घरमनोरंजनअमेरिकेत सुखाचा शोध

अमेरिकेत सुखाचा शोध

Subscribe

अभिनेता प्रशांत दामले यांनी केवळ हौस म्हणून गायन कला जपलेली नाही तर नाटकातही त्याने त्याचा सुरेख वापर केलेला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे त्याच्या नाटकातलं गीत कॅसेटच्या निमित्ताने घराघरापर्यंत पोहोचलेले आहे. अभिनयाशिवाय आणखीन काही करावे असा जर प्रेक्षकांनी आग्रह धरला तर त्यात प्रशांत हमखास हेच गाणं गाताना दिसतो. प्रेक्षकांना ही काव्यओळ जशी भावली तशी समृद्धी पोरे हिलासुद्धा ही काव्यओळ अधिक भावली. तिने चक्क याच शिर्षकात चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. सुख, श्रीमंती, समृद्धी असा जेव्हा विषय निघतो तेव्हा अमेरिकेचे नाव घेतले जाते. या मराठी चित्रपटाची कथा इथेच घडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. त्यात या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

साईबाबा स्टुडिओज् आणि समृद्धी सिनेवर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. स्वत: समृद्धी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहे. सर्जनशील दिग्दर्शिका म्हणून तिच्या नावाला फक्त वलय नाही तर यापूर्वी ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’, ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून तिने हे पटवून दिलेले आहे. पुरस्कार सोहळ्यात तिचा गवगवा झालेला आहे. सुखाच्या शोधात असणार्‍या सत्य घटनेवर ही कथा आधारलेली आहे. हिंदीत निर्माता, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव आहे ते गजेंद्र सिंग या चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. अंकुश चौधरीला मुख्य भूमिकेसाठी निवडलेले आहे. जाहिरातीच्या युगात ज्या अभिनेत्रीचे नाव आहे ती झीनल कामदार ही या चित्रपटाची नायिका आहे. लॉस एंजिलीस इथे या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -