घरमनोरंजनमी प्रेक्षकांची माफी मागतो

मी प्रेक्षकांची माफी मागतो

Subscribe

‘बिग बॉस’ मराठीच्या घरात आता शेवटचे काही दिवस उरलेत. दिवसेंदिवस या घरातील टास्कमुळे, सदस्यांच्या भांडणामुळे रंगत येत आहे. प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतलेले नंदकिशोर चौगुले यांच्याशी साधलेला सवांद.

 ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभव कसा होता ?

मी याआधी ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम कधी फार बघितला नव्हता. मी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार हे ठरल्यावर काही भाग बघितले. मी घरात जाण्याआधी काही सदस्य त्या घरात रहात असल्यामुळे त्यांच्या वेगाशी जुळवून घेणं गरजेचं होतं. माझा जसा स्वभाव आहे तसा स्पष्ट, खरा असाच मी वागलो. मला या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा थोडं दडपण आलं होतं. पण तेवढीच उत्कंठाही होती. एवढ्या गाजलेल्या कार्यक्रमामध्ये जाण्याची संधी मला मिळाली. अनुभव निश्तिच चांगला होता. मात्र इतके दिवस त्या घरात बाहेरच्यांशी कसलाही संपर्क न ठेवता राहणं कठीण आहे.

 उषाताईंबरोबरच्या वागण्यामुळे प्रेक्षकांचा रोष ओढवला असं वाटतं का ?

मी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील सदस्यांची एक प्रतिमा बाहेर तयार झाली होती. मला तुलनेने खूप कमी वेळ मिळाला होता. लोकांच्या मनात माझी प्रतिमा तयार व्हावी इतका वेळ माझ्याकडे नव्हता. मी आऊंबरोबर थट्टा मस्करी करायला सुरूवात केली होती. मला आधी वाटलं आऊही मस्करीच्या सुरातच माझ्याशी बोलेल. गेले अनेक दिवस आऊंना सगळे सांगत होते आता तरी तुझी तलवार काढ. मला वाटलेलं आऊ एकदा तरी माझ्याविरोधात तलवार काढेल. पण तस झालं नाही. याउलट पुष्करच त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला आल्यामुळे माझ्यातोंडून नको ती वाक्य गेली आणि माझी प्रेक्षकांसमोर चुकीच्या पध्दतीने प्रतिमा तयार झाली.

- Advertisement -

 तुमच्या मते घरातील सदस्यांमध्ये सगळ्यात डोकं लावून कोण खेळतं?

मेघा ही ‘बिग बॉस’च्या घरातील सगळ्यात स्ट्राँग सदस्य आहे. ती घरात येण्याआधी सगळा अभ्यास करून आलीय. ती प्रत्येक टास्क डोकं लावून खेळते. आम्ही गमतीने म्हणायचो देखील, मेघा बाहेर गेल्यावर ‘टास्क कसे खेळाल’ याचे क्लासेस उघडणार आहे. फक्त तिचा एकच वाईट गुण आहे, ती खूप बोलते, समोरच्याला बोलायची संधी देत नाही. शेवटच्या दिवशी ‘बिग बॉस’ने आम्हाला पत्र लिहायची संधी दिली होती. तेव्हा मी तिच्याबद्दल पत्रात लिहिलही होतं.

घरात गेल्यावर तुमची स्ट्रॅटेजी चुकली असं वाटतं का ?

घरात गेलो तेव्हा नेमकं काय करायचं असं काही ठरलं नव्हतं. पण प्रेक्षकांनी आपल्याला नोटीस करावं या नादात माझ्याकडून अनेक चुका झाल्या. अनेक चुकीचे शब्द माझ्या तोंडून गेले. घरात आल्यावर आऊंची केलेली मस्करी असो किंवा पुष्करशी झालेलं भांडण किंवा हुकूमशाहीचा टास्क. हे मी ठरवून केलं नव्हतं. बिग बॉसने मला एक सिक्रेट टास्क दिलेला. त्याप्रमाणे मी वागलो. पण माझ्याकडून यावेळी चुका झाल्या हे नक्कीच. त्या वेळोवेळी मी मान्य करत त्याबद्दल माफीही मागितली. काहीतरी वेगळं करूयात याच उद्देशाने मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे ‘मी सगळ्यांची अंडी पिल्ली बाहेर काढेन, मला डिवचू नका’ हे सगळं केवळ घरातल्या इतर सदस्यांना मला बिचकून रहावं यासाठी होतं. तो केवळ माझ्या स्ट्रॅटेजीचा एक भाग होता.

- Advertisement -

 टॉप तीन कोण असतील आणि का ?

मेघा- सई- पुष्कर या तिघांना मी टॉप तीनमध्ये बघतो. हे तिघेही खूप डोकं लावून खेळतात. प्रत्येक टास्क खूप मनापासून आणि जिंकण्याच्याच जिद्दीने खेळतात. कसा टास्क खेळायचा, काय स्ट्रॅटेजी वापरायची हे त्यांचं आधीच ठरलेलं असतं. त्याउलट रेशम आणि अस्ताद आहेत. ते टास्कच्या आधी ठरवतात एक आणि टास्कदरम्यान वागतात वेगळंच. याचा अनुभव मला दोनदा आला. एकदा उश्यांच्या टास्कवेळी आणि झेंड्याच्या टास्कवेळी. झेंड्याच्या टास्कवेळी पुष्करला कॅप्टनसी द्यायची नाही असं ठरलं होतं; पण ऐनवेळी अस्तादने माघार घेतली आणि पुष्कर कॅप्टन झाला.

घरातून बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांना काय सांगाल?

मला प्रेक्षकांची माफी मागायची आहे. अलिबागवासियांविरोधात माझ्यातोंडून एक विधान गेलं. त्यामुळे अलिबागकर माझ्यावर नाराज आहेत. मला त्यांची माफी मागायची आहे. मला त्यांच्या भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नव्हता. अनावधानाने माझ्याकडून हे विधान बोललं गेलं. माझ्यावर आजपर्यंत जसं प्रेम केलं आहे तसंच यापुढेही करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -