‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हिंदीतून पुन्हा रंगमंचावर अवतरणार

हे नाटक आता पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे.

Mumbai

वसंत कानेटकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील अंतर्मुख करणारा संवाद. तसेच, रयतेच्या राजाची आणि युवराजांची कुटुंबातील कलह सावरून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांची थेट आणि परखड मते ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नावाजलेल्या नाटकाने उलगडली आहे.

मात्र आता पुन्हा नव्याने हे नाटक रंगमंचावर अवतरणार असून हे नाटक प्रथमच हिंदीमध्ये सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘रायगड जाग उठा है!’ या नावाने हे नाटक रंगमंचावर आणण्याचे शिवधनुष्य ‘स्वतंत्र थिएटर्स’ या संस्थेने पेलले आहे.

हिंदी भाषिकांसमोर उलगडणार राजांची व्यक्तिमत्व

१९६२मध्ये कानेटकर यांनी हे नाटक तयार केले असून या नाटकाचे यशस्वी हजारो प्रयोग मराठी भाषेमध्ये रंगले. आज देखील या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. १९६४मध्ये वसंत देव यांनी या नाटकाचे हिंदीमध्ये नाट्यरुपांतर केले. तीच कलाकृती आता रंगमंचावर अवतरणार आहे. या निमित्ताने हिंदी भाषिकांसमोरही महाराष्ट्रातील दोन अतिशय धुरंधर राजांची व्यक्तिमत्वे उलगडली जाणार आहेत.

देशातील विविध भागांमध्ये २५ हून अधिक नाटकाचे प्रयोग

पुढील वर्षभरात राज्यातील तसेच देशातील विविध भागांमध्ये या नाटकाचे २५ हून अधिक प्रयोग करण्याचा मानस संस्थेने आखला असून, टप्प्याटप्प्याने प्रयोग साकारले जाणार आहेत. ‘स्वतंत्र थिएटर्स’च्या अभिजित चौधरी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून, प्रयोगांसाठी कलाकारांचे दोन संच तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रेम गौडा, अनिकेत टोरो (छत्रपती शिवाजी महाराज), उमेद पाटील, रिषभ जैन (छत्रपती संभाजी महाराज), अश्विन शर्मा (हंबीरराव), सुयश कुकरेजा, हिमांशू घाणेकर (अण्णाजी), ऋषीकेश भोंडे (राजाराम), रेणुका गटलेवार (सोयराबाई), यशिका कुशवाह (येसुबाई) यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.