संथ क्षणांचा फोटोग्राफ

आपल्याला आपल्या जगण्याकडून नेमकं काय हवंय, हे दोघांनाही माहीत नाही किंवा कदाचित पुसटंसं माहीतही असावं, पण कौटुंबिक आणि परिस्थितीच्या रेट्यात ते हरवून गेलंय. त्याचा शोध दोघेही नकळत घेत आहेत. आता हा समान धागा असलेली या दोन व्यक्तीरेखा एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांना एकमेकांसाठी आत्मियता वाटणारंच हे ओघानं आलंच. दिग्दर्शक रितेश बत्राने निखळ आत्मियता आणि प्रेम यातली सीमारेषा पडद्यावर कायमच धूसर ठेवली आहे.

Mumbai
Photograph

छायाचित्र एका क्षणातच थांबलेलं असतं, गेलेले क्षण त्यात बंदीस्त करता येतात, मात्र त्यातला काळाचा बदल रोखता येत नाही. हा प्रवाह सुरूच असतो. जगणंही असंच असतं, अनेक क्षणांची ती साखळी असते. आपल्याला साजेसे पटतील असे हे क्षण आपल्यापुरते आयुष्यभर ओवण्याचं काम प्रत्येक जण करत असतो. या आपल्या माळेतले ओवले जाणारे क्षणांचे मणी आपले आपणच ठरवायला हवेत, अशीच इच्छा प्रत्येकाची असते. पण दुसरीकडे जगण्याचं नाव तडजोड असंही असतं. ज्यावेळी संपूर्ण आयुष्यंच तडजोडीचं ठरतं, त्यावेळी आयुष्याची ही माळ गळ्याभोवतीचा फास होऊ लागते. ही घुसमट इतकी अंगवळणी पडते की त्यालाच निर्विकार अशा जगण्याचं नाव दिलं जातं. फोटोग्राफचं कथानक अशाच हळूवार क्षणांची माळ आहे. पण ती इतकी हळूवार झाली आहे की त्याचं रूपांतर रटाळपणात होतं. फोटोग्राफ पाहताना लंचबॉक्स आठवतो, त्याहीपेक्षा काही महिन्यांपूर्वी मराठी पडद्यावर आलेला लेथ जोशीही आठवतो. लेथ जोशी घडणार्‍या प्रसंगातून कथानकाला समांतर जाणारा होता. त्यामुळे पटकथेला साजेसा एक वेग त्यात होता. रोजच्या जगण्यातले प्रसंग असले तरी फोटोग्राफमध्ये असा वेग दिग्दर्शक रितेश बत्राने जाणीवपूर्वक टाळला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी (रफी) आणि सान्या मल्होत्रा (मिलोनी) यांच्यातली ही तरल प्रेमकथा. या प्रेमात आसक्ती आहे. ओढ आहे. विरह आहे. पण हे सर्व मानवी जाणिवात बंदीस्त करून ठेवलेलं आहे. अशा बंदीस्त भावना संयतपणे पडद्यावर मांडण्यात नवाजुद्दीन यशस्वी ठरतोच. हे त्याच्या याआधीच्या चित्रपटातून समोर आलं आहेच. त्याला तेवढीच साथ दिली आहे ती सान्या मल्होत्राने. या दोघांची पार्श्वभूमी, सामाजिक जडणघडण, आर्थिक परिस्थिती आणि जगणं दोन टोकांचं आहे. रफी हा गेटवे ऑफ इंडिया परिसरात लोकांचे फोटो काढून उदरनिर्वाह करणारा…हा बेहरामपाड्यातल्या एका खोलीत मित्रांसोबत राहतोय, तर सान्या सुखवस्तू पण कडक काहीशा लादल्या गेलेल्या शिस्तीतल्या मध्यमवर्गातली मुलगी. या दोघांमध्ये एक समान धागा आहे. रफीचं साचलेपण आणि जगण्याची हतबलता ही आर्थिक तफावतीतून आलेली आहे, तर मिलोनीला कुटुंबातल्या संस्कारांचा तो भाग आहे. इथं हे दोघेही जगण्यापासून हरवलेले आहेत. आपल्याला आपल्या जगण्याकडून नेमकं काय हवंय, हे दोघांनाही माहीत नाही किंवा कदाचीत पुसटसं माहीतही असावं, पण कौटुंबिक आणि परिस्थितीच्या रेट्यात ते हरवून गेलंय. त्याचा शोध दोघेही नकळत घेत आहेत. आता हा समान धागा असलेली या दोन व्यक्तीरेखा एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांना एकमेकांसाठी आत्मियता वाटणारच हे ओघानं आलंच. दिग्दर्शक रितेश बत्राने निखळ आत्मियता आणि प्रेम यातली सीमारेषा पडद्यावर कायमच धूसर ठेवली आहे. त्यामुळे फोटोग्राफ हा केवळ प्रेमकथापट ठरत नाही. प्रेम असू शकतं पण अधिकाराचं काय? या प्रश्नाचा शोध चित्रपटातून संथपणे घेतला जातो.

मुंबईतला पाऊस, झोपड्यांच्या गल्लीबोळात तळली जाणारी भजी, टपरीवरचा चहा, ओल्या रस्त्यांवर कॅमेर्‍याचा कोन हा शोध घेत राहतो. मुंबईतल्या लोकल ट्रेनचा आवाज, पावसाची रिपरिप, गल्लीतल्या हॉटेलमधले काचेरी ग्लास विसळण्याचा आवाज पार्श्वसंगीताची जागा घेतो. चित्रपटाचा पडदा एकाच ठिकाणी थांबलेला, थबकलेला आहे. जसा की एखादं फोटोग्राफ किंवा पेन्टींग. फोटोग्राफमधल्या रफी आणि मिलोनी या दोन्ही व्यक्तीरेखा नॉस्टॅल्जीक होतात. त्यांना गेलेले क्षण थांबवायचे आहेत. पण ते शक्य नाही. या गेलेल्या आणि येणार्‍या क्षणांकडे कायम मागणं आहे आणि येणार्‍या क्षणांकडे तक्रारी आहेत. चित्रपट अशाच मौनातल्या तक्रारींचा पट आहे. या तक्रारी बोलल्या जात नाहीत. त्या केवळ सहन केल्या जातात, कारण तेच जगणं असल्याचा भ्रम पडदाभर व्यापलेला असतो.

हे सहन करणं चित्रपटाच्या कमालीच्या संथ गतीमुळे सहन करण्यापलीकडे पोहोचतं. यात गाणी नाहीत. त्यामुळे कल्पनेला स्थान नाही. अलीकडच्या चित्रपटातले अ‍ॅक्शन, इमोशन्स, भडक रोमान्स असलं काही फोटोग्राफमध्ये नाही. नवाजुद्दीनच्या सिनेमात असलेला कल्ट इथं नाही. फोटोग्राफ हा तद्दन व्यावसायिक चित्रपट नाहीच. मात्र, तद्दन कलात्मकही नाही. प्रसंग घडत जातात. ते पाहण्याशिवाय प्रेक्षकांच्या हातात काहीच उरत नाही. एकाच रितेपणाचं ओझं कायम मनावर घेऊन ते वाहण्यालाच जगण्याचं नाव देणार्‍या निर्विकार चेहर्‍यांच्या दोघांचा फोटोग्राफ हा कमालीचा संथ चित्रपट आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here