घरमनोरंजनहोम स्वीट होम...न सुटणार्‍या घराची कथा

होम स्वीट होम…न सुटणार्‍या घराची कथा

Subscribe

अनेक वर्ष एका घरात राहिल्यावर त्या घराबद्दल एक आपुलकीच नातं तयार होतं. आपल्या कुटूंबाचा महत्त्वाचा भाग होऊन जातं ते आपलं घरं. घरातील प्रत्येक कोपरा आपलासा वाटायला लागतो. घरातील प्रत्येक व्यक्तीची आपलीशी अशी घरातली हक्काची, आवडती जागा असते. घराशी इतकं घट्ट नातं तयार होतं की ते घरं सोडून जावं, असा विचारही आपल्या मनात येत नाही. पण हेच घर सोडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मनाची घालमेल होते. अशीच आपल्या घराशी भावनीक नातं असलेल्या एका जोडप्याची कथा ‘होम स्वीट होम’ चित्रपटात मांडण्यात आली आहे.

शामल(रिमा लागू), विद्याधर महाजन(मोहन जोशी) आणि विद्याधर यांची मानलेल्या बहिणीची मुलगी देविका (स्पृहा जोशी) हे कुटूंब अनेक वर्ष दादरच्या एका जुन्या इमारतीत रहात असते. इमारतीत २४ तास पाणी नसतं. लिफ्ट नसते अशा अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा नसतात. या कुटूंबाचं सोपान (ऋषीकेश जोशी) या इस्टेट एजंटबरोबर खूप जवळचे संबंध असतात. सोपान हा त्यांच्या घरातलाच एक माणूस असतो. आपल्या काका-काकूंसाठी पडेल ते काम सोपान करत असतो. एकदा सोपानने चुकून घरी आणलेल्या क्लायंटमुळे आपल्या घराला साडे तीन कोटींची किंमत मिळेल असं शामलाला कळतं आणि आपणही घर विकावं असा विचार तिच्या मनात येतो. वयोमानानुसार रोज बिल्डिंचे जिने चढून वरती येणं शामलला त्रासदायक वाटू लागतं. त्यामुळे हे घर विकून एखाद्या टॉवरमध्ये राहायला जावं आणि उरलेले पैसे बॅँकेत ठेवायचे असा विचार शामलच्या मनात येतो. मात्र शामलच्या या निर्णयाला विद्याधरचा सुरुवातीला विरोध असतो. अनेकवेळा वेगवेगळ्या उदाहरणातून शामल विद्याधरला घर विकण्याबद्दल पटवून देते. अखेर बायकोचा हट्ट म्हणून विद्याधर घर विकायला तयार होतो. आता हे घर नक्की विकणार का? टॉवरमध्ये रहायला जाणार का? हे समजण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.

चित्रपटाचा विषय वेगळा आहे. पण पुढच्या दोन तासांत फार नवीन काही घडत नाही. त्यामुळे चित्रपट फारसा मनाला भिडत नाही. मात्र रिमा लागू आणि मोहन जोशी यांचे संवाद चित्रपटात मजा आणतात. या दोघांनी चित्रपटात जान आणली आहे. या दोघांच्या अभिनयामुळे चित्रपटावरची पकड कायम रहाते. त्यांच्यातील संवाद हे आपल्या घरात घडणारे रोजचे संवाद असल्यासारखे आपण एकतो. ‘होम स्वीट होम’ चित्रपटात अनेक पाहूणे कलाकार आहेत. प्रसाद ओक, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षीती जोग अशी तगडी स्टार कास्ट चित्रपटात असल्यामुळे चित्रपट बघताना मजा येते. स्पृहा जोशीनेही आपली भुमिका चोख बजावली आहे. मात्र देविका या भूमिकेला चित्रपटात फारसा वाव मिळत नाही. ही भूमिका जास्त अधोरेखित होत नाही. पण ऋषीकेश जोशी आणि विभावरी देशपांडे यांची कामं उत्तम झाली आहेत.

- Advertisement -

या चित्रपटात जमेची बाजू आहे ती गीतकार वैभव जोशी यांच्या कवितेची. घराबद्दलच्या जिव्हाळ्याची एक उत्तम कविता चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना ऐकायला मिळते. कविताच प्रेक्षकांच्या मनाला भिडते. मात्र सुंदर कविता असूनही तिचा योग्य पध्दतीने वापर चित्रपटात झालेला दिसत नाही. दिग्दर्शक म्हणून ऋषीकेश जोशी चा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटात लोकेशनचा वापरही मस्त झाला आहे. जुनं दादरंच घरं आणि टॉवर मधलं घर ही हे सगळं जमून आलं आहे.
एकंदरीतच उत्तम संवाद, तगडी स्टार कास्ट आणि एक वेगळा विषय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल. त्याचबरोबर रिमा लागूंचाही हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -