घरमनोरंजन‘डार्क’ चित्रपटातील कातिल गाणी

‘डार्क’ चित्रपटातील कातिल गाणी

Subscribe

सिनेप्रेमी वर्तुळात अनुराग कश्यपला भारतीय चित्रपसृष्टीतील क्वेंटिन टॅरंटिनो म्हणून संबोधलं जातं. मुळात कुणा व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने उपमा देणे पटत नाही. मात्र काही वेळा एखाद्या व्यक्तीमधील वैशिष्ट्ये दुसर्‍या एखाद्या व्यक्तीत आढळल्यास अशी संबोधनं टाळणं अशक्य असते.

इथे तर केवळ कश्यपच्या चित्रपटातील हिंसा किंवा डार्कनेस टॅरंटिनोसारखी आहे, अशातला भाग नाही. तर त्यासोबतच चित्रपटाच्या प्रभावात परिणामकारक ठरणार्‍या पात्रांना एक माणूस म्हणून अधिक सुंदर बनवणारी, त्यांना वास्तववादी, मानवी छटा प्रदान करणारी गाणी आणि पार्श्वसंगीताचा वापर हे अस्सल ‘टॅरंटिनो-इश’ गुणधर्मही याला कारणीभूत आहेत. कश्यप-अमित त्रिवेदी या दिग्दर्शक-संगीतकार जोडीने ‘मनमर्जियाँ’च्या निमित्ताने अप्रतिम सांगीतिक सौंदर्य उराशी बाळगणारा आणखी एक साऊंड ट्रॅक समोर आणत ‘भारतीय टॅरंटिनो’ या उपमेला जिवंत ठेवलं आहे.

- Advertisement -

आय अ‍ॅम अ सिम्पल मॅन. मला चित्रपट आवडतात. मला त्यातील गाणी, आणि अधिक सविस्तर सांगायचं झाल्यास साऊंडट्रॅक्स आवडतात. त्यातही मी अधिक ओल्ड स्कूल असल्याने नव्वदच्या दशकातील सेटिंग असलेल्या ‘यह मेरी फॅमिली’सारख्या कार्यक्रमातही ‘मेरे सपनों की रानी’ ऐकून खुश होतो. त्यामुळे गेल्या दशकभरातील बॉलिवुड चित्रपटांतील कुठल्याही सेटिंगमध्ये केवळ लोकप्रियतेच्या, आणि त्यातही भारतीय पॉप-कल्चरच्या निकषांखाली घुसवलेली गाणी मला आवडत नाहीत. मुळात त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचं पात्रांच्या हरकतींना, सवयींना न शोभणारं, अतर्क्य असणारं अस्तित्त्व खटकतं.

अर्थात चित्रपटाच्या चांगल्या असण्या-नसण्यासाठीचे हे निकष नसले तरी या गोष्टी सुप्त पातळीवर चित्रपटाच्या ‘सिनेमॅटिक’ मूल्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे त्यांचं जस्टिफाय न होणं चित्रपटासाठी हानिकारक असतं. मग या पार्श्वभूमीवर जे काही मोजके लोक गाणी आणि साऊंडट्रॅक्सच्या पातळीवर विचारपूर्वक काम करतात त्यात प्रामुख्याने कश्यप आणि राजकुमार हिरानी ही दोन नावं घेता येतील. ही यादी आणखी वाढवायची झाल्यास इम्तियाज अली, अभिषेक चौबेसारखे लोकही अ‍ॅड होतीलच. तर संगीतकारांमध्येही अमित त्रिवेदी, आलोकनंदा दासगुप्ता, स्नेहा खानवलकर, ए. आर. रेहमान हे लोक केवळ पाट्या टाकायचं काम न करता चित्रपटाच्या, त्यातील पात्रांच्या इसेन्सचा मागोवा घेत, त्याला न्याय देताना दिसतात.

- Advertisement -

‘मनमर्जियाँ’ मध्ये कश्यप-त्रिवेदी जोडीला ‘देव डी’, ‘बॉम्बे वेलवेट’नंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहणं नक्कीच सुखावणारं होतं. जेव्हा सदर चित्रपटाची गाणी एक एक करत प्रदर्शित व्हायला लागली तेव्हा वरवर पाहता ती तितकीशी प्रभाव टाकणारी नव्हती. मात्र त्यांच्या मुळाशी खास ‘त्रिवेदीयन’चार्म होता. जो वारंवार ती ऐकण्यास प्रवृत्त करत होता.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे मी पंजाबी लहेजाच्या (त्यातही पुन्हा रॅप साँग्सचा) गाण्यांचा मोठा चाहता नाही. बहुतांशी वेळा मला ती आवडत नाहीत, ती ऐकण्याचं मी टाळतो. मात्र याला जे काही सन्माननीय अपवाद आहेत. त्यातील मुख्य दोन म्हणजे ‘हायवे’ (संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमान) आणि ‘उडता पंजाब’ (पुन्हा एकदा त्रिवेदीच). तर ‘मनमर्जियाँ’मधील गाणी याच अपवादात्मक उदाहरणांत जोडलं गेलेलं आणखी एक नाव. त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाच्या आणि त्यातील मध्यवर्ती पात्रांच्या पार्श्वभूमीमुळे पंजाबी भाषिक गाण्यांचं जस्टिफाय होणं. दुसरं म्हणजे ही गाणी केवळ स्वतंत्र अल्बम म्हणून सुंदर ठरत नाहीत, तर चित्रपटात त्यांच्या पेरणीच्या जागा जवळपास परफेक्ट असल्याकारणाने ती साऊंडट्रॅक म्हणून अधिक परिपूर्ण ठरतात.

‘मनमर्जियाँ’तील पात्रं शक्य तितक्या प्रमाणात वास्तविकतेच्या जवळ जाणारी असली तरी गाण्यांबाबत त्यांना काहीसे ‘फिल्मी’ स्वरूप आहे. किंबहुना फिल्मी म्हणण्यापेक्षा याबाबतीत ती स्वप्नाळू आहेत, सच्ची आहेत. त्यामुळे समोर येणार्‍या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली गाणी त्यांच्या स्वभावाला, प्रेमाच्या (त्यांच्यापुरत्या मर्यादित असलेल्या) संकल्पनांना साजेशी आहेत. ज्यामुळे रॉबीच्या स्वभावाला अनुसरून रॅपवजा गाणी, तर रुमी-विकी यांच्या संमिश्र स्वभावांच्या अनुषंगाने निरनिराळ्या प्रकारची, शैलीची गाणी दृकश्राव्य स्वरूपात समोर येत राहतात.

शिवाय शेली (शैलेंदर सिंग सोढी) या गीतकाराची गाणी एरवीच्या उडत्या चालीच्या गाण्यांना केवळ यमक जुळवण्यासारखं काम न करता, चित्रपटातील पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतात. परिणामी ती एखाद्या विशिष्ट दृश्यात पार्श्वभागात सुरु असताना पात्रांच्या भावना सार्थपणे व्यक्त करतात. याखेरीज शेलीची रॅप असलेली गाणीही पाट्या टाकण्याचं काम नसून पात्रांच्या भावनांना मोकळी वाट करून देण्याचा रस्ता आहेत. ‘एफ फॉर फ्यार’चं उदाहरण घेतलं तर सदर गाणं आणि त्यातही रॅपचा भाग हा केवळ जागा भरण्याचं किंवा पंजाबी लहेजाच्या गाण्यांची लोकप्रियता कॅश-इन करण्याचा सुमार प्रयत्न नसून विकीचं (विकी कौशल) काम आणि गाणं सुरु असतानाची त्याची लहरी मानसिकता यांचं सार्थ चित्रण करणारं आहे.

शेलीचं देव डी, उडता पंजाब, आदि चित्रपटातील गीतकार म्हणून असलेलं कामही अशाच पातळीवरील आहे. कश्यप ट्रूपमधील हा गीतकार पुढील (कदाचित मोजक्याच) कामावरही आवर्जून लक्ष ठेवावा असा आहे. बाकी कॅची रॅप साँग्सपासून ते लोकसंगीत आणि लोकवाद्यांचा वापर असलेल्या गाण्यांपासून गहन अर्थपूर्ण गाण्यांपर्यंत सर्व काही देणारं अमित त्रिवेदी हे नावच वेगळ्या लेखाचा विषय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -