घरमनोरंजनवैचित्र्यपूर्ण स्पायकॉम

वैचित्र्यपूर्ण स्पायकॉम

Subscribe

‘ब्लॅक कॉमेडी’ म्हटलं की हमखास लक्षात येणारं नाव म्हणजे कोएन ब्रदर्स. अशक्यप्राय वाटणारे योगायोग, अनेक टोकाच्या पात्रांच्या समोरासमोर येण्याने निर्माण झालेल्या हास्यास्पद घटना आणि क्राईम-थ्रिलर प्रकार आणि त्याअनुषंगाने एकूणच पल्प सिनेमांतर्गत येणार्‍या सर्वच गोष्टींचा समावेश अशी खास वैशिष्ठ्ये असलेला हा जान्र आणि कोएन ब्रदर्स यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या सुरुवातीच्या ‘रेजिंग अ‍ॅरिझोना’, ‘फार्गो’सारख्या फिल्म्स गुन्हेगारी विश्व, त्यात सामान्य म्हणाव्याशा लोकांचा समावेश आणि या दोन्हींच्या एकत्र येण्याने निर्माण झालेला विनोद याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. यासोबतच हार्ड कोअर क्राईम थ्रिलर्स ते पूर्णतः विनोदी अंगाने झुकणारे चित्रपट अशा दोन्ही प्रकारांत तितकेच निष्णात असलेल्या या लेखक-दिग्दर्शक द्वयीला ब्लॅक कॉमेडी हा मधला मार्ग तर अगदीच सहज जमतो. ‘बर्न आफ्टर रीडिंग’ हा त्यांच्या अलीकडील काळातील ब्लॅक कॉमेडी चित्रपटांमधील एक महत्त्वाचं नाव आहे.

ऑस्बॉर्न कॉक्स (जॉन माल्कोविच) या सीआयए एजन्टला त्याच्या अकार्यक्षमतेच्या नावाखाली सध्याच्या मोहिमेवरून हटवण्यात आलं आहे. ‘अतिमद्यपानामुळे आपल्याला मोहिमेवरून हटवलं’ हा अपमान सहन न झाल्याने कॉक्स थेट राजीनामा देऊन घरी बसणं पसंत करतो. त्याची पत्नी, केटी (टिल्डा स्विन्टन) एक दंतवैद्य आहे. कॉक्सच्या मद्यपानामुळे ती स्वतः हैराण झालेली असल्याचं आणि दोघांचं नातं विशेष नसल्याचं स्पष्ट होत नाही तोच तिचं हॅरीसोबत (जॉर्ज क्लुनी) अफेअर सुरु असल्याचं स्पष्ट होतं. कॉक्सच्या नोकरी सोडण्याच्या बातमीने केटी, अर्थातच, नाराज होते आणि घटस्फोट मिळवण्याच्या दृष्टीने गुप्तपणे हालचाली सुरु करते. तर इकडे नोकरी स्वतःहून सोडली असल्याने पेन्शन मिळणार नाही हे माहीत असलेला कॉक्स आपले चरित्र लिहायला घेतो.

लिंडा लिट्झकी (फ्रान्सिस मॅकडॉर्मन्ड) ही एका जिममध्ये काम करणारी प्रशिक्षक आहे, तर चॅड (ब्रॅड पिट) हा तिचा कलीग आहे. लिंडा केटीच्या अगदी उलट आहे. केटी स्वतः कार्यरत आहे, तिचं लग्न तर झालं आहेच, मात्र सोबतच अफेअरदेखील सुरु आहे. याउलट लिंडा मात्र अजूनही सिंगल आहे, नि ऑनलाईन डेटिंग साईटवरील वैयक्तिक आयुष्यात अपयशी असणार्‍या लोकांशी भेटून ‘वन नाईट स्टँड्स’ करावे लागत आहेत. त्यामुळे आपण सुंदर नाहीत या गंडाने पछाडलेल्या लिंडाला काही कॉस्मेटिक सर्जरी करायच्या आहेत. पण हा खर्च इन्शुरन्स कंपनी देणार नाहीये. मग यातून मार्ग कसा काढायचा याचं उत्तर स्वतःहून तिच्या हातात पडतं. कॉक्सची संपत्ती किती आणि घटस्फोटानंतर आपल्याला किती मिळेल वगैरे गोष्टींचा शोध घेताना कॉपी केलेल्या फाइल्सची सीडी (ज्यात कॉक्सचे चरित्र आणि इतर संवेदनशील माहिती असते) केटीच्या लॉयरच्या रिसेप्शनिस्टकडून जिममध्ये पडते; चॅडला कॉक्सकडून पैसे उकळण्याची कल्पना सुचते. बाकी हा प्रवास कुठल्या दिशेने सुरु आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येतं आणि रोलरकोस्टर राइडला सुरुवात होते.

