घरमनोरंजन‘एक निर्णय’ नवी कथा, जुनी ठेवण

‘एक निर्णय’ नवी कथा, जुनी ठेवण

Subscribe

‘एक निर्णय-स्वत:चा स्वत:साठी’ हा अभिनेता श्रीरंग देशमुख याचा लेखन, दिग्दर्शन, निर्मितीतला पहिला चित्रपट आहे ज्याची निर्मिती शांतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख यांनी एकत्र येऊन केलेली आहे. मुलीने-मुलाने तारुण्यात पदार्पण केले की भारतीय परंपरेप्रमाणे ते विवाहबद्ध झाले पाहिजेत असा आग्रह कुटुंब धरत असतात. पण आजची तरुण पिढी ही सुजाण झालेली आहे. ‘प्रथम स्थिरता नंतर विवाह’ हा त्यांनी लावलेला क्रम आहे. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण झालेले आहेत. ‘एक निर्णय’ या चित्रपटात ईशानच्या आयुष्यात दोन स्त्रिया आलेल्या आहेत. एकीने करिअरला महत्त्व देऊन त्याच्यापासून घटस्फोट घेतलेला आहे तर दुसरीने परंपरेने आलेल्या विवाहसंस्थेला महत्त्व देऊन ईशानबरोबर लग्न केलेले आहे. सर्वकाही सुरळीत पार पाडलेले आहे. पण एका टप्प्यावर दोन्ही स्त्रियांच्या जीवनात एक समस्या उद्भवते आणि ईशानला त्याला सामोर जावे लागते. चित्रपटातले वातावरण काही वर्षांमागचे असले तरी विषय मात्र आजचा आहे.

ईशान हा प्रख्यात डॉक्टर आहे. मुक्ता ही त्याची पत्नी आहे. केवळ दोन कुटुंबियांनी लग्नाचा तगादा लावल्यामुळे हे दोघे विवाहबद्ध होतात. मुक्ताला आपले भविष्यातले यश दिसते आहे. मातृत्त्व स्वीकारल्याने आपल्या यशाला बाधा येऊ शकते हे तिला जाणवायला लागते. ती तसं बोलूनही दाखवते. त्यातून काही तडजोड होत नाही म्हणताना मुक्ता ईशानपासून घटस्फोट घेते. पुढे ईशान सहकारी डॉक्टर मानसी हिच्याशी विवाहबद्ध होतो. तिच्या निमित्ताने घरात पाळणा हलणार असल्यामुळे ईशानच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरलेले असते. मानसीचे तपासणीनंतर ती आई होणार नसल्याचे निदान होते. घटस्फोटीत मुक्ता स्थिर झाल्यानंतर मात्र ईशानपासून आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी असा आग्रह धरते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतो. गाठीभेटी वाढतात. संशय बळावतो. पुत्रप्राप्तीसाठी जे वैज्ञानिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा विचार होऊ लागतो. प्रत्यक्षात काय होते हे मात्र रुपेरी पडद्यावर पहावे लागेल.

श्रीरंग देशमुख हा स्वत: अभिनेता आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट आहे. माणूस काळाप्रमाणे बदललेला आहे. त्याच्या विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. अस्तित्वासाठी तो बोलताही झालेला आहे. या बदलाबरोबर त्याचे जीवनमान, त्याची भाषाशैलीही बदललेले आहे. या चित्रपटात श्रीरंगने कथा ही आजची जरी घेतली असली तरी ठेवण मात्र जुनीच आहे. त्यामुळे संवादही तसे आहेत जे या कथेत खर्‍या अर्थाने अडथळा वाटतात. काही वेगळं सांगायचं आहे या प्रयत्नात विचारांची देवाण-घेवाण यात जास्त होताना दिसते. घरगुती समस्येपेक्षा माहिती करून देणार्‍या तंत्रज्ञानाचे महत्त्व संवादात जास्त ऐकायला मिळते. त्यामुळे पुढे तो माहितीपटासारखा वाटायला लागतो. एकाच कथेत अनेक उपकथांना प्राधान्य देण्याचा हव्यास कथेला बाधक ठरलेला आहे. ईशानची व्यक्तिरेखा सुबोधने केलेली आहे. मुक्ताच्या भूमिकेत मधुरा वेलणकर-साटम दिसते. अभिनयातील प्रदीर्घ वाटचाल तसेच आपला अनुभव या भूमिकेसाठी त्यांनी लावलेला आहे. कुंजिका काळवींट हिचा अभिनेत्री म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. ती फारसा काही प्रभाव दाखवू शकलेली नाही. याशिवाय विक्रम गोखले, मंगल केंकरे, सुहास जोशी, सीमा देशमुख, शरद पोंक्षे यांचा कलाकार म्हणून यात सहभाग आहे. कमलेश भडकमकर, रोहन देशमुख यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -