आत्मचरित्र लिहावे इतकी मी मोठी नाही

Mumbai
Uttrrang Pustak Prakashan

आवडत्या क्षेत्रात योगदान दिल्यावर काही दशकांनंतर तुमचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण होतो. या प्रवासात चाहतावर्ग जरी दिवसेंदिवस तुमच्या कार्याप्रमाणे वाढत असला तरी तुम्हाला प्रोत्साहन देणारे कुटुंब, स्नेही यांच्याबरोबर दिग्गज गुरुंचाही मोठा वाटा असतो. वाचकांना हा प्रदीर्घ प्रवास आणि कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घ्यावा असे वाटत असते. सध्या पुस्तक लिहिणे हा यांच्यातला दुवा आहे जो प्रख्यात गायिका उत्तरा केळकर यांना जवळचा वाटला. नावाला साजेल असे ‘उत्तररंग’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

एखाद्या पुस्तकात एखाद्या व्यक्तीविषयी समग्र माहिती दिली जाते, तेव्हा ते आत्मचरित्र असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात उत्तराताईंना आपले ‘उत्तररंग’ हे पुस्तक आत्मचरित्र वाटतच नाही. त्याला कारण म्हणजे चरित्र लिहावे इतकी मी मोठी नाही. पण जे चांगले-वाईट अनुभव आले ते पुस्तकात शब्दबद्ध व्हावेत असा प्रयत्न मी या माझ्या पुस्तकात केलेला आहे. यातून कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आवश्यक तिथेच नावांचा उल्लेख केला असल्याचे स्वत: उत्तराताई सांगतात. व्यासपीठावर जेवढे म्हणून मान्यवर उपस्थित होते ते उत्तराताईंच्या स्नेहापोटी आले होते. कुंदाताई ठाकरे, राज ठाकरे, आशिष शेलार, प्रकाशक मंदार जोशी, श्रीधर फडके, अशोक पत्की, प्रवीण दवणे, रवींद्र साठे, गौतम ठाकूर हे उपस्थित होते. उत्तरा केळकर यांच्या अजरामर गीतांचा आनंद उपस्थित प्रेक्षकांना यावेळी घेता आला.