‘जॉनी गद्दार’ : राघवनचा पल्प थ्रिलर

दिग्दर्शक श्रीराम राघवनवर कायमच विविध भाषांतील पल्प सिनेमे आणि फिक्शन यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. अगदी त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘एक हसीना थी’मध्येही (२००४) ते दिसून आलेलं आहेच. त्याचा त्यानंतरचा चित्रपट ‘जॉनी गद्दार’ (२००७) मात्र हा प्रभाव, पल्प चित्रपट आणि साहित्य यांच्यावरील प्रेम या गोष्टींना अधिक पुढच्या पातळीवर नेऊन ठेवतो. राघवन ‘७० च्या दशकातील हिंदी चित्रपट, लोकप्रियतेचे उच्चांक मोडणार्‍या सस्पेन्स-थ्रिलर कादंबर्‍या यांच्याकडून प्रेरणा घेत, त्यांना वेळोवेळी मानवंदना देत स्वतःचं असं वैशिष्ट्य अबाधित राखतो. ज्यामुळे ‘जॉनी गद्दार’ त्याच्या कथानकापेक्षा त्याच्या स्टायलिस्टीकपणामुळे अधिक रंजक बनतो.

Mumbai
johnny gaddar

विक्रम (नील नितीन मुकेश), शेषाद्री (धर्मेंद्र), शार्दुल (झाकीर हुसैन), प्रकाश (विनय पाठक) आणि शिवा (दया शेट्टी) हे पाच लोक एकत्रितपणे अवैध धंदे चालवत असतात. त्यांच्याकडे चार पाच दिवसांच्या काळात अडीच कोटीचा नफा मिळवता येईल अशी नामी संधी चालून आलेली आहे. त्यासाठी आधी अडीच कोटी जमा करावे लागणार आहेत. साधं गणित आहे, प्रत्येकाने पन्नास लाख गुंतवायचे आणि तितकाच नफा मिळवायचा. तर या प्रकरणात पाचही लोकांचा सहभाग आणि कोण कधी काय करणार आहे हे सगळं ठरलेलं आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्रांसोबत प्रेक्षकालाही ही योजना पाठ होईल इतपत तिची उजळणी झाली आहे. मग समस्या काय आहे? तर समस्या अशी की यातील एक जण ‘गद्दार’ आहे. आता तो कोण हे विचारू नये. कारण राघवनने प्रेक्षकाला पात्रांच्या काही पावलं पुढे ठेवत तो कोण हे आधीपासून स्पष्ट केलं आहे. परिणामी इथे का, कसं किंवा कोण या प्रश्नांची उत्तरं आधीच स्पष्ट असल्याने त्यांच्याहून अधिक महत्त्व ‘पुढे काय होणार?’ याला आहे. आणि राघवन आणि त्याचे सहपटकथाकार याच प्रश्नाचं उत्तर त्यातील कथानकाच्या माध्यमातून परिणामकारकरीत्या उलगडत जातात.

चित्रपटात ट्विस्ट्सची कमी नसली तरी तो त्यावर भर देतो अशातला भाग नाही, आणि ट्विस्ट्सचा गिमीक म्हणून वापर करण्यात त्याला रस नाही. ज्यामुळे कथनाच्या ओघात अगदीच स्टायलिस्टीक स्वरूपात ते समोर येतात. चित्रपटाची सुरुवातच मुळी शेवटच्या दृश्यापासून होते. आता हे दृश्य दिसतानाही कृष्ण-धवल स्वरूपात दिसतं. नंतर ओपनिंग क्रेडिट्सही ठळकपणे साठ-सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटाप्रमाणे विशिष्ट शैलीत समोर येतात. फारसा वेळ न दवडता पुढच्याच प्रसंगात ‘त्या’ गद्दाराशी ओळखही करून दिली जाते. शार्दुलची पत्नी, मिनीसोबत (रिमी सेन) त्याचं सुरु असलेलं प्रेमप्रकरणही दिसतं. लाल कारमध्ये लाल शर्ट आणि भडक लाल काचेचा गॉगल लावलेल्या ‘त्याच्या’सोबत मिनी एका हॉटेलमध्ये जाते. तिथे रंगसंगतीही लाल होते. लोकप्रिय हिंदी चित्रपट ते परदेशातील निओ-न्वार चित्रपट चळवळ अशा अनेकविध प्रभावांच्या छटा असलेली राघवनची ही शैली ‘जॉनी गद्दार’मध्ये सर्वाधिक प्रतिबिंबित होते.

राघवनवरील प्रभाव इथे पात्रांच्या जडणघडणीच्या अनुषंगाने कथानकात गुंफले जातात. चित्रपट जेम्स हॅडली चेस आणि विजय आनंद यांना अर्पण केलेला आहे. तर खुद्द चित्रपटात विक्रम हा चेसची कादंबरी, तर मिनी आर. के. नारायण यांची ‘गाईड’ वाचताना दिसते. जिचा थेट संबंध अर्थातच विजय आनंदशी आहे. याखेरीज सामान्य भारतीय व्यक्तीच्या जीवनात भारतीय चित्रपटसृष्टी हा एक अविभाज्य घटक असणं टीव्हीवरील अमिताभ बच्चनच्या ‘परवाना’कडून प्रेरणा घेत दगा देण्याची मोहीम आखण्यापासून ते ‘जॉनी मेरा नाम’मुळे आपलं नाव जॉनी सांगण्यापर्यंत सगळीकडे दिसून येतं. परिणामी राघवनचं चित्रपटप्रेम आणि त्यांना ट्रिब्यूट देणं सदर चित्रपटाच्या विश्वात न्याय्य ठरतं.

चित्रपटातील पात्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि चित्रपटाचा थरारक दृष्टिकोन यांच्या अनुषंगाने वर उल्लेखलेल्या लोकांखेरीज क्वेंटिन टॅरंटिनो आणि रॉबर्ट रॉड्रिग्ज यांचाही प्रभाव चित्रपटावर दिसतो. खासकरून रॉड्रिग्जच्या निओ-न्वार चित्रपट प्रकारातील ‘सिन सिटी’चं (२००५) दृश्यस्वरूप सदर चित्रपटावर विशेष प्रभाव टाकतं. खुद्द राघवननेही पुढे जाऊन हा चित्रपट ‘सिन सिटी’प्रमाणे कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित करण्याचा त्याचा मानस होता असं मान्य केलं आहेच. अर्थात ‘जॉनी गद्दार’ केवळ प्रभावांच्या पलीकडे जाऊन अगदी टॅरंटिनो-रॉड्रिग्ज जोडीचे चित्रपट काम करतात तसा परिणाम करणारा आहे. कारण तो या सर्व गोष्टींच्या पल्याड जात सदर पात्रांच्या विश्वाला आपल्या मातीतील आणि विश्वासार्ह बनवतो. ज्यामुळे प्रेक्षकाला एक ओल्ड स्कूल स्टायलिस्टीक असा थरारपट पहायला मिळतो, जो चुकूनही चुकवू नये असा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here