‘ही’ मराठमोळी अभिनेत्री दिसणार सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये

Mumbai
marathi actress amruta subhash to play role in the netflix series sacred games 2

येत्या १५ ऑगस्टला पुन्हा एकदा सरताज सिंगला गणेश गायतोंडे आव्हान देण्यासाठी येणार आहे. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ तसेच, ‘जंग का वक्त आ गया है’ असं म्हणत गायतोंडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सेक्रेड गेम्स २’ या दुसऱ्या सिझनाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या दुसऱ्या सिझिनमध्ये नवीन काय असू शकतं याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. पहिल्या सिझिनमध्ये मराठी अभिनेत्री राधिका आपटे रॉ एजंटची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. दुसऱ्या सिझिनमध्ये देखील चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

मराठी ते हिंदी चित्रपटापर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री अमृता सुभाष ही ‘सेक्रेड गेम २’ मध्ये दिसणार आहे. शनिवारी एका मराठी वृत्तावाहिनीच्या माहितीनुसार ही गोष्ट समोर आली आहे. श्वास, किल्ला, बालक पालक, रमन राघव, गल्ली बॉय या सुप्रसिद्ध चित्रपटातून अमृता सुभाषने आपले अभिनयाचे कौशल्य दाखवलं आहे. ‘सेक्रेड गेम २’ मध्ये अमृता सुभाष ही एका रॉ एजंटच्या भूमिकेतून दिसणार आहे.

‘सेक्रेड गेम २’ येत्या १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंवर प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यप आणि नीरज घायवान या दोघांनी ‘सेक्रेड गेम २’चे दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या सिझनमध्ये अनुत्तरीत राहीलेल्या प्रश्नांची उत्तरे या दुसऱ्या सिझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडेचं नेमकं काय झालं? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.