‘मी ड्रग्ज Adict होते’, कंगनाचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल

kangana drug addict
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचे संक्रमण भारतात एका बाजुला वाढत जात असताना दुसरीकडे मात्र कंगनाच्या बातम्यांनी प्रसारमाध्यमात चांगलीच जागा मिळवलेली आहे. तिचे ट्विट आणि भूमिका वादाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या कंगनाचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने स्वतः मी ड्रग्जच्या आहारी गेले होते, असा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ कंगनाने स्वतः मार्च महिन्यात इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. नुकतेच राज्य सरकारने कंगनाची ड्रग्जच्या अनुषंगाने चौकशी करणार असल्याचे म्हटले होते. आता या व्हिडिओमुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी ड्रग्ज प्रकरणावर येऊन ठेपली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक, तसेच सुशांतचा जुना मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दिपेश सावंत यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान कंगनाचे राज्य सरकार आणि शिवसेनेसोबत खडाजंगी सुरु झाल्यानंतर तिच्यावरही ड्रग्ज प्रकरणात चौकशीचा फास आवळण्याची चिन्हे दिसत होती. यासाठी तिचा माजी प्रियकर अध्ययन सुमनच्या एका मुलाखतीमधील अंश पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार होता. मात्र आता खुद्द कंगनानेच ड्रग्जची कबुली दिली असल्यामुळे हे प्रकरण कुठे जाणार? हे पाहावे लागेल.

 

या व्हिडिओमध्ये कंगना आपल्या आयुष्याची कथा सांगत आहे. “मी लहान असतानाच घरातून पळून गेले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीत मी नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अतिशय वाईट लोकांसोबत माझे संबंध आले. मी त्याकाळात ड्रग्जच्या आहारी देखील गेले होते. मात्र त्याकाळात मी न डगमगता संघर्ष केला. ध्यानधारणा, योगसाधना केली आणि आज मी एक यशस्वी अभिनेत्री झाली आहे.”, अशा प्रकारचे अनुभव कंगनाने या व्हिडिओच्या माध्यमातून कथन केले आहेत.