घरमनोरंजनजाणून घ्या, नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून कसे घडले?

जाणून घ्या, नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून कसे घडले?

Subscribe

'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या संघर्ष्याविषयी माहिती दिली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक गोष्टींसंदर्भात उलगडा केला.

मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे कसे घडले? असा औत्सुक्याचा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. याबाबत नागराज मंजुळे यांनी स्वत: माहिती दिली आहे. पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रॅण्ड येथे शुक्रवारी ‘सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ अर्थात ‘सीप’ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी आशुतोष पारसनीस यांनी नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या जडणघडणीतील अनेक उदाहरणे दिले. याशिवायव चित्रपट कसा असावा? याबाबत भाष्य केले. यावेळी नागराज मंजुळे म्हणाले की, ‘चित्रपट हे माध्यम लहानपणापासून खूप जवळचे होते. चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे, असंही म्हटले जाते. पण माझ्या जीवनाचे प्रतिबिंब मला त्यात कधी दिसलेच नाही, म्हणून याच माध्यमातून मी माझी गोष्ट सांगण्याचा, मनातल्या गोष्टी उपसायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांनाही या गोष्टी आवडत आहेत याचा मला आनंद आहे.’ ‘मर्क्युरी इंडिया’ या सेल्स परफॉर्मन्स कन्सल्टंट संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक रवी सुब्रमण्यम, सीपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अश्विन मेघा, माजी अध्यक्ष समीर सोमण, आशुतोष पारसनीस, अभिजित अत्रे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – नागराज मंजुळेंचा छत्रपतींना अमेरीकेतून मानाचा मुजरा

- Advertisement -

नेमके काय म्हणाले नागराज मंजुळे?

नागराज मंजुळे म्हणाले की, ‘लहानपणापासूनच मला चित्रपट पहायला आवडायचे. शाळा महाविद्यालयात असताना माझी हजेरी ही गावातल्या व्हिडीओ सेंटरलाच जास्त असायची. त्याठिकाणी खूप चित्रपट पाहिले. या चित्रपटांमधील अभिनेत्री या नेहमीच गोऱ्या, नाजूक, सुंदर, वेंधळ्या, घाबरट दाखविल्या गेलेल्या आठवतात. पण माझ्या आजूबाजूची परिस्थिती मात्र वेगळी होती. मला चित्रपटातील हे पारंपरिक ‘स्टेरिओटाईप’ खटकायचे, त्यांचा राग यायचा. माझ्या आजूबाजूला अनेक सक्षम, कर्तृत्ववान, नीतीमूल्य जपणाऱ्या स्त्रिया मी पाहिल्या. त्यामुळे माझ्या आजूबाजूची परिस्थिती माझ्या चित्रपटांमधून  दाखवायचा मी प्रयत्न करत आहे. लहानपणापासून गोष्ट ऐकायची, सांगायची आवड होती या क्षेत्रातही माझी तीच आवड मी स्वीकारली आहे. परिणामांची चिंता न करता माझ्या गोष्टी या माध्यमातून लोकांसमोर मांडत आहे.’

‘नेटफ्लिक्स सारख्या माध्यमांमुळे अधिक उन्नत सिनेमा तयार होईल’

चित्रपट हा कलांचा एक गुच्छ आहे. यामध्ये कथेबरोबरच संगीत देखील महत्त्वाचे आहे आणि चित्रपटातील संगीत आणि बाकीचे बारकावे यांसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. फिल्म मेकिंग ही एक कला असून याबरोबरच फिल्म एडीटिंग, साउंड इफेक्ट, व्हीएफएक्स, अॅनिमेशन या गोष्टींचा वापर सध्या जगभरात वाढत आहे. आपल्या देशातही आता तो पसरत असून याद्वारे माध्यमाची ताकद वाढत आहे. ही सकारात्मक बाब असल्याचेही यावेळी मंजुळे यांनी सांगितले. ‘आपलं जगण हे वेडंवाकड आहे. आपण शिव्या देतो, दारू पितो मात्र या गोष्टी आपण चित्रपटात मांडू शकत नाही. या वेळी आपल्याला सेंसॉरची भीती असते. मात्र आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसारख्या माध्यमातून आपण आपल्याला जे सांगायचे ते सांगू शकत आहोत ही सकारात्मक बाब आहे. अशा व्यासपीठांमुळे आपल्याकडे अधिक उन्नत सिनेमा तयार होईल’, असा माझा विश्वास आहे असेही या वेळी नागराज मंजुळे यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -