मराठी सिनेमाला थिएटर उणे?

Marathi cinema
फोटो प्रातिनिधीक आहे

बऱ्याचदा मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत अशी ओरड ऐकायला मिळते. एखादा मराठी चित्रपट सिनेमागृहात आठवडाभरदेखील चालत नाही किंवा एकाच दिवशी चार-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. या सगळ्या व्यवहारामागे काही आर्थिक गणिते असतात. त्यासह इतरही अनेक बाबी निर्नायकी ठरतात, त्याचा हा उहापोह… 

-तेजल गावडे

([email protected])

मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत, असे आपल्याला बरेचदा ऐकायला किंवा वाचायला मिळते. पण, चित्र खरेच असे आहे का? मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठी चित्रपट नेहमीच चांगल्या आशयासाठी ओळखला जातो आणि मराठी चित्रपटांचा डंका अनेक राज्य व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये वाजतही असतो. एवढेच काय, तर ‘कान’ महोत्सव असेल किंवा ‘ऑस्कर’ अशा नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपट व कलाकार हजेरी लावत असतात. एकीकडे मराठी सिनेमा असा सातासमुद्रापार आपला झेंडा रोवत असताना महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी का होत आहे, असा सवाल उपस्थित वारंवार उपस्थित केला जातो.  रसिक प्रेक्षकराजा देखील चित्रपटांना चांगली गर्दी करतो. मात्र तरीदेखील बऱ्याचदा मराठी चित्रपट प्रदर्शित होतो कधी आणि थिएटरमधून जातो कधी, हे कळतदेखील नाही. हल्ली चित्रपटाचे प्रमोशन व मार्केटिंगदेखील मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे होऊन बसले आहे. कारण जर चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचलाच नाही तर चित्रपटाला प्रेक्षक गर्दी कसा करेल? गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या प्रतिसादावर कटाक्ष टाकायचा म्हटला तर ‘पोश्टर गर्ल’, ‘पोश्टर बॉइज’, ‘बघतोस काय मुजरा कर’ यांसारख्या हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

poster girl Marathi movie
‘पोस्टर गर्ल’

तर राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘कोर्ट’ या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी अक्षरश: पाठ फिरवली. किशोरवयीन मुलांच्या विश्वावर भाष्य करणाऱ्या ‘बॉइज’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ‘बॉईज’ने पहिल्या दिवशीच तिकिटबारीवर तब्बल आठ कोटी चाळीस लाखांची कमाई केली होती. ‘टाईमपास – २’ने बॉक्सऑफिसवर ३५ कोटींची कमाई केली. नाट्काचे माध्यमांतर करून बनवलेल्या ‘नटसम्राट’ व ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांनी ४० कोटींचा गल्ला जमवला. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने बॉलिवूडच्या कलाकारांनासुद्धा भुरळ पाडली. या चित्रपटाला महाराष्ट्रातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. यात एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळाली. या चित्रपटातील शेवटाबाबत काही प्रेक्षकांनी नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. हा चित्रपट लोकांनी अनेक वेळा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. या चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक कमाई करीत नवा विक्रम केला. प्रियंका चोप्राने व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मानवी पैलूंवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटालाही खूप चांगली दाद मिळाली. ‘ख्वाडा’ फेम भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ चित्रपटातली अनोखी प्रेमकथा रसिकांना खूपच भावली. मुंबईसह ग्रामीण भागात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘बबन’ने दहा दिवसात आठ कोटींहून अधिक कमाई केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाचा विषय वेगळा असल्या कारणामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ चित्रपटाला ‘इफ्फी’ महोत्सवांतून वगळण्यात आले होते. या चित्रपटाच्या शीर्षकावरून या चित्रपटाला विरोध होत होता. त्यामुळे या चित्रपटात काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, हे जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक होते. मात्र चित्रपट प्रदर्शनाला थंड प्रतिसाद मिळाला.

Sairat-movie-review
सैराट सिनेमाचे पोस्टर

स्वप्नील जोशी अभिनीत ‘भिकारी’, ‘एफ.यू.’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरे उतरले नाहीत. ‘फास्टर फेणे’, ‘मुरंबा’, ‘लपाछपी’, ‘ती सध्या काय करते’, ‘व्हॉट्सअप लग्न’  या चित्रपटांना बऱ्यापैकी यश मिळाले. तर ‘तुझं तू माझं मी’, ‘मला काहीच प्रोब्लेम नाही’, ‘मांजा’, ‘तुला कळणार नाही’, ‘हंपी’ व  ‘रेडू’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तितका रिस्पॉन्स नाही मिळाला. यावर्षी प्रदर्शित झालेले ‘यंटम’, ‘चिठ्ठी’,’फिरकी’, ‘मंत्र’ हे चित्रपट तिकीटबारीवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. बऱयाचदा मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत अशी ओरड ऐकायल्या मिळते. एखादा मराठी चित्रपट सिनेमागृहात आठवडाभरदेखील चालत नाही किंवा एकाच दिवशी चार-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळत नाही.
यामागे काही आर्थिक गणितेदेखील असतात. याबाबत सिनेमा ऑनर्स ऍण्ड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, ‘सिंगल स्क्रीन असो किंवा मल्टिप्लेक्समध्ये असो, कुठलाही थिएटर मालक चित्रपट उगाचच काढून टाकत नाही. जर एखाद्या मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांचे शो रद्द करून त्याजागी मराठी चित्रपटाचे शोज वाढविले जातात.  मराठी चित्रपट चांगला चालत असेल तर निष्कारण थिएटर मालक किंवा एक्झिबिटर कशाला नुकसान करून घेतील? चित्रपटाच्या कलेक्शननुसार कोणताही चित्रपट थिएटरमध्ये चालवला जातो. माझ्या मते मराठी चित्रपट जाणीवपूर्वक डावलला जात नाही.

“आमच्याकडे एकावेळेला सहा मराठी चित्रपट चालवले जातात. दरवर्षाला ऐंशी-नव्वद  मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील सत्तर चित्रपट थिएटरमध्ये जास्त काळ टिकत नाहीत. लोकांना न भावणारे चित्रपट जास्त बनतात. रसिकबाप सज्ञान आहेत. त्यामुळे चांगल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोच मिळतो. हल्ली एकाच दिवशी पाच-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले बरे चालणारे चित्रपट असतील, त्यांनाच थिएटर मिळतात. कुठला चित्रपट चालवायचा याचा निर्णय थिएटरवाल्यांकडे असलाच पाहिजे. हल्ली नवखे लोक प्रोडक्शन्समध्ये येत आहेत. त्यांना इथले अजिबात ज्ञान नाही. अशा लोकांमुळे या व्यवसायाचे गणित बिघडले आहे”, असे मत  ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे सदस्य अरविंद चाफळकर यांनी व्यक्त केले.
चित्रपट वितरक समीर दीक्षित यांनी “चित्रपटगृहवाले कुणाचेही नसतात. त्यांना चांगला चालणारा चित्रपट हवा असतो असे सांगितले व पुढे म्हणाले, की “आपल्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी हिंदी किंवा मराठी चित्रपट नाही आहे. तर आता प्रदर्शित करूयात असे जर निर्माते व चित्रट वितरकांनी ठरविले तर चित्रपटांना चांगले थिएटर मिळते. ही समस्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहांची आहे. सिंगल स्क्रीन्सचे भाडे भरले की थिएटर मिळते. एकाच दिवशी खूप चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर चित्रपटांना थिएटर न मिळण्याची नामुष्की ओढवते.  चित्रपटाचे प्रमोशन व मार्केटिंग कसे केले जाते, याच्यावरही चित्रपटाचे गणित अवलंबून असते.”
अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकरदेखील थिएटर मालकांशी सहमत असल्याचे दिसले. ते म्हणाले की, “थिएटरवाल्यांचा हा धंदा आहे. त्यांना स्वत:चे नुकसान करुन काही करायचे नाही. चित्रपट चांगला करा किंवा वाईट करा, त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. याबाबत प्रत्येकाचे मत आहे. चित्रपटाची पब्लिसिटी व प्रमोशन केले पाहिजे. प्रेक्षक ठरवितात त्यांना कोणता चित्रपट पाहायचा. काही मराठी चित्रपटांना कसे काय थिएटर मिळतात…? मराठी प्रेक्षकांना आग्रहाने थिएटरकडे वळवणारे चित्रपट बनविले पाहिजेत. चित्रपटात कधीकधी मोठा निर्माता, बॅनर व कलाकार असतो पण त्याची पब्लिसिटी व प्रमोशन न झाल्यामुळे देखील प्रेक्षक पाठ फिरवतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला थिएटर मालकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मराठी चित्रपट बिझनेसच्या दृष्टीकोनातून बनवा.
आपला प्रेक्षकवर्ग सज्ञान असून त्याला काय बघायचे आणि काय नाही, हे चांगले समजते.  त्यामुळे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करा म्हणजे त्या चित्रपटाला यश व थिएटर अशा दोन्ही गोष्टी नक्कीच मिळतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here