- Advertisement -

या सगळ्या गोंधळात ब्लॅक कॉमेडी आणि कोएन ब्रदर्स या दोन्ही गोष्टींना आवश्यक असलेली हरएक बाब उपलब्ध आहे. गुन्हे आहेत, अनपेक्षित आणि आकस्मिकपणे या ‘डू ऑर डाय’ विश्वाच्या तसेच एकमेकांच्या संपर्कात आलेली टोकाची पात्रं आहेत आणि या सगळ्यांतून निर्माण झालेला नियंत्रित तरीही आकस्मिक वाटणारा चलाख विनोद आहे. जे या चित्रपट प्रकारच्या प्रेक्षकांना चकित करण्यासाठी पुरेसं आहे.

क्राईम-थ्रिलरसोबतच स्क्रूबॉल कॉमेडी हा प्रकार हॉलिवुडमध्ये प्रचलित होता. ज्याचं वर्णन ‘वैचित्र्यपूर्ण रॉम-कॉम’ अशा प्रकारे करता येईल. ‘बर्न आफ्टर रिडिंग’मध्ये नात्यांमध्ये आलेली अपारदर्शकता आणि अलिप्तपणा यांतून निर्माण झालेला तणाव आणि परिणामी अफअर्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हा चित्रपट रोमँटिक कॉमेडीकडे कोएन्स शैलीत पाहण्याचा अंदाज आहे असं म्हणता येऊ शकतं. ज्याला अर्थातच क्लासिक स्क्रूबॉल आणि ब्लॅक कॉमेडीचं कोंदण आहे.

- Advertisement -

याखेरीज या चित्रपट प्रकारात योगायोग आणि अनपेक्षितता यामुळे गोंधळ निर्माण होत असला तरी त्याला नियंत्रित ठेवणं किंवा किमान तसा आभास निर्माण करता येणं गरजेचं असतं. कोएन्सना हे बरोबर जमतं. ज्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांच्या शैलीचे ठसे असलेल्या ‘फार्गो’, ‘द बिग लिबॉव्स्की’ आणि अगदी ‘बर्न आफ्टर रिडिंग’पर्यंत आणि नंतरच्याही फिल्म्स या प्रकारातील मैलाचे दगड मानल्या जातात. त्यांच्या शैलीचे ठसे आणि प्रभाव केवळ एखाद्या लेखक-दिग्दर्शकावर नसून सिनेमा लिहिणार्‍या, दिग्दर्शित करणार्‍या आणि पाहणार्‍या गेल्या किमान तीन तरी पिढ्यांवर आहे असं म्हणता येतं. हा प्रभाव स्थळ, काळ, भाषा वगैरे गोष्टींच्या पलीकडील आहे. ज्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला आलेला ‘गेम नाईट’ ते आपल्याकडील श्रीराम राघवनच्या ‘अंधाधुन’पर्यंत सर्वत्र कोएन्सच्या शैलीचा प्रभाव दिसतो. त्यामुळेच या चित्रपट प्रकाराच्या मास्टर्सचा हा क्लासिक चुकवू नये असाच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -