आलेल्या लावणी नृत्यांगणा, लोककलेतून लावणीच्या क्षेत्रात आलेल्या नृत्यांगणा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, ही कला मुंबई विद्यापीठातून लावणीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शास्त्रीय नृत्यात प्रावीण्य दाखवणार्‍या नृत्यांगणांनीसुद्धा या कलेला आपलेसे केलेले आहे. एकंदरीत काय तर लावणी नृत्य करणार्‍या नृत्यांगणांची नोंद ठेवणे अवघड झालेले आहे इतकी ही कला फोफावलेली आहे.

- Advertisement -

मधल्या काळामध्ये प्रत्येक संध्याकाळ ही प्रत्येक थिएटरवर लावणीचे कार्यक्रम असायचे. आता या कार्यक्रमांना मर्यादा आलेली आहे. त्याला अवकळा येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. स्वतंत्र लेख होऊ शकेल इतक्या समस्या यात दडलेल्या आहेत. ज्या नृत्यांगणेत आत्मविश्वास, गुणवत्ता तिला सातत्य टिकवणे शक्य झालेले आहे. शहरात झपाट्याने प्रेक्षकांच्या अभिरुचीप्रमाणे लावणी बदलल्यामुळे ग्रामीण भागातल्या परंपरेने आलेल्या फडांनासुद्धा आपले रुपरंग बदलावे लागलेले आहे. जी वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर यावी यादृष्टीने भूषण कोरगावकर यांनी ‘संगीत बारी’ हा कार्यक्रम लिहिला ज्याचे दिग्दर्शन सावित्री मेधातुल यांनी केलेले आहे. या कार्यक्रमात परंपरेने आलेल्या नृत्यालाच प्राधान्य दिले जाते. हे करत असताना लावणीचा उगम, त्यातल्या स्त्रियांची त्यावेळची आणि आजची स्थिती याचा मागोवा घेतला जातो.

भातु कोल्हाटी, डोंबारी, कळवात या समाजातल्या स्त्रियांनी या लावणी कलेला केवळ आपलेसे केलेले नाही तर व्यवसाय म्हणूनही स्वीकारलेले आहे. पायाला चाळ बांधणे म्हणजे एकप्रकारे या कलेशी त्या स्त्रीचा विवाहच झाल्याचा रितीरिवाज मानला जात होता. काळाप्रमाणे संगीत बारीची जागा ‘तमाशा’, ‘लावणी प्रधान कार्यक्रम’ या शब्दांनी घेतली आणि ‘संगीत बारी’ हा शब्दच मागे पडला. पुष्पा सातारकर, आकांक्षा कदम, लताबाई वाईकर, चंद्रकांत लाखे, सुनिल जावळे, विनायक जावळे, आनंद साटम, अश्मित कामटे आणि शकुंतला नरे यांचा या संगीत बारीत सहभाग आहे.

- Advertisement -

स्पर्धा तर झालीच पाहिजे
महाराष्ट्रात लोकनृत्याच्या स्पर्धा होतात. परंतु मोठ्या संख्येने महिला वर्ग लावणी नृत्याच्या कार्यक्रमात एकवटलेला आहे त्यांच्यासाठी मात्र अकलुजच्या लावणी महोत्सवात स्पर्धा घेतली जात होती. इथे पारितोषिक मिळवल्यानंतर बरेचसे लावणी संच आपल्या लावणी संचाचे प्रमोशन करण्यासाठी या स्पर्धेचा उल्लेख करत होते. आता ही स्पर्धा पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे लावणी कार्यक्रम सादर करणार्‍या वाद्यवृंदात थोडीशी चिंता निर्माण झाली होती.

मोना डोंगरे-गावडे आणि अजय गावडे यांचे लोककलेत मानाने नाव घेतले जाते. मोना लावणी नृत्यात पारंगत आहे तर अजय वादक कलाकार म्हणून परिचयाचा आहे. या उभयतांकडून लावणी कलावंतांना दिलासा देणारी एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे सारंगखेड गावात महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘चेतक महोत्सव’ भरवला जातो. या महोत्सवात गेली तीन वर्षे मोना लावणीचे कार्यक्रम करत आलेली आहे. त्यामुळे या उभयतांनी स्वत:हून पुढाकार घेऊन लावणीची स्पर्धा भरवली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून बारा लावणी संच त्यात सहभागी झाले होते. स्थानिक प्रेक्षकांकडून त्याला जो काही प्रतिसाद लाभला तो लक्षात घेऊन आयोजकांनी प्रत्येकवर्षी या लावणी महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरवलेले आहे. पहिले बक्षीस 51 हजार होते. आता पुढल्या वर्षापासून एक लाख होणार आहे. या निमित्ताने पुन्हा लावणी स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. याला कारण मोना-अजय हे उभयते सांगता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -