घरमनोरंजनस्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणार्‍या लालन सारंग

स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणार्‍या लालन सारंग

Subscribe

कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी नाट्यसृष्टीत तसेच चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणार्‍या लालन सारंग ह्या अभिनय क्षेत्रात तुल्यबळ होत्या. त्यामुळे ‘सखाराम बाईंडर’ सारख्या अजरामर ठरलेल्या नाटकात त्यांना ‘चंपा’नावाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि ती भूमिका त्यांनी लिलया पेलली. ही भूमिका तशी त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. कारण त्यासाठी लालन सारंग यांना स्वत:चे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून गावंढळ, रांगडी आणि बिनधास्त ‘चंपा’ साकारायची होती. अशा प्रकारे ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार’, ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’ आदी नाटकांमुळे बहुआयामी भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्या रसिकाच्या मनात घर करून बसल्या.

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या लालन यांना खरे तर अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे शिक्षण, नोकरी, लग्न आणि संसार यातच रमायचे होते. पण नियतीने त्यांना रंगभूमीकडे आणले नव्हे त्या रंगभूमीकडे ओढल्या गेल्या. रंगभूमीवर नुसते त्यांचे पदार्पण झाले नाही, तर त्या तिथे यथेच्छ बागडल्या, वाढल्या, मनसोक्तपणे रंगभूमी जगल्या. विविध नाटके व भूमिकांतून त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटविला. अशा काही नाटकांतील हटके भूमिकांमुळे रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री अशी ओळखही त्यांना प्राप्त झाली, हा त्यांच्यासाठी त्यांच्या अभिनयाला कलेसाठी मिळालेला एकप्रकारचा बहुमान होता. अभिनयापासून सुरू झालेला ज्यांचा प्रवास पुढे लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्या ते हॉटेल व्यावसायिक, उद्योजिका असा झाला.

सुरुवातीच्या नाट्य प्रवासाबाबत त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनयास सुरुवात केली. ‘मी मंत्री झालो’ ‘बुवा तेथे बाया’ ‘मोरूची मावशी’ ‘उद्याचा संसार’अशा नाटकांचा यात समावेश होता. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सखाराम बाईंडर’सारख्या नाटकाने त्यांच्या अभिनय जीवनात इतिहास घडवला. त्यानंतर ‘रथचक्र’ ‘कमला’ ‘गिधाडे’ ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’ ‘घरटे आपुले छान’ ‘बेबी’ ‘सूर्यास्त’ ‘कालचक्र’ आदी नाटके त्यांच्या वाट्याला आली आणि त्यांनी त्या त्या नाटकातील त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला त्यांनी पुरेपूर न्यायही दिला. एकप्रकारे त्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या.

- Advertisement -

अशा प्रकारे त्यांच्यावर कसदार अभिनयामुळे त्यांना चांगली नाटके आणि भूमिका मिळत गेल्या. ‘रथचक्रमधील ब्राह्मण स्त्री’ हे पात्र आजही नाट्यरसिकांच्या स्मरणात आहे. अशा प्रकारच्या बहुरंगी, बहुढंगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. ‘अभिषेक’ व ‘कलारंजन’या आपल्या घरच्या नाट्य संस्थांच्या माध्यमातूनही रंगभूमीवर त्यांनी काही नाटके सादर केली.
‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’आदी चित्रपट त्यांनी केले. पण नाटक हा त्यांचा खरा श्वास असल्याने तसेच त्यांचे व त्यांचे पती दिवंगत नाट्य दिग्दर्शक कमलाकर सारंग यांचेही नाटकाशीच जीवाभावाचे नाते होते. त्यामुळे पुढे चित्रपट व दूरदर्शन मालिका केल्या तरीही त्यांनी नाटक शेवटपर्यंत सोडले नाही. ‘कालचक्र’हे त्यांनी केलेले शेवटचे नाटक.

लालन यांना स्वयंपाक करण्याची आणि दुसर्‍यांना चांगले खाऊ-पिऊ घालायची पहिल्यापासून आवड होती. परंतु हीच आवड त्यांना हॉटेल व्यावसायिक बनण्यापर्यंत घेऊन जाईल, असे त्यांनाही वाटले नव्हते; पण तसे घडले. स्वयंपाकाची आवड असल्याने स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करून परिचित, आप्त यांना खाऊ घालणे हे मनापासून करण्याचे भव्य स्वरूप म्हणजे पुण्यात सुरू केलेले त्यांचे हॉटेल. खरे तर हॉटेल सुरू करण्याची मूळ कल्पना त्यांचा मुलगा राकेश याची होती. सुरुवातीची काही वर्षे त्या स्वत: हॉटेल व्यवस्थापनात जातीने लक्ष घालत होत्या. नंतर वयोपरत्वे त्यांनी लक्ष देणे कमी केले होते.

- Advertisement -

‘नाटकांमागील नाट्य’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. आजवरच्या अभिनय प्रवासाच्या वाटचालीचा आणि केलेल्या भूमिकांचा मागोवा घेणारा ‘मी आणि माझ्या भूमिका’ हा एकपात्री कार्यक्रमही त्यांनी सादर केला आहे. ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकर स्मृती ‘गृहिणी सखी सचिव’, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेच्या ‘जीवनगौरव’ आदी पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले. २००६ मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला होता. आयुष्यात जी जी भूमिका वाट्याला आली, मग ती नाटकातील असो किंवा प्रत्यक्ष जगण्यातील असो, ती प्रत्येक भूमिका आणि त्या अनुषंगाने येणारी कर्तव्ये व जबाबदार्‍या प्रामाणिकपणे आणि जिद्दीने पार पाडल्याचेही त्यांना मोठे समाधान होते. शेवटी माणसाने मोह तरी किती करायचा? त्यालाही काही मर्यादा आहेच ना? हेच माझ्या जीवनाचे सार व तत्त्वज्ञान असल्याचे सांगून त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -