घरमनोरंजन‘निराली’ सांगणार मोहनलालचं निराळेपण

‘निराली’ सांगणार मोहनलालचं निराळेपण

Subscribe

या आठवड्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘निराली’ या मल्याळम चित्रपटाविषयी थोडंसं...

भारतामध्ये सर्वाधिक व्यवसाय होतो तो हिंदी चित्रपटांचा. त्याखालोखाल तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मराठी या चित्रपटांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास हिंदीपाठोपाठ मराठी चित्रपटांना तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळतो. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये तमीळ, तेलुगु, कानडी, गुजराती चित्रपट प्रदर्शित होतात. परंतु, त्याकडे कधीच कोणाचं फारसं लक्ष जात नाही. तसेच हॉलिवुडखेरीज इतर देशांमधील चित्रपटसृष्टीत नेमकं काय सुरू आहे, याबद्दलही सर्वसामान्य चित्रपटरसिक अनभिज्ञ असतो. ‘चित्रजगी’ या सदरामधून दर आठवड्याला हिंदी, मराठीखेरीज इतर राज्यांमधील तसेच देशांमधील चित्रपटसृष्टीत काय घडतंय याची दखल घेतली जाईल. या आठवड्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘निराली’ या मल्याळम चित्रपटाविषयी थोडंसं…

रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी या दाक्षिणात्य सुपरस्टार्सनंतर ज्यांच्या चित्रपटांची प्रेक्षकवर्ग चातकासारखी वाट पाहत असतात ते अभिनेते म्हणजे मोहनलाल. २०१८ मधील त्यांचा पहिला चित्रपट ‘निराली’ हा १३ जुलैला म्हणजेच काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ‘निराली’ची विविध कारणांसाठी चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये मोहनलाल एक ट्रक चालवताना पाहायला मिळतात. हल्ली नवीन चित्रपटांमधील आशयाबद्दलचे आडाखे हे साधारण त्याच्या ट्रेलरवरून बांधले जातात. ‘निराली’च्या ट्रेलरवरून हा एक थ्रीलर असल्याची कल्पना येते. मल्याळम भाषेतील या चित्रपटाच्या कथानकाला मुंबई, पुणे आणि श्रीलंकेची पार्श्वभूमी लाभलीय. अजॉय वर्माचा हा पहिलाच मल्याळी चित्रपट. यापूर्वी त्यानं बॉलिवुडमध्ये काही चित्रपट दिग्दर्शित तसेच संकलित केले आहेत.

- Advertisement -

त्यापैकी नाव घेण्यासारखा एकही चित्रपट नाही. म्हणूनच मुंबईत वाढलेला वर्मा अचानक मल्याळी चित्रपटाकडे का वळला याचं कुतूहल वाटायला लागतं. वर्माचा जन्म मुंबईचा असला तरी त्यांची नाळ केरळशी जोडली गेलेली. लहानपणापासूनच मोहनलाल यांचा त्याच्यावर मोठा प्रभाव. किंबहुना दक्षिणेतील प्रेक्षकांप्रमाणे त्यानेही या कलाकाराला आपलं देवच मानलं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत बरीच वर्षं काम केल्यानंतर या देवासोबत एक तरी चित्रपट करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, मोहनलाल ही चित्रपट निवडीबाबत अत्यंत सजग असल्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही ‘स्क्रीप्ट’ नेऊन चालणार नाही, याची वर्माला कल्पना होती. म्हणूनच इच्छा असूनही तब्बल दहा वर्षं त्यानं मोहनलाल यांची भेट घेण्याचं टाळलं. अखेर मित्र संजू थॉमसनं एक कथानक ऐकवल्यानंतर वर्माचे डोळे चमकले आणि तो ही कथा घेऊन थेट मोहनलाल यांच्याकडे जाऊन पोहचला.

नवोदित दिग्दर्शक प्रख्यात कलावंताला एखादी कथा ऐकवतो तेव्हा त्याला साहजिकच एक भांबावलेपण येतं. वर्मालाही ते जाणवलं. मात्र, आश्चर्य काय, तर पहिल्याच ‘नरेशन’नंतर लगेचच मोहनलालनी हा चित्रपट करण्यास होकार दिला. मोहनलाल यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला असता तर वर्मानं हा चित्रपट निर्मितीपूर्वीच डब्यात घालण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा मोहनलाल यांच्यासारख्या कलाकाराचा होकार येतो तेव्हा मग त्या ‘प्रोजेक्ट’मध्ये कसलेच अडथळे येत नाहीत. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मोहनलाल यांचा होकार मिळाल्यानंतर ‘निराली’च्या निर्मिती प्रक्रियेला वेग आला. चित्रपट मल्याळम भाषेत असला तरी वर्मानं आपला बॉलिवुडमधील अनुभव पणाला लावत तंत्रज्ञांच्या टीममध्ये मुंबईतील मंडळींचा समावेश केला.

- Advertisement -

त्यामधील प्रमुख नाव म्हणजे सिनेमॅटोग्राफर संतोष थुंडीयाल. आतापर्यंत अनेक बॉलिवुडपटांची चित्रचौकट थुंडीयाल यांनी देखणी केलीय. या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन आणि ‘व्हीएफएक्स’ला मोठं स्थान आहे. त्यामुळे वर्मांनी सुनील रॉड्रीग्ज यांची निवड केली. मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये ‘पुलीमुरुगन’ या चित्रपटाचं मोठं नाव आहे ते त्यामधील अ‍ॅक्शन आणि ‘व्हीएफएक्स’साठी. ‘निराली’ प्रदर्शित होण्याआधीच त्याची तुलना ‘पुलीमुरुगन’बरोबर केली जातेय.गेल्या ९ जानेवारीला मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली नी अवघ्या ३६ दिवसांमध्ये तो पूर्ण झाला. या चित्रपटाचं बजेट आहे ११ कोटी. मराठी चित्रपटांच्या तुलनेत ते दुपटीहून अधिक म्हणावं लागेल. त्या तुलनेत चित्रपटाच्या शूटिंगचा वेग खूपच जास्त म्हणावा लागेल. मोहनलाल यांच्या सलग १५ दिवसांच्या तारखा मिळाल्यामुळे दिग्दर्शक वर्माने त्यांच्या भूमिकेचा भाग हा त्या दिवसांमध्येच पूर्ण केला.

नंतरचे तांत्रिक सोपस्कार उरकून जुलैमधील प्रदर्शन, म्हणजे वर्मानं खूपच वेगानं काम केलं. मुंबईतील भांडूप, पवई, मीरा रोड इथं हा चित्रपट शूट झालाय. हिंदी चित्रपटांमधील मुंबई हा नेहमीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. त्यामुळे मल्याळम चित्रपटामध्ये कॅमेरामन-दिग्दर्शकानं मुंबई कशी टिपली आहे, याचीही उत्सुकता रसिकांना असणारच. वर्मानं मोहनलाल यांच्यावरील प्रेमाखातर त्यांच्याकडून एक गाणंही गाऊन घेतलं. विशेष म्हणजे हे गाणं ‘ड्यूएट’ असून मोहनलालनी ते श्रेया घोषालसोबत गायलं आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये मोहनलाल यांची नायिका आहे नादिया मोईदू. तब्बल तीन दशकांनंतर ही जोडी पुन्हा चित्रपटामध्ये एकत्र आलीय. आपल्या भूमिकांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असलेले मोहनलाल आता ‘निराली’ असं शीर्षक असलेल्या चित्रपटात आपल्या अभिनयाचं काय निराळंपण दाखवितात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल!


– मंदार जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -