घरमनोरंजन'इपितर' : उनाड मुलांची भावनिक गोष्ट

‘इपितर’ : उनाड मुलांची भावनिक गोष्ट

Subscribe

गेल्या काही वर्षांत एकाहून एक दर्जेदार मराठी चित्रपट आपल्या भेटीला आले आहेत. दमदार कथानकासोबत उत्कृष्ट मांडणी आणि प्रभावी सादरीकरण यामुळे मराठी चित्रपटांचा दर्जा नक्कीच उंचावला आहे. याच पार्श्वभूमीवर आणखीही काही नवे मराठी चित्रपट सध्या येऊ घातले आहेत. त्यातीलच एक आहे ‘इपितर’. इपितर सिनेमाच्या फर्स्ट लूकची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. या सिनेमातील गाण्यांनाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे. आज आपण जाणून घेऊया सिनेमाची कथा आणि त्यातील कलाकारांविषयी.

‘इपितर’ चित्रपटाच्या कथेत आहेत कॉलेजला जाणारी तीन मस्तीखोर मुलं आणि त्यांचे हटके विश्व. अर्थिग्या, परश्या आणि बॉबी या तीन बिलंदरांची ही गोष्ट आहे. चित्रपटातील या तीन मुख्य पात्रांपैकी अर्थिग्या हे पात्र साकारले आहे जयेश चव्हाण या कलाकाराने. जयेशला तुम्ही ओळखतही असाल. ‘टाईमपास’ या सुपरहिट मराठी चित्रपटात जयेशने ‘मलेरिया’ हे विनोदी पात्र साकारले होते. आपलं महानरशी बोलताना जयेशने इपितर विषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

नगरी भाषेतील ‘अर्थिग्या’ साकारणं आव्हानात्मक

”टाईमपास सिनेमात मी साकारलेल्या ‘मलेरिया’ला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. त्यामुळे इपितर सिनेमा करताना मजेसोबतच थोडी जबाबदारीही वाटत होती. टाईमपासमधील मलेरिया हा आगरी भाषेत बोलणारा मुलगा होता. माझे काही आगरी भाषिक मित्र असल्यामुळे मी चटकन ती भाषा शिकलो. मात्र इपितर मधला अर्थिग्या हा नगरी भाषेत बोलणारा आहे. दूरदूरपर्यंत काहीच संबंध नसलेली ही भाषा शिकणं माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. त्यामुळे नगरी भाषेचा मला खूप अभ्यास करावा लागला. या प्रक्रियेत मला अनेकांची खूप चांगली साथ लाभली आणि केवळ त्यामुळेच अर्थिग्या साकारणे मला शक्य झाले.  एकीकडे खूप हसवताना हा सिनेमा तुम्हाला सामाजिक संदेश सुद्धा देऊन जातो. मलेरिया प्रमाणेच अर्थिग्या देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल याची मी खात्री देतो.”  – जयेश चव्हाण

- Advertisement -

कुठलाही चित्रपट आपण बघितला, तर त्यामध्ये मुख्य कलाकारांसोबत महत्वाचे असतात ते साहाय्यक कलाकार. मुख्य कलाकारांइतकेच साहाय्यक कलाकार चित्रपटाची कथा पुढे घेऊन जाण्यात हातभार लावत असतात. चला हवा येऊ द्या फेम- भारत गणेशपुरे यांनी इपितर चित्रपटात अशाचप्रकारे एका साहाय्यक कलाकाराची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याविषयी बोलताना भारत गणेशपुरे म्हणतात,

‘नव्या कलाकारांच्या एनर्जीने भरलेला सिनेमा’

”इपितर या वेगळ्या धाटणीच्या आणि ग्रामीण बाज असलेल्या विनोदी सिनेमात काम करताना खरंच मजा आली. विनोदाची झालर असलेला हा सिनेमा प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणी आणतो. मी या सिनेमात प्राध्यापकाची भूमिका साकारतो आहे. गोष्टीतील तीन मुख्य पात्रांना म्हणजेच गावातील त्या तीन मस्तीखोर मुलांना ओरडणारा मात्र प्रसंगी त्यांना समजून घेणारा असा हा प्राध्यापक आहे.

गावात आणि कॉलेजमध्ये कायम उनाडक्या करणारे ते तिघे, एका घटनेनंतर अचानक समाजसेवेचा विडा उचलतात. मात्र समाजसेवा करता करता ते चांगलेच फसतात. त्यावेळी केवळ हा प्राध्यापक त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. कारण त्या मुलांची तळमळ आणि जिद्द त्याला पूर्णपणे ठाऊक असते.

इपितर चित्रपटाच्या निमित्ताने नव्या पिढीतील कलाकारांसोबच काम करताना एक वेगळा अनुभव मिळवला. या मुलांच्या कमाल एनर्जीने भरलेला हा सिनेमा आहे. हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा आणि नव्या दमाच्या या कलाकारांना, त्यांच्या कलेला भरभरुन प्रोत्साहन व प्रेम द्यावे, असे माझे महाराष्ट्रातील जनतेला सांगणे आहे.”  – भारत गणेशपुरे

 

सिनेमाची कथा थोडक्यात

आपल्याच विश्वात रमणारी ही मुलं. गावात खोड्या काढणारी, कॉलेजमध्ये मस्ती करणारी मात्र आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द बाळगणारी. एक दिवस त्यांच्याच गावातील एका मुलीला काही दलाल वेश्याव्यवसायाठी पळवून नेत असताना हे तिघे पाहतात. दलालांच्या तावडीत सापडलेल्या त्या मुलीचं रडणं, ओरडणं त्यांना पूर्णपणे हेलावून टाकतं. त्यामुळे हे तीन बिलंदर त्या मुलीला सुखरुप सोडवून आणण्याचा निर्धार करतात. इथून चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळे वळण लागते.

या एका घटनेनंतर हे तीन ‘इपितर’ पूर्णपणे बदलून जातात. कशाप्रकारे हे तिघे त्या मुलीची वेश्यावस्तीतून सुटका करतात, ते करत असताना त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, या कार्यात त्यांना कोणकोण कशाप्राकारे मदत करते, या सगळ्याचे मजेशीर मात्र तितकेच भावनिक सादरीकरण कथेमध्ये करण्यात आले आहे.

 

इपितर म्हणजे काय रे भाऊ?

इपितर हे चित्रपटाचे नावच गमतीशीर आहे. शहरी भागात राहणाऱ्या बऱ्याच लोकांसाठी हा शब्द कदाचित नवीन असेल. इपितर हा टिपीकल ग्रामीण भागातला शब्द असून उनाड किंवा इरसाल असा त्याचा अर्थ होतो. गावाकडच्या अशाच तीन उनाड मुलांची ही गोष्ट आहे.

नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड यांची निर्मीती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता तारडे यांनी केले आहे. येत्या ८ जूनला इपितर आपल्या भेटीला येतो आहे. भारत गणेशपुरे, जयेश चव्हाण, विजय गीते, मिलिंद शिंदे, गणेश खाडे, निकिता सुखदेव, प्रकाश धोत्रे, वृंदा बाळ आदी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. आता इपितर चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील का पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -