घरमनोरंजनभरकटलेल्या वाटेवरचा ट्रकभर स्वप्न

भरकटलेल्या वाटेवरचा ट्रकभर स्वप्न

Subscribe

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. मुंबईत येणार्‍या प्रत्येक माणूस इथं काहीना काही स्वप्नं घेऊन येतो. काहींची स्वप्नं पूर्ण होतात तर काहींना प्रयत्न करावे लागतात. अशा मुंबईत घर घेणं सगळ्यांना परवडतच असं नाही. ही मुंबई कधीच कोणाला नाही म्हणत नाही. प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकद या मुंबईत आहे.

आपली स्वप्न पूर्ण करायला, मुलांच्या भविष्यासाठी माणसं मुंबईत येत असतात. कोणी आपली स्वप्न गगनचुंबी इमारतीत राहून पूर्ण करतात तर कोणी छोट्या झोपडीत राहून आपल्या स्वप्नांच्या मागे धावत असतात. असंच काहीसं झालं आहे, ट्रकभर स्वप्न मधल्या राजा (मकरंद देशपांडे) याच्या बाबतीत.

एका शेतकरी कुटूंबात जन्माला आलेला राजा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी घरच्यांशी भांडून मुंबईत येतो. त्याला आपला मुलगा सनी (साहील गिलबिले) याला बॅरिस्टर बनवायचं असतं. आपली बायको राणी (क्रांती रेडकर) आणि मुलासोबत मुंबईत आलेला राजा एका झोपडपट्टीत राहून टॅक्सी चालकाचं काम करतो. आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं यासाठी राजा आणि बायको काहीही करायला तयार असतात. राणी एका हाय- फाय सोसायटीत घरकाम करते. त्यांचा हा संसार अगदी सुखात सुरू असतो.

- Advertisement -

एकदा वडिलांच्या हट्टामुळे राजा बायको मुलांना घेऊन शिमग्याला गावी जातो. त्यावेळी धाकटा भाऊ त्याला त्याच्या मुंबईतल्या खुराड्यासारखी खोली असलेल्या घराबाबत बोलतो. यावेळी राजाचा राग अनावर होतो. तो तडकाफडकी मुंबईत निघून येतो. आता आपल्या घरात पोटमाळा काढायचाच, सत्यनारायणाची पूजा घालायची आणि गावच्या सगळ्यांना घरी आणायचं, असा निर्धारच राजा करतो. घराला पोटमाळा काढण्यासाठी ५ लाखांची गरज असते. त्यासाठी राजा आणि त्याची बायको दिवस रात्र मेहनत करतात. यावेळी झोपडपट्टीचा भाई (मुकेश ऋषी) राजाला मदत करण्यासाठी पुढे येतो. तो खरंच मदत करणारा असतो का? राजा पाच लाख रूपये जमा करतो का ? राजाचा मुलगा बॅरिस्टर होतो का? हे ट्रकभर स्वप्न च्या पडद्यावर पाहायला हवं.

सिनेमाच्या कथेत फार दम नाही. या आधी अशा कथेशी साधर्म्य असलेले अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. लेखक – दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या हा पहिलाच चित्रपट. चित्रपटाची मूळ कथाच प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. चित्रपटात येणारे प्रसंगांचा वास्तवाशी संबंध आढळत नाही. मुंबईतील एखाद्या मॉडेलचं आयुष्य दाखवताना नको तेवढा भडकपणा जाणवतो. यातील अनेक प्रसंगही चित्रपटात उगाच असल्यासारखे वाटतात. त्यामुळे कथा भरकटते. त्याचप्रमाणे मुलाला बॅरिस्टर करण्याची स्वप्न बघणारा राजा मुलीच्या शिक्षणाचा साधा उल्लेखही करत नाही. ही बाब खटकते. चित्रपट एडीटींगमध्ये काही प्रमाणात फसला आहे. राजाच्या आई वडिलांचे मध्येच येणारे प्रसंग चित्रपटात कंटाळवाणे होतात. त्याचप्रमाणे चित्रपटात असणारी गाणी फारशी लक्षात रहात नाही. गाण्यात येणारे प्रसंगसुद्धा मेलोड्रामॅटीक वाटतात.
सगळ्यांनी आपल्यापरीने आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.

- Advertisement -

क्रांती रेडकरने साकारलेली राणी आणि शेजारीण असलेली स्मिता तांबे लक्षात राहते. पण मकरंद देशपांडे यांनी साकारलेला राजा अनेक ठिकाणी खटकतो. राजाच्या भूमिकेत मकरंद देशपांडे शोभत नाही. ते अनेक ठिकाणी राजा नाही तर मकरंद देशपांडेच वाटतात. एखादा माणूस खरचं एवढा भोळा असतो का, असा प्रश्न आपल्याला राजाकडे बघून वारंवार पडतो. त्याचप्रमाणे विजय कदम, आशा शेलार, मनोज जोशी यांनी कामं चोख केली आहेत. पण त्यांच्या व्यक्तीरेखांना चित्रपटात फारसं महत्त्व नाही. एकंदरच चित्रपटाची मूळ कथाच प्रेक्षकांपर्यंत पोहचत नसल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. मुंबईत आलेला राजा त्याच्या स्वप्नांची नीट मांडणी न झाल्यामुळे चित्रपट अर्धवट वाटतो. पण मुंबईत मोठी स्वप्न घेऊन येणार्‍याला ही वाट सोपी नाही, हा धडा मात्र पाहाणार्‍यांना मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -