घरमनोरंजनबॉलिवूडी भुतावळ

बॉलिवूडी भुतावळ

Subscribe

अमर कौशिकचा ‘स्त्री’ हा भूतपट बॉक्स ऑफीसवर चांगलंच यश मिळवत आहे. एक भूत पडद्यावर जागं झालं की लगोलग त्याच्या अनेकविध आवृत्या बॉलिवूडमध्ये निघतात. ‘राज २’ आणि ३, तसंच १९२० अशी ही परंपरा आहे. हिंदी पडद्यावरच्या याच भूतपरंपरेचा घेतलेला हा आढावा.

अंधारलेल्या रात्री वारं वावदानात आभाळ बरसतंय. एका निर्जन रस्त्यावर डॉक्टर असलेल्या मनोज कुमारची कार हळूहळू सरकतेय. वायपर खटखट वाजताहेत. निर्मनुष्य रस्त्यावर वादळी वार्‍यात एका झाडाखाली एक पांढरी आकृती पावसात भिजत थांबलीय, ती मनोज कुमारला हात दाखवून थांबायचा इशारा करते.

मनोज कुमार कुठलाही संशय न बाळगता त्या सुंदर आकृतीला आपल्या गाडीत लिफ्ट देतो. कुठं जायचंय…तर ती म्हणते आगे मंझिल है मेरी…वहाँ तक साथ किजिएगा…ही पांढरी आकृती साधना असते. गाडीचा वायपर अचानक बंद पडतो, पुढचं काहीच दिसत नाही. मात्र साधना म्हणते आप गाडी चलाईये…मै देख सकती हूँ…आता वायपरविना असलेल्या काचेतून पावसाळलेल्या रात्री रस्ता पाहणारी भुताटकीच असू शकते, असा विचार मनोज कुमारला येत नाही. तो गाडी तशीच पुढे नेतो आणि साधनाने इशारा केल्यावर एका ठिकाणी थांबतो.

- Advertisement -

पांढर्‍या कपड्यातली साधना हळूच गाडीतून उतरते आणि स्मशानाच्या दिशेने पुढे जाते, कर्रर्रर्रकर करणारा दरवाजा आपोआप उघडतो आणि साधना स्मशानात गायब होते. ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावरही ‘वो कौन थी’ सिनेमाची सुरुवात असते. पुढं ‘वो कौन थी’चा पडद्यावरील अंधार अशाच भीती आणि सस्पेन्सच्या अनेक प्रसंगांनी गडद होत जातो.

बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेला कमाल अमरोहींचा महल त्याआधी म्हणजेच १९४९ मध्ये रिलिज झालेला असतो. हातात सिगार घेतलेला अशोक कुमार गंभीर करारी चेहर्‍याने महलमध्ये एकटाच एका गूढ गाण्याचा वेध घेतोय. आएगा…आएगा …आनेवाला आएगा…हे गाणं मधुबाला बोलतेय. वादळवार्‍यामुळे पण ती स्पष्ट दिसत नाही. अशोक कुमार आवाजाचा कानोसा घेत तिला शोधतोय, पण ती रिकाम्या खोलीतून, महलच्या लांबलचक गॅलरीतून आणि पडवीतल्या झोक्यावरून गायब होतेय. कृष्णधवलचा हा पडदाही गूढ गंभीर, भीतीदायक असतो. राजकुमारी असलेल्या मधुबालाचा मृत्यू झालेला आहे; पण ती दिसतेय, त्यामागची कारणं शोधण्याचा गूढ प्रयत्न महलमध्ये असतो.

- Advertisement -

अशोक कुमारच्या ‘महल’ चित्रपटाचं बिमल रॉय यांनी एडिटींग केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे मधुमती बनवला. मधुमतीमध्ये गूढ गंभीर अतृप्त आत्म्याची जबाबदारी वैजयंतीमालाने ताकदीच्या अभिनयाने समोर आणली. पुनर्जन्मात माधवी, राधा अशा नावे असलेल्या वैजयंतीमालाचा खून होतो. त्यानंतर ती आपल्या मारेकर्‍याला शोध घेण्यासाठी दिलीपकुमारला आपलं अस्तित्व जाणवून देत गाण्यातून आर्जव करते.

विश्वजीतच्या १९६२ मधल्या जुन्या ‘बीस साल बाद’मध्ये एक भयानक हात असतो. हत्यासत्र घडत जातात, त्यावेळी हा हात कुणाचा याचा शोध घेण्याचा प्रयत्न नायक करतो. तर त्यानंतरचा भूतपट म्हणून थेट ‘गुमनाम’ समोर येतो. ऑगाथा ख्रिस्तींच्या कादंबरीवर आधारीत असलेला ‘गुमनाम’ शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवतो. यातही मनोजकुमार असतो, सोबतीला नंदा, हेलन, मेहमूद असतात. ‘गुमनाम है कोई…’हे गाणं भयावह असतं. यातही खून पडतात, हे खून कोण करतंय, या गुमनाम व्यक्तीचा शोध म्हणजे हा चित्रपट. जुन्या काळातल्या या सर्वच चित्रपटांत सस्पेन्स कायम ठेवला जातो. जुन्या जाणत्या दिग्दर्शकांचे संगितकारांचे श्रवणीय गाण्यांचे हे चित्रपट हिंदी पडद्यावरच्या मुख्य प्रवाहातले होते. कथा-पटकथेशी प्रामाणिक होती, त्यामुळे काहीही करून प्रेक्षकांना अचानक घाबरवून सोडण्याचा अट्टाहास त्यात नव्हता. त्यामुळे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट पडद्यावरची भूतं असह्य नव्हती.

थेट हॉररपटाचा त्यापुढचा हा काळ रामसे बंधूंचा. पुरातन काळातल्या कुण्या राजानं पेटीत बंद केलेली भुतं पुढे जागी होतात. ही शेकडो वर्षानं जागी झालेली किळसवाण्या चेहर्‍याची भुतावळं रामसेपटात खूप होती. जोडीला चित्रविचित्र हावभाव करणारा बाबा बुवा आणि एक त्रिशूल किंवा दैवी शक्तीला घाबरणारं भूत. पडका वाडा किंवा बंगला. भिंतीवरच्या तसबिरीच्या डोळ्यांतून उतरणारं रक्त, लाल पांढरे होणारे डोळे आणि खूनसत्र, रामसे बंधूंच्या ‘हॉटेल’ किंवा ‘दरवाजा’ चित्रपटापासून पेटीतून उठलेली ही भुताटकी ऐंशीच्या दशकापर्यंत कायम होती. यातली भुताटकी निर्जन रस्त्यावर कुणालाही लिफ्ट मागून त्याला पडक्या वाड्यात नेऊन त्याची हत्या करते.

या चित्रपटांचाही एक हुकूमी प्रेक्षकवर्ग होता. पण हे सिनेमे बी ग्रेडचे म्हणून मुख्य प्रवाहाकडून दुर्लक्षित केले गेले. पुराना मंदिर, विराना, डाक बंगला अशी भितीदायक नावांच्या भूतपटातले हेमंत बिर्जे, दिपक पराशर, हे त्यातले हक्काचे कलाकार होते. ही भूतं शांत झाली नव्हती तोपर्यंत रामगोपाल वर्माने कल्ट सिनेमांमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. शिवा, द्रोही असे वेगळ्या विषय आशयातून रामूनं ‘रात’ बनवला. यातल्या नायिका रेवतीचे पांढरे होणारे डोळे त्यानं रामसेच्या पडक्या वाड्यातून थेट शहरातल्या जगण्यात आणले. रेवतीला पाहून अंधारलेल्या थिएटरमधले प्रेक्षक कमालीचे घाबरले होते. ‘रात’मध्येही ओम पुरी भूत पळवणारा बाबा होता. पण रामूच्या दिग्दर्शनामुळे तो वास्तववादी वाटल्याने भीतीही वास्तववादी ठरली.

‘रात’ नंतर बर्‍याच काळानं त्याने उर्मिला आणि अजय देवगण, रेखाला घेऊन भूत बनवला. लिफ्टच्या टॉप व्ह्यूमधून फिरणारा कॅमेरा, कारच्या चाकामागे बसवलेल्या कॅमेर्‍याचा कोन, कोपर्‍यातल्या भीतीदायक बाहुलीच्या केसांतून उलगडणारे प्रसंग असं सगळं रामूच्या चित्रपटांत होतं. गूढ आणि हॉररचं एकत्रीकरण म्हणजे रामूचा सिनेमा. पुढे भट कॅम्पने रोमँटीक प्रसंगातून या भुतावळीला आपलंसं केलं, त्यांचा राज हीट झाला आणि पडद्यावरची भूतं प्रणयप्रधान बनली. ‘राज २-३’, ‘रागिनी एमएमएस’, ‘हॉन्टेड ’असे सिक्वेल भूतपटांची रांग लागली. त्यानंतर आता २०१८ मध्ये नुकत्याच आलेल्या स्त्रीपर्यंत पडद्यावर भूतं जागी झाली आहेत. येत्या काळात ही भुतावळ अशीच पडद्यावर कायम राहील. ‘हॉरर’, ‘सस्पेन्स’, ‘थ्रीलर’नंतर रोमँटीक झाल्यानंतर नुकत्याच विनोदी झालेल्या भुतावळीचं प्रेक्षकांनी आताही स्वागत केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -