पलटनच्या सेटवर हास्यस्फोट

जे.पी. दत्तांच्या पलटनमध्ये अर्जुन रामपाल आणि हर्षवर्धन राणे झळकणार आहेत. जेपींच्या बॉर्डर, एल.ओ.सी, कारगिल सारखाच आगामी पलटन सुद्धा सैनिकी कथानकावर आधारलेला आहे.

Mumbai

जे.पी. दत्तांच्या पलटनमध्ये अर्जुन रामपाल आणि हर्षवर्धन राणे झळकणार आहेत. जेपींच्या बॉर्डर, एल.ओ.सी, कारगिल सारखाच आगामी पलटन सुद्धा सैनिकी कथानकावर आधारलेला आहे. जेपींच्या आधीच्या चित्रपटांसारखीच या चित्रपटातही मल्टीस्टार पलटन पडद्यावर येणार आहे. सोनू सूद, गुरमित चौधरी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ कपूर, सोनल चौहान आणि इशा गुप्ता हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पलटनच्या शुटींगदरम्यान हर्षवर्धन आणि अर्जुनने सैनिकांची शस्त्रे हाताळण्याचा प्रयत्न केला. यातली एक मोठी गन काही सेकंदात शेकडो गोळ्या डागण्याची क्षमता असलेली होती. आता हे भलं मोठं शस्त्र कसं चालवायचं याची माहिती या दोघांनाही नव्हती.

एखाद्या छोट्या तोफेसारखी दिसणारी ही मशीन गन त्यावेळी भारतीय सैन्यदलात महत्वाची होती. शूटींगदरम्यान ही गन कशी असेल, याचा अंदाज बांधला जात होता. ती कशी चालवली जाते, याचीही माहिती महत्वाची होती. हा प्रश्न अर्जुनचे आजोबा ब्रिगेडीअर गुरुदयाल सिंग यांनी सोडवला. त्यांना या मशीनगनची माहिती होती. त्यांनी मग शूटींगदरम्यान ही मशीन गन कशी चालवली जाते त्यासाठी काय तयारी करावी लागते, याची माहिती दिली. हर्षवधनने एनसीसी कँपमध्ये असताना बंदूक चालवली होती. त्यानंतर त्याचा बंदुकीशी संबंध आला नव्हता. मात्र पलटन निमित्ताने पुन्हा एकदा त्याला आपल्या या नव्या टार्गेटवर लक्ष द्यावं लागलं. तुझं टार्गेट चुकतंय, नीट लक्ष दे.. असं बोलून अर्जुनने हर्षवर्धनची थोडी थट्टा केली. गनमधून किती गोळ्या बाहेर पडल्या हे जरी समजलं नसलं तरी हास्याचे खूपच स्फोट झाले.


ठग्स ऑफ हिंदुस्तानचं जहाज

मुंबई । आमिर आणि अमिताभचा ठग्ज ऑफ हिंदुस्तानची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. बाहुबलीसारखाच शेकडो कोटींच्या खर्चात ठग्ज…बनवला जात असल्याचं म्हटलं जात आहे. यश राज बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असल्यानं आमिर आणि अमिताभ प्रेमींनाही त्याची उत्सुकता आहे. ठग्स…हिंदीशिवाय तामिळ आणि तेलुगु भाषेतही डब केला जाणार आहे. या चित्रपटासाठी दोन मोठी जहाजं हुबेहूब बनवण्यात आली आहेत. त्यांच वजन जवळपास दोन लाख किलो असल्याचं म्हटलं जात असून त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. या बिगबजेट सिनेमात आमिर, अमिताभसोबत कॅटरीना आणि फातिमा सना शेखही पडद्यावर महत्वाच्या रोलमध्ये झळकणार आहेत. जोधपूरच्या मेहरानगढमध्ये ठग्स…चं शूटींग सुरू आहे. तलवारबाजी, हाणामारी, जुन्या काळातल्या चांदोबातल्या कथांसारखे भव्य दिव्य सेट्स हे ठग्ज..चं मोठं आकर्षण आहे. आमिर आणि अमिताभ हे चित्रपटांत समोरासमोर येणार असून त्यांच्या शाब्दीक आणि अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे.


’श्रावणधारा’ काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न

मुंबई । युवा फाऊंडेशन ’आयोजित दापोली मंडणगड साहित्य कट्टा कविवर्य स्व. संजय जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’श्रावणधारा’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम नुकताच दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पंढरीनाथ रेडकर, साहित्यिक सुर्यकांत मालुसरे, बाल साहित्यिका ज्योती कपिले, पत्रकार राजेंद्र लंकेश्री, सामाजिक कार्यकर्ते नंदू राणे आणि शांताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी, लेखक स्व. संजय जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन करण्यात आली. त्यानंतर पाऊस, श्रावण, पावसातील आठवणी या विषयांवर २० कवींनी उत्स्फूर्तपणे कवीता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. सेलिब्रिटी गीतकार, कवी निलेश उजाळ यांनी आपली ’पाऊस राव’ ही बालकविता सादर केली. कवयित्री रोहिणी कदम हिने आपल्या सामाजिक कवितांनी अंतर्मुख केले.


ललित २०५’ या मालिकेत मंगळागौरी

मुंबई । श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. भैरवीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून राजाध्यक्ष कुटुंबातील महिला मंडळ सज्ज आहे. साग्रसंगीत पूजेसोबतच मंगळागौरीचे खेळ खेळत भैरवीची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली.लाडक्या नातसुनेचं कौतुक पाहून सुमित्रा आजी भारावून गेलीय मात्र नीलिमा आणि गार्गी काकू अद्यापही नाराज आहेत. कानामागून आली आणि तिखट झाली असा समज या दोघींनीही करुन घेतलाय. त्यामुळे मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्या सहभागी तर झाल्या आहेत पण या दोघींच्याही मनात मात्र अद्याप कटुताच आहे. तिकडे भैरवीच्या मनातही भीतीचीच भावना आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची आपण फसवणूक करत आहोत या विचारातच ती हरवून गेलीय.नील आणि भैरवीमधलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड होणार का? भैरवीची पहिली मंगळागौर निर्विघ्न पार पडणार का? हे ललित २०५च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.


इमरानची नवी सामाजिक इमेज

मुंबई । इमरानच्या चाहत्यांना खुशखबर आहे. अभिनेता इमरान हाश्मी मोठ्या विरामानंतर पुन्हा पडद्यावर येणार आहे. आपल्याच होम प्रोडक्शनचा पहिलाच चित्रपट चिट इंडिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लखनौमध्ये चित्रिकरण सुरू झालं आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकताच समोर आलं असून नकल में ही अक्ल है…डू यू अ‍ॅग्री …असा प्रश्न इमरान विचारू पाहतोय. देशातल्या शिक्षणव्यवस्थेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. याआधीचे इमरानचे सिनेमे पाहिल्यावर त्यानं नवी इनिंग सुरू करताना सामाजिक आशय समोर ठेवल्याचं दिसत आहे. आपली या आधीची इमेज बदण्यासाठी इमरान प्रयत्न करत असून लवकरच नव्या पडद्यावर नव्या इमेजमध्ये इमरान दिसणार आहे.


बहिणींना राखी बांधणारा आमिर

मुंबई । आपल्या कृतीतून नेहमीच सामाजिक संदेश देणारा आमिर खानने स्त्री पुरुष समानतेचा नवा संदेश कृतीतून दिला आहे. रक्षाबंधनाला त्याने आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेतली नाही. तर त्यानेच बहिणींना राखी बांधून नवी सुरुवात केली आहे. त्याने आपल्या दोन्ही बहिणींना राख्या बांधल्या. त्याचा फोटो त्याने सोशलमिडियावरही टाकला आहे. त्याच्या या कृतीचं मोठं कौतूक होत आहे. बहिणीसुद्धा भावाचं संरक्षण करू शकतात. असा संदेश त्याने यातून दिला आहे.