घरमनोरंजनमणिकर्णिका विजयी भव!

मणिकर्णिका विजयी भव!

Subscribe

एकाच आठवड्यात बड्या स्टार्सचे चित्रपट आमनेसामने येणे हा विषय आता तसा नवीन राहिलेला नाही. प्रेक्षकांनी त्यावर चर्चा केली; पण निर्मात्यांनी ही प्रेक्षकांची गरज आहे, प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग ठरलेला आहे असे कारण देऊन चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. पण २५ जानेवारीचा शुक्रवार कायम स्मरणात राहणारा असणार आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ तर ‘मणिकर्णिका’ च्या निमित्ताने झाशीच्या राणीची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर एकाच वेळी झळकणार आहे. या दिवशी कोणाचे पारडे जड असेल हे सांगता येणे कठीण आहे. तूर्तास ‘मणिकर्णिका विजयी भव!

गुणी अभिनेत्री म्हणून कंगणा रनौट हिचे बॉलिवूडमध्ये नाव आहे. संयमशील, भावपूर्ण भूमिकांना न्याय देऊन तिने अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. मोजके पण नोंद घेणारे चित्रपट स्वीकारणे हे तिचे वैशिष्ट्य आहे. तिच्या या वाटचालीमध्ये तिला स्वत:ला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट या महिन्यात घडणार आहे, ती म्हणजे तिचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात ती झाशीच्या राणीची मुख्य भूमिका निभावते आहे. शिवाय क्रीश बरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. सध्या बायोपिकचे युग आहे. जुन्या-नव्या पण महनीय व्यक्तींवर चित्रपट येऊ घातलेले आहे. नव्या युगात झाशीची राणी यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे कोणी धाडस केले नव्हते. स्वत: कंगणाने यात पुढाकार घेऊन झाशीच्या राणीची शौर्यगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असे पाहिलेले आहे.

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जी काही कार्यपद्धती आहे ती कंगणाने अवलंबलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट सतत प्रेक्षकांच्या चर्चेचा भाग बनलेला आहे. नुकतेच या चित्रपटातल्या प्रमोशन साँगचे प्रकाशन केले गेले जे ‘विजयी भव’ या नावाने ओळखले जाणार आहे. शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे. प्रत्यक्षात सादरीकरणाने नंतर चित्रीत झालेले गीत दाखवले गेले. यावेळी गीतकार, संवाद लेखक प्रसून जोशी हेसुद्धा संगीतकारांबरोबर उपस्थित होते. सहभागी कलाकारांनीही आवर्जून हजेरी लावली होती.

- Advertisement -

‘मी आजवर अनेक चित्रपट केले. प्रेक्षक या चित्रपटाच्या बाबतीत काय अंदाज बांधतात हे मला सांगता येणे कठीण आहे, पण माझ्यासाठी ‘मणिकर्णिका’ हा बीग बेजेट चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माझं स्वप्नही साकार होत आहे’ असे मनोगत कंगणा रनौट हिने व्यक्त केले. ‘२५ जानेवारीला ‘ठाकरे’ हासुद्धा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रदर्शित होणार्‍या तीन चित्रपटांपैकी एका चित्रपटाने माघार घेतलेली आहे त्याचे कारण मला समजलेले नाही. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टिमकडून किंवा पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाही किंवा कोणत्याही व्यक्तीने त्या संदर्भात मध्यस्थी केलेली नाही. त्यामुळे यावर चर्चा करणे महत्त्वाचे वाटत नाही. प्रेक्षक सुजाण आहेत. ते आपल्या आवडीप्रमाणे मनोरंजन करून घेतात. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना फारशी अडचण येणार नाही’ अशीही प्रतिक्रिया कंगणाने यावेळी दिली.

#देशप्रेम जताओ
प्रसून जोशी यांनी ‘मणिकर्णिका’ साठी गीतलेखन आणि संवादलेखन केले असले तरी भारतीय नागरिकांमध्ये त्यांची वेगळी ओळख आहे. सामाजिक भान असलेले आणि देशाबद्दल आदर व्यक्त करणारे व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा आहे. भारत सरकारने प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन जोशींबद्दल आदर व्यक्त केलेला आहे. अनेक कलासंपन्न अशा संस्थांवर त्यांची नेमणूक केलेली आहे. ‘मणिकर्णिका’ च्या प्रमोशनच्या निमित्ताने बाहेर पडल्यानंतर भारतीय नागरिकांना देशाबद्दल आदर व्यक्त करावा असे वाटत असल्याचे त्यांना दिसले. ‘# मी टू’ च्या निमित्ताने जनमाणसात प्रचंड उलथापालथ होत आहे म्हटल्यानंतर ‘# देशप्रेम जताओ’ ही संकल्पना सोशल नेटवर्कच्या माध्यमातून राबवण्याचे त्यांनी ठरवलेले आहे. भारतातल्या नागरिकांनी देशाचा आदर राखून इथे आपले मत नोंदवावे. कविता, गायन, उत्स्फूर्त कलाविष्कार, सुविचार, घोषणा, मनोगत, चित्र यासारख्या कोणत्याही स्वरुपात बरंच काही नोंदवता येईल. देशाबद्दल अभिमान व्यक्त करा, असे जोशी यांचे सांगणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